सर्व वाचनसाहित्य अंकीय स्वरूपात एकत्र साठवून ते आंतरजालाच्या साह्याने आणि विद्युतकीय माध्यमांद्वारे हवे तेव्हा, हवे तेथे वाचनास सहज उपलब्ध होण्याचे एक ठिकाण. योहान
गुटेनबर्ग यांच्या इ. स. सुमारे १४५२ मध्ये छापखाण्याचा शोधा लागल्यानंतर छापील साहित्यांचा ओघ वाढला. त्यानंतर दुसऱ्या महायुद्धानंतर ग्रंथालये आणि त्यातील येणाऱ्या विविध स्वरूपातील साहित्यांचा ओघ वाढत गेला. अनेक नवनवीन माध्यमांचा शोध लागला. उदा., मायक्रोफॉर्म्स, चुंबकीय ध्वनिमुद्रण, चलचित्र, प्रकाशीय व विद्युत माध्यमे इत्यादी. विद्युत माध्यमांच्या प्रवाहातही ई-पत्रकारिता (ई-जर्नल), ई-स्रोत, आंतरजाल अशा विविध माध्यमांचा समावेश झाला. यांमुळे आजच्या ग्रंथालयांचे स्वरूप संकरित ग्रंथालय (हायब्रिड लायब्ररी) किंवा मल्टिमिडिया ग्रंथालय असे अनेकविध माध्यमांनी युक्त झाले आहे. अलीकडच्या काळात संगणकाच्या वापराने, तसेच विद्युत माध्यमांच्या प्रवाहांमुळे ग्रंथालयाचा मोठा विकास झाला आहे. याचाच परिपाक म्हणून ई-ग्रंथालय ही १९७० च्या दशकात, क्षितीजाविना ग्रंथालये (लायब्ररीज विदाउट बाँड्रीज), आभासी ग्रंथालय (व्हर्च्युअल लायब्ररी), जवळजवळ पूर्ण विद्युतीय ग्रंथालयांचा आभास निर्माण करणारी ग्रंथालये अशा नवनवीन तांत्रिक संकल्पना उदयास आल्या.

पारंपरिक ग्रंथालयातील दुर्मिळ ग्रंथ, हस्तलिखिते, दस्तऐवज इत्यादी साहित्य वातावरणातील बदलांमुळे, खूप काळ झाल्यामुळे आणि अतिवापरामुळे जीर्ण व ठिसूळ होऊन त्यांचे तुकडे होण्याची शक्यता असते. अशा वेळी या सर्व साहित्यांचे जतन व्हावे म्हणून ते ई-ग्रंथालयाद्वारे अंकीय स्वरूपात जतन केले जाते. त्यामुळे ग्रंथांचे आयुष्य वाढण्यास मदत झाली आहे. वाचकांना ई-ग्रंथालयाच्या माध्यमातून हवे ते साहित्य कोठेही व केव्हाही सहज उपलब्ध होऊ शकते. ई-ग्रंथालयामुळे एखादा ग्रंथ जगातील अनेक व्यक्ती एकाच वेळी वाचन करू शकतो. ई-ग्रंथालयामुळे जागेची बचत होते. ई-ग्रंथालयाद्वारे ग्रंथांचे अद्ययावतीकरण व अचूक माहितीचे संग्रहण व पुन:प्राप्ती कधीही करता येते. प्रतिकूल वातावरणातही ई-ग्रंथालयाचा व त्यामधील साहित्यांचा वापर करता येते. ई-ग्रंथालयाच्या साह्याने एखादा ग्रंथ आपल्या भ्रमणध्वनी किंवा संगणक-लॅपटॉप या साधनांमध्ये जतन करून तो कधीही वाचन करता येतो. तसेच इमेलच्या माध्यमातूनसुद्धा एखाद्या ग्रंथाची माहिती ई-ग्रंथालयाकडून मिळविली जावू शकते. ई-ग्रंथालयामुळे ग्रंथपालांना उपलब्ध ई-तालिकांची माहिती वापरणे शक्य होते. ई-तालीकेमुळे वाचकांना ग्रंथांची अनुक्रमणिका पाहून हवी ती माहिती सहज प्राप्त करता येऊ शकते. ई-ग्रंथालयामध्ये ग्रंथांची प्रस्तावना व विषयसूचि यांचा समावेश केला, तर ग्रंथालयातील तालिकेची व्याप्ती वाढू शकते. ई-ग्रंथालयाच्या साह्याने एका ग्रंथालयाकडून दुसऱ्या ग्रंथालयाकडे एखाद्या ग्रंथाची देवघेव होऊन वाचकाची गरज पूर्ण केली जाऊ शकते. परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांना महत्त्वाचा ग्रंथ ई-ग्रंथालयाद्वारे जागेवर उपलब्ध होत असल्याने त्यांच्या वेळेची बचत होऊन त्यांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळतो.

असोसिएशन ऑफ रिसर्च लायब्ररीज (एआरएल) या संस्थेने १९९५ मध्ये अंकीय ग्रंथालयाबाबत स्पष्टीकरण देताना जटील ग्रंथालयाबाबतची संकल्पना समजावीत पुढील काही बाबी स्पष्ट केल्या आहेत :

  • अंकीय ग्रंथालय ही एकच वस्तू नसून त्यास विविध अंगे आहेत.
  • अंकीय ग्रंथालयात अनेकविध माहितीस्रोत एकमेकांशी जोडण्यासाठी प्रगत संगणक व दळणवळण माहिती तंत्रज्ञानाची आवश्यकता असते.
  • माहितीस्रोत जोडणारे दुवे पारदर्शी असतात.
  • ई-ग्रंथालये आणि माहिती सेवांचा लाभ सर्वंकष (युनिव्हर्सल ॲक्सेस) स्वरूपात असतो.
  • अंकीय ग्रंथालय आणि विद्युतकीय ग्रंथालय या संज्ञा बरेचदा एका अर्थाने वापरल्या जातात.
  • ज्याप्रमाणे प्रत्येक ग्रंथालय ग्रंथांचा संग्रह दर्शविते, त्याप्रमाणे ई-ग्रंथालय हे विद्युतीय साहित्यांचा संग्रह दर्शवितो.

भारत सरकारने विकसित केलेली माहिती व संप्रेषण तंत्रज्ञानाच्या (एनएमईआयसीटी) राष्ट्रीय मिशन ऑन एज्युकेशन अंतर्गत मानव संसाधन विकास मंत्रालयाने एक खिडकी शोधाद्वारे (सिंगल विंडो सर्च) अध्ययन-अध्यापन स्रोतांच्या आभासी भांडारांची रचना विकसित करण्यासाठी राष्ट्रीय अंकीय ग्रंथालय, भारत (नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया) हा प्रकल्प सुरू केला आहे. या सुविधा अंतर्गत फिल्टर्ड आणि फेडरेटेड शोध, लक्ष्य केंद्रित शोध सुलभ करण्यासाठी कार्यरत आहेत. जेणेकरून शिकणारे कमीत कमी प्रयत्नांतून आणि कमीत कमी संसाधनांचा शोध घेतील. राष्ट्रीय अंकीय ग्रंथालयामध्ये कोणत्याही भाषेची सामग्री ठेवण्यासाठी सर्व साहित्य हे डिझाइन स्वरूपात रूपांतरित केले असून आघाडीच्या स्थानिक भाषांसाठी इंटरफेस समर्थन प्रदान करते. हे सर्व शैक्षणिक स्तरांसाठी संशोधक, अध्यापन करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश आणि स्पर्धापरीक्षेची तयारी करणाऱ्यांस मदत करण्यासाठी, जगभरातील सर्वोत्तम पद्धती स्वीकारून एकाधिक स्रोतांद्वारे संशोधकांना परस्पर संबंधित शोध लावण्यास मदत करण्यासाठी हे साहित्य विकसित केले जात आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, खडगपूर या कार्यात अग्रेसर संस्था आहे.

ई-ग्रंथालयाद्वारे शेअर्ड कॅटलॉगिंग सेवा, संघ तालिका सेवा, वेब ओपेक, आंतर ग्रंथालयीन देवघेव सेवा, रेफरल सेवा, माहितीची निवडक प्रसारन सेवा, बुलेटीन बोर्ड सेवा इत्यादी सेवा दिल्या जातात. छापील माध्यमांच्या मर्यादा, विविध भाषेतील माहिती वापरण्याची एकत्र सोय होणे, आंतरजाल माध्यमातील प्रसारित माहिती वापरण्यातील तांत्रिक अडचणी, स्थानिक बुद्धीसंपदेतून साहित्य निर्मिती इत्यादींसाठी ई-ग्रंथालय उपयोगी ठरत आहे.

ई-ग्रंथालयाबाबत पुढील पारिभाषिक संज्ञांचा उल्लेख केला जातो : पूर्ण अंकीय स्वरूपातील साहित्य (फुल टेक्स कलेक्शन); स्कॅनरच्या साहाय्याने प्रवर्तित छापील मजकूर, प्रतिमा, छायाचित्र, अंकीय ध्वनीमुद्रित प्रकार; दृकश्राव्य प्रकारचे साहित्य वापरायची सोय (डिजीटल ॲक्सेस); वैज्ञानिक माहिती समूह; महाजालीय माहितीस्रोत; सी. डी. रॉम/डी. व्ही. डी. स्वरूपातील माहितीस्रोत; मल्टीमिडीया स्वरूपातील ग्रंथ (ई-बुक्स, ई-एन्सायक्लोपेडिया किंवा मल्टिमिडीया एन्सायक्लोपेडिया) किंवा तत्सम साहित्य प्रकार; आज्ञावलींचे (सॉफ्टवेअर) ग्रंथालय; डेटाबेसेस व ग्रंथालयाच्या तालिका, ज्या आंतरजालाद्वारे पाहता येतात असे स्रोत; अंकीय दृकश्राव्याचे भाग (क्लिप्स) किंवा पूर्ण स्वरूपातील अंकीय माध्यमात परावर्तीत चित्रपट इत्यादी.

संदर्भ : फडके, द. ना., ग्रंथालय संगणकीकरण आणि आधुनिकीकरण, पुणे, २००८.

समीक्षक : के. एम. भांडारकर