पात्रता असूनही स्त्रिया आणि अल्पसंख्यांक यांच्या प्रगतीत येणारे अदृश्य अडथळे काचेचे छत या संज्ञेने नमूद केले जातात. वास्तूशास्त्रात ग्लास सिलिंगचा अर्थ काचेचे छप्पर किंवा छत असा होतो; मात्र अर्थशास्त्रात तो ‘अदृश्य अडथळा’ अशा अर्थाने वापरला जातो. स्त्रियांना उच्च पदावर पोहोचण्यासाठी प्रतिबंध करून यश, प्रतिष्ठित, उच्च कमाईचे पद, उच्च दर्जाचे स्थान पेलण्यापासून प्रतिबंध करते, असे या संकल्पनेतून दिसून येते. ही संकल्पना स्पष्ट करण्यासाठी अदृश्य अवरोध काचेचे छत या रूपकाचा वापर केला जातो.

युनायटेड स्टेट्स फेडरल ग्लास सिलिंग कमिशनने काचेच्या छताला अदृश्य, अनपेक्षित परंतु अविभाज्य अडथळा म्हणून परिभाषित केले आहे. काचेचे छत अवरोध आणि नस्लीय असमानता दर्शवित असून स्त्रिया आणि अल्पसंख्याकांमध्ये पात्रता असूनही सहकार पदाच्या वरच्या पदावर पोहोचण्यापासून रोखून ठेवले जाते, असे या संकल्पनेत दिसून येते.

स्त्रीवादी लेखक जॉर्ज रेंट यांनी इ. स. १८३९ मध्ये एका गाण्यातून काचेचे छत ही संकल्पना मांडली. त्यानंतर लेखिका मेरीलीन लॉडेन यांनी १९७८ मध्ये केलेल्या आपल्या एका भाषणात ग्लास सिलींग हा शब्द सर्वप्रथम वापरला. लिखित धोरण भेदभाव करणारे नाही; मात्र पदोन्नती देताना योग्य पात्रता असूनही पदोन्नती नाकारली जाते, ही संकल्पना ३ एप्रिल २०१५ मध्ये ‘फ्रिडम ऑफ द प्रेरु’ या महिला संस्थेच्या वार्षिक परिषदेत सादर केली गेली.

अमेरिकेचे श्रम विभाग प्रमुख जीन मार्टीन यांनी सार्वजनिक चर्चासत्राच्या वेळी ‘द ग्लास सिलींग इनसेन्टिव्ह’ नावाच्या संशोधन प्रकल्पावर निष्कर्ष मांडला. त्यांच्या मते, काचेचे घन वास्तविकतेपेक्षा मिथक आहे; कारण स्त्रिया स्वतःच घरी राहणे आणि कमी जबाबदारी स्वीकारण्याचे ठरवितात. या अहवालात ग्लास सिलिंग या शब्दाची व्याख्या त्यांनी ‘योग्य व्यक्तींना व्यवस्थापन पातळीच्या वरच्या टप्प्यात जाण्यापासून रोखणारे कृत्रिम अडथळे’ अशी केली आहे. तसेच १९९१ सिव्हील राईट ॲक्टच्या शिर्षक २ चा भाग म्हणून रॉबर्ट रीच यांच्या अध्यक्षेतेखाली सहकार क्षेत्रातील महिलांच्या विकासातील अडथळ्यांचा अभ्यास करण्यासाठी काच सिलींग आयोगाची स्थापना करण्यात आली. या आयोगाच्या निकषात ग्लास सिलींग या शब्दाची व्याख्या अनुवंशिक किंवा संस्थापक कृत्रिम अडथळे, ज्या काही व्यक्तींना व्यवस्थापन पातळीच्या पुढील स्थितीत जाण्यापासून रोखते अशी केली आहे. या अडथळ्यांवर कशी मात करता येईल, याविषयी या अहवालात मार्गदर्शक तत्त्वे आणि उपाय सूचविले आहेत. कार्यस्थळी भेदभाव कमी करून कशी सुधारणा करावी, याविषयी शिफारसी जारी केल्या.

महिला कामगारांच्या श्रम भागीदारीचा हिस्सा १९९५ ते २०१५ या दरम्यान ५४.४% ते ४९.६% पर्यंत कमी झाला होता; परंतु २०१२ पासून महिला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची (सीइओ) संख्या वाढत असून ती सुमारे ३० टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे (२०२३); मात्र मासिक पाळी, गरोदरपणा, रजोनिवृत्ती या काळात होणारे संप्रेरक (हॉर्मोनल) बदल आणि भावनिक स्थित्यंतरे स्त्रियांच्या प्रगतीसाठी व्यवसायतोल जबाबदाऱ्या पाळण्यासाठी अडथळा निर्माण करतात. व्यवसाय कामाच्या ठिकाणी उपलब्ध सुविधांचा अभाव, शिफ्ट ड्यूटी, कामाचे तास, सुट्या, स्वच्छतागृह, पाळणाघर, सॅनिटरी नॅपकीन उपलब्धता इत्यादी घटक काचेचे छत ही संकल्पना स्पष्ट करताना प्रभावी ठरतात. यांचा उल्लेख करताना ‘ममी ट्रॅक’ हा शब्दप्रयोग वापरला जातो.

स्त्रियांना कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कारकीर्दीकडे आणि व्यावसायिक कर्तव्यांकडे दुर्लक्ष करावे लागते. काम आणि कौटुंबिक जबाबदारी यांमध्ये समतोल साधण्यासाठी स्त्रीया अर्धवेळ काम, कमी कुशल दर्जा आणि भूमिका असलेले काम करताना आढळतात. बालकाचे पोषण आणि कुटुंबासंबंधित जबाबदारी यांमुळे व्यावसायिक नोकरीच्या पुढील प्रत्येक टप्प्यावर गळती ड्रॉपआउट रेटचे प्रमाण खूपच जास्त दिसून येते.

इकॉनॉमिस्टमध्ये काचेचे छत निर्देशकाचे निर्देशांक घटक २०१७ मध्ये अद्ययावत केले. त्यामध्ये श्रमशक्तीमधील सहभाग, वेतन, बालक देखभाल खर्च, प्रसुती, पितृत्व हक्क, व्यवसाय शाळांतील उच्च पदावरील नोकरांचे प्रतिनिधित्व यांचा समावेश केला. आईसलँड, स्वीडन, नॉर्वे, फिनलँड आणि पोलंड या देशांमध्ये काचेचे छत सर्वांत कमी आहे, असे आढळून आले.

समीक्षक ꞉ विनायक गोविलकर