अमेरिकेचे चाळीसावे राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांच्या सलग दोन कार्यकाळातील (१९८० ते १९८९) आर्थिक धोरणे व त्यामागील अर्थशास्त्रीय मतप्रणाली यांस रेगनोमिक्स असे संबोधतात. रेगन यांच्या मते, ‘सरकार हा समस्यांवरील उपाय नव्हे, तर सरकार हीच एक समस्या होय’. म्हणजेच, अर्थव्यवस्थेत सरकारी हस्तक्षेपाचा परिणाम विपरित होतो, असे ते मानीत. ते मुक्त अर्थव्यवस्थेचे खंदे पुरस्कर्ते होते. त्यांचा मुक्त अर्थव्यवस्थेतील स्पर्धात्मक बाजारपेठेच्या वाटप क्षमतेवर (अलोकेटिव्ह एफिशिएन्सी) पूर्ण विश्वास होता. रेगन यांच्या आर्थिक नीती ‘लोभ हा इष्ट असतो’ या १९८० च्या अमेरिकन मनोदशेशी मिळत्या जुळत्या होत्या.

रेगन १९७० च्या दशकात अध्यक्ष झाले. त्यावेळी अमेरिकन अर्थव्यवस्था मंदीयुक्त भावफुगवट्याने (अधिक भाववाढ व अधिक बेरोजगारी) बरेच वर्षांपासून ग्रस्त होती. त्यावेळी त्यांनी ताबडतोब यावर उपाय म्हणून पुढील चारपदरी आर्थिक धोरण आखले : (१) व्यक्ती, उद्योगधंदे व गुंतवणूक या सर्वांवरील कर कमी करणे : व्यक्तिगत उत्पन्नावरील सर्वोच्च सीमांत कराचा दर ७० टक्क्यांवरून २८ टक्के आणि कंपन्यांवरील कर ४८ टक्क्यांवरून ३४ टक्के खाली आणला. या धोरणास आधारभूत असलेल्या पुरवठा बाजूचा अर्थशास्त्र (सप्लाय साईड इकॉनॉमिक्स) आणि झिरपा सिद्धांतानुसार कर, विशेषतः उद्योगधंद्यांवरील, कमी केल्याने उपलब्ध झालेला अधिक पैसा हा नवीन कारखाने व तंत्रज्ञान निर्माण करण्याकरिता वापरला जाईल. त्यायोगे उत्पादन, रोजगार वाढून आर्थिक वृद्धी होईल आणि समाजाच्या सर्व घटकांना त्याचा लाभ होईल.

रेगन यांचे आर्थिक सल्लागार प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ लॅफर यांच्या सिद्धांतानुसार जर करांचे दर कमी केले, तर सरकारी महसुलात वाढ होईल. हा सिद्धांत प्रत्यक्षात खरा ठरला. रेगन यांच्या कार्यकाळाच्या सुरुवातीस अमेरिकन सरकारला मिळणारा करांपासूनचा महसूल ५१७ दशलक्ष डॉलर होता; तर त्यांच्या कार्यकाळाच्या शेवटी ९०९ दशलक्ष डॉलर होता.

(२) सरकारी नियंत्रणे कमी करणे : लांब पल्ल्याच्या दूरध्वनी सेवा, केबल टी वी, विमान उद्योग, आंतरराज्यीय बस वाहतूक, जहाज वाहतूक आणि पेट्रोल व नैसर्गिक वायू यांच्या किमतींवरील निर्बंध काढून टाकले. यामुळे १९७३ व १९७९ या काळात ओपेक या संस्थेने केलेल्या पेट्रोलच्या प्रचंड भाववाढीने निर्माण झालेली पेट्रोलची चणचण आणि उच्च किमती १९८० च्या दशकात खाली आल्या. त्याच बरोबर रेगन यांनी मक्तेदारीविरोधी कायद्याची व्याप्ती कमी केली व बँकांना अधिक व्यापक मालमत्ता प्रकारात गुंतवणूक करण्याची परवानगी दिली.

(३) सरकारी खर्च कमी करणे : रेगन यांनी सरकारी खर्च कमी करण्याचे धोरण आखूनही खर्च फारसा कमी झाला नाही. त्यांच्या कार्यकाळाच्या सुरुवातीस (१९८१ मध्ये) हा खर्च स्थूल राष्ट्रीय उत्पादनाच्या २२.९ टक्के होता, तर त्यांच्या कार्यकाळाच्या शेवटच्या वर्षी हा खर्च स्थूल राष्ट्रीय उत्पादनाच्या जवळपास तेवढाच म्हणजे, २२.१ टक्के होता; कारण विल्यम निस्कानेन (आर्थिक सल्लागार मंडळाचे सदस्य) त्यांच्या रेगनोमिक्स या पुस्तकात असे मांडतात की, रेगन यांनी प्रमुख हस्तांतरण देयके (सामाजिक सुरक्षा व वृद्धाना वैद्यकीय मदत पुरविणारी शासकीय योजना) यांत फारशी कपात केली नाही; परंतु गरीबांकरिता औषध योजना, शिक्षण, अन्न खरेदीत मदत, अपंगांसाठी मदत आणि पर्यावरण संरक्षण निधी या सर्वांत बरीच कपात केली. तसेच रेगन सरकारचा संरक्षणावरील खर्च शीतयुद्धामुळे बराच वाढला. रेगन यांचे असे प्रतिपादन होते की, अमेरिकेस सोव्हिएट युनियनकडून आण्विक शस्त्रांचा धोका आहे. त्यामुळे अमेरिकेस आण्विक शस्त्र साठ्याची व शस्त्र सज्जतेची अत्यंत गरज आहे.

(४) पैशाच्या वाढीचा दर कमी करणे : १९७० च्या दशकामध्ये भाववाढ व बेरोजगारीने अमेरिकन अर्थव्यवस्थेस बेजार केले होते. चलन संकोचाचे धरसोड धोरण यास जबाबदार होते. या काळात चलन संकोच केल्यावर व्याजदर वाढले. सौम्य मंदी आली की, लगेच चलन विस्तार केला जायचा. त्यामुळे भाववाढ कमी होत नव्हती. १९८० मध्ये पॉल वोकर हे फेडरल रिझर्व्हचे (अमेरिकन मध्यवर्ती बँक) अध्यक्ष होते. त्यांच्या मते, भाववाढ कमी होईपर्यंत चलन संकोच करणे आणि त्यामुळे येणारी तात्पुरती सौम्य मंदी व उच्च व्याजदर स्वीकारणे, हाच भाववाढ कमी करण्याचा एक मार्ग आहे. वोकर यांच्या या धोरणास रेगन यांनी पूर्ण पाठींबा दिला व याचा परिणाम म्हणून १९८३ पर्यंत भाववाढ कमी झाली; परंतु तत्पूर्वी १९८२ मध्ये सौम्य मंदी आली. जेव्हा भाववाढ पूर्ण नियंत्रित झाली, तेव्हा वोकर यांनी चलन विस्ताराचे धोरण राबविले. त्यामुळे अर्थव्यवस्था सुधारली, बेरोजगारी कमी झाली आणि अमेरिकन अर्थव्यवस्थेने १९८० च्या दशकापासून भरभराट अनुभवली.

रेगनोमिक्सचा सकारात्मक परिणाम : अमेरिकन अर्थव्यवस्थेत १९८० मध्ये १३.६ टक्के भाववाढ होती. ती १९८९ मध्ये घसरून ४ टक्के झाली. याच काळात बेरोजगारी दर ७ टक्क्यांवरून ५.४ टक्के खाली आला. तसेच अमेरिकन शेअर बाजाराचा निर्देशांक (डोव जोन्स इंडस्ट्रीयल ॲव्हरेज) १४ पट वाढला आणि ४० दशलक्ष नवीन रोजगार निर्माण झाले. सरासरी वास्तविक स्थूल राष्ट्रीय उत्पादन ३.५ टक्के होते, जे इ. स. १९३० च्या महामंदीनंतर अमेरिकेत पाचवे सर्वोच्च होते. नवीन व्यवसाय निर्मितीचा दर वेगाने वाढला; परंतु इ. स. १९३० नंतर बँकांच्या अपयशाचे प्रमाणही सर्वाधिक होते. सर्वसाधारण आर्थिक परिस्थिती अनुकूल असली, तरी अर्थव्यवस्थेने बऱ्याच प्रमाणावर अशांतताही अनुभवली. हा ‘सर्जनशील नाश’ होता, जो एका कार्यक्षम अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्य मानले जाते. अमेरिकेच्या आर्थिक इतिहासात रेगन यांच्या धोरणांमुळे सर्वांत दीर्घ मुदतीचा व सर्वाधिक भरभराटीचा काळ अवतरला.

रेगनोमिक्सचा नकारात्मक परिणाम : अमेरिकन अर्थव्यवस्थेत १९८० च्या काळात राष्ट्रीय कर्ज १ लाख कोटींवरून ३ लाख कोटी झाले. याचा अर्थ असा की, अमेरिकन लोकांनी उपभोगलेल्या आर्थिक वृद्धीच्या आनंदाची फार मोठी किंमत पुढील पिढ्यांना भोगावी लागली. प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ पॉल रॉबिन क्रूगमन यांच्या मते, अमेरिकेतील २००८ मधील महाभयंकर आर्थिक संकटास (सब-प्राईम ऋण संकटास) रेगन यांच्या कार्यकाळातील आर्थिक नियमन रद्द करण्याचे धोरण (डीरेग्युलेशन) विशेषतः तारण कर्जावरील निर्बंध शिथिल करणे हे कारणीभूत ठरले. तसेच रेगन यांनी त्यांच्या प्रशासन काळात न्यूनतम वेतन वाढविले नाही. उलट, कामगार संघटनांच्या चळवळीही मोडून काढल्या. उदा., रेगन यांनी १९८१ मध्ये बेकायदेशीर रीत्या संपावर गेल्यामुळे जवळपास १२,००० राष्ट्रीय हवाई वाहतूक नियंत्रण कामगार संघटनेच्या कामगारांना कामावरून काढून टाकले. तसेच झिरपा सिद्धांत वास्तवात फारसा उतरला नाही. श्रीमंत करदात्यांवरील कर कमी केल्याने त्यांचा चैनीच्या वस्तूंचा उपभोग वाढला. त्यामुळे गरीबांपर्यंत संपत्ती फारशी पोहोचलीच नाही. या सर्वांमुळे  उत्पन्नांतील तफावत वाढली.

अर्थशास्त्रज्ञ पिकेटी व साज यांच्या अभ्यासानुसार अमेरिकेतील सर्वांत श्रीमंत १० टक्के लोकांचा राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा १९८१ मध्ये ३१ टक्के होता. तो वाढून १९९० मध्ये ३९ टक्के झाला, तर याच काळात सर्वांत श्रीमंत १ टक्का लोकांचा राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा ८ टक्क्यांवरून १३ टक्के झाला, तर सर्वांत श्रीमंत ०.१ टक्के लोकांचा वाटा ०.५ टक्क्यांवरून २ टक्के झाला, म्हणजेच चौपट वाढला.

रेगन यांच्या आर्थिक धोरणांचा अमेरिकन अर्थव्यवस्थेवरील परिणाम संमिश्र स्वरूपाचा होता.

संदर्भ :

  • Krugman, P., The Return of Depression Economics and the Crisis of 2008, New York, 2009.
  • Niskanen, W. A., Reaganomics : An Insider’s Account of the Policies and the People, Oxford,1988.
  • Quarter­ly Journal of Economics, Oxford, 2003.

समीक्षक : राजस परचुरे