क्रूगमन, पॉल रॉबिन (Krugman, Paul Robin) : (२८ फेब्रुवारी १९५३). अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ व अर्थशास्त्राच्या नोबेल पुरस्काराचा मानकरी. क्रुगमन यांना आंतरराष्ट्रीय व्यापार, भौगोलिक अर्थशास्त्र, ग्राहकांचे विविध वस्तू व सेवा खरेदीबाबतचे अग्रक्रम यांसंदर्भातील संशोधनाबद्दल २००८ मध्ये अर्थशास्त्र विषयातील नोबेल स्मृती पुरस्कार मिळाला.

क्रुगमन यांचा जन्म अलबनी, न्यूयॉर्क येथे वडिल डेव्हिड व आई अनिता या ज्यू दांपत्यीय कुटुंबात झाला. जॉन एफ. केनेडी विद्यालय, बेलमोर येथून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर १९७४ मध्ये येल विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयातील बी. ए. ही पदवी त्यांनी संपादन केली. मॅसॅच्यूसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (M. I. T.) मधून ‘लवचिक विनिमय दरʼ या विषयावर प्रबंध लिहून १९७७ मध्ये त्यांनी पीएच. डी. मिळविली. एम.आय.टी.मध्ये शिक्षण घेत असताना अडचणीत सापडलेल्या पोर्तुगाल मध्यवर्ती बँकेला उर्जितावस्था प्राप्त व्हावी, यासाठी तेथे पाठवलेल्या तज्ज्ञांच्या गटात त्यांचा समावेश होता. सध्या ते प्रिन्स्टन विद्यापीठातील स्कूल ऑफ पब्लिक ॲण्ड इंटरनॅशनल अफेअर्स या संस्थेतील अर्थशास्त्र व आंतरराष्ट्रीय घडामोडी विषयांचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. तसेच लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे शतकी अभ्यागत प्राध्यापक व न्यूयॉर्क टाईम्स वृत्तपत्राचे सहलेखक म्हणूनही ते कार्यरत आहेत.

क्रूगमन यांनी १९७९ – १९८२ या काळात एम.आय.टी.मध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केल्यानंतर १९८२-८३ मध्ये रिगन व्हाईट हाऊसमध्ये आर्थिक सल्लागार समितीवर काम पाहिले. पुन्हा ते एम.आय.टी.मध्ये पूर्ण वेळ प्राध्यापक म्हणून १९८४ मध्ये रूजू झाले. तेथे पंधरा वर्षे अर्थशास्त्राचे अध्यापन केल्यानंतर २००० मध्ये प्रिन्स्टन विद्यापीठात आंतरराष्ट्रीय घडामोडी या विषयांचे प्राध्यापक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. एम.आय.टी.मध्ये असताना त्यांनी स्टॅनफोर्ड, येल व लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्येही अभ्यागत प्राध्यापक म्हणून योगदान दिले.

भूतपूर्व अर्थशास्त्रज्ञ डेव्हिड रिकार्डो (David Ricardo) आणि हेक्चेर-ओहलीन यांनी व्यापारातील तौलनिक नफा (लाभ) हा आंतरराष्ट्रीय व्यापारातील पायाभूत घटक मानला. त्यापुढे जाऊन क्रुगमन यांनी आंतरराष्ट्रीय व्यापाराची वेगळी मांडणी केली. विसाव्या शतकात अनेक बाबतीत साम्य असलेल्या देशांमधील व्यापाराचे प्रमाण मोठे होते. त्याचे विश्लेषण केवळ तौलनिक नफा या निकषाच्या आधारे करणे योग्य नसल्याचे त्यांनी दाखवून दिले. १९७९ मध्ये जर्नल ऑफ इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स या नियतकालीकामध्ये लिहिलेल्या लेखात यासंदर्भात त्यांनी दोन गृहीतके मांडली. पहिले, ग्राहक विविध प्रकारच्या वस्तूंची प्रतवारी पसंत करतात व दुसरे, विविध देशांत मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्याचे फायदे भिन्न असतात. विविध देशांत उत्पादित होणारी चार चाकी वाहने हे यासंदर्भातील महत्त्वाचे उदाहरण होय. क्रूगमन यांच्या ग्राहकांच्या सेवन कार्यातील अग्रक्रम व मोठ्या प्रमाणावरील उत्पादनाचे फायदे या नवीन व्यापार सिद्धांत विचारधारेचा प्रभाव नंतरच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या विश्लेषणावर ठळकपणे जाणवतो. त्यांनी नवीन व्यापार सिद्धांताची सांगड नवीन आर्थिक भूगोल (New Economic Geography) या नूतन संकल्पनेशी घातली. ग्राहकांच्या पसंतीच्या वस्तूंचे उत्पादन जास्त लोकसंख्या व उत्पन्न असलेल्या देशांत, शहरांत एकवटेल व त्याचा प्रभाव आंतरराष्ट्रीय व्यापारावर असेल असे त्यांचे मत होते. आंतरराष्ट्रीय व्यापार, वित्तव्यवस्था, स्थूल अर्थशास्त्र व राजकोषीय नीती या क्षेत्रांतही त्यांनी भरीव कामगिरी केली.

क्रूगमन यांनी जून २०१२ मध्ये रिचर्ड लेयार्ड यांच्या सहकार्याने आर्थिक घडामोडीसंबंधी जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यात देशातील बेरोजगारी कमी व्हावी व आर्थिक विकास साधला जावा यांसाठी अर्थव्यवस्थेला राजकोषीय गती देणे महत्त्वाचे असे त्यांनी स्पष्ट केले. क्रूगमन यांच्या या मांडणीला सामान्यांपासून अर्थतज्ज्ञांपर्यंत मोठा पाठिंबा लाभला.

क्रूगमन यांनी स्वतंत्रपणे तसेच सहकाऱ्यांसह पुढील महत्त्वाची ग्रंथ लिहिली : मार्केट स्ट्रक्चर ॲण्ड फॉरेन ट्रेड (१९८५ – सहलेखक), ॲडजस्टमेंट इन दि वर्ल्ड इकॉनॉमी (१९८७), रिथिंकिंग इंटरनॅशनल ट्रेड (१९९०), जिऑग्रफी ॲण्ड ट्रेड; दि रिस्क फेसिंग दि वर्ल्ड इकॉनॉमी  (१९९१ – सहलेखक), (१९९१), करन्सीज ॲण्ड क्रायसिस (१९९२), व्हाट डू वूई निड टू नो अबाउट दि इंटरनॅशनल मॉनेटरी सिस्टिम ? (१९९३), पेंडिंग प्रॉस्पेरिटी (१९९४), डेव्हलपमेंट, जिऑग्रफी ॲण्ड इकॉनॉमिक थिअरी आणि वर्ल्ड सेव्हिंग्ज शॉर्टेज (१९९४), फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट इन दि यूनायटेड स्टेट्स (१९९५), दि सेल्फ ऑर्गनायझिंग इकॉनॉमी (१९९६), पॉप इंटरनॅशनॅलिझम (१९९६), इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स (१९९८), दि ॲक्सिडेंटल थिअरिस्ट : ॲण्ड अदर डिस्पॅचेस फ्रॉम दि डिसमॉल सायन्स (१९९८), दि स्पेशियल इकॉनॉमी  : सिटिज, रीजन्स ॲण्ड इंटरनॅशनल ट्रेड (१९९९ – सहलेखक), फझ्झी मॅथ : दि इसेन्शल गाईड टू दि बूश टॅक्स प्लॅन (२००१), दि ग्रेट अनरेव्हलिंग (२००३), इकॉनॉमेट्रिक्स (२००४), इकॉनॉमिक्स : थिअरी ॲण्ड पॉलिसी (२००५ – सहलेखक), दि कॉन्शस ऑफ ए लिबरल (२००७), एंड धिस डिप्रेशन नाऊ ! (२०१२), दि रिटर्न ऑफ डिप्रेशन इकॉनॉमिक्स ॲण्ड दि क्रायसीस ऑफ २००८ (२०१२), शुल्ड वुई टॅक्स दि रिच मोर? : दि मंक डिबेट ऑन इकॉनॉमिक (२०१३ – सहलेखक), इंटरनॅशनल ट्रेड : थिअरी ॲण्ड पॉलिसी (२०१४ – सहलेखक). यांशिवाय त्यांचे अनेक लेख व शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत.

क्रूगमन यांना नोबेल पुरस्काराव्यतिरिक्त त्याच्या अर्थशास्त्रातील संशोधनकार्याबद्दल पुढील सन्मान लाभले : अमेरिकन इकॉनॉमिक असोसिएशनचे जॉन बेट्स क्लार्क मेडल (१९९१), अमेरिकन अकॅडमी ऑफ आर्टस ॲण्ड सायन्स फेलोशिप (१९९२), ॲडम स्मिथ अवॉर्ड (१९९५), डॉक्टर ऑफ ऑनर्स इन इकॉनॉमिक्स बर्लिन विद्यापीठ (१९९८), एच. सी. रेक्टेनवाल्ड प्राइझ इन इकॉनॉमिक्स एरलांगेन न्यूरेंबर्ग विद्यापीठ, जर्मनी (२०००), प्रिन्सेस ऑफ ऑस्ट्रियाज अवॉर्ड, स्पेन (२००४), डॉक्टर ऑफ लॉज-कॅनडा (२०१३), ग्रीन टेम्प्लेटन कॉलेज-ऑक्सफर्ड अवॉर्ड आणि जेम्स जॉयसे अवॉर्ड (२०१४).

क्रूगमन यांनी १९८३ मध्ये रॉबिन लेल्सी बर्गमन हिच्याशी विवाह केला.

समीक्षक – संतोष दास्ताने

प्रतिक्रिया व्यक्त करा