जर्मनीची एक मध्यवर्ती बँक. ड्यूश बंडेस बँक ही यूरोपातील मध्यवर्ती बँकिंग व्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. ही बँक तिच्या वित्तीय सामर्थ्य व प्रचंड आकारामुळे यूरोपात अत्यंत प्रभावशाली आहे. यूरोपियन मध्यवर्ती बँक व ड्यूश बंडेस बँक यांचे मुख्य कार्यालय जर्मनीतील फ्रँकफुर्ट येथे आहे. ड्यूश बंडेस बँकेच्या जर्मनीत ३५ शाखा असून ९ ठिकाणी विभागीय कार्यालये आहेत.
ड्यूश बंडेस बँकेची स्थापना १९५७ मध्ये झाली. त्यापूर्वी जर्मनीत बँक ऑफ ड्यूशर लँडर ही बँक अस्तित्वात होती; जिने इ. स. १९४८ मध्ये जर्मनीच्या मार्क या चलनाची सुरुवात केली. यूरोपात युरो या चलनाचा विस्तार होईपर्यंत (२००२) ड्यूश बंडेस बँक हीच चलनाचे व्यवहार पाहत होती. संपूर्ण यूरोपात स्वतंत्र मध्यवर्ती बँकेची संकल्पना प्रथम ड्यूश बंडेस बँकेच्या माध्यमातून राबविली गेली. भाववाढीच्या नियंत्रणासाठी भाववाढ लक्ष्यी धोरण राबविणाऱ्या न्यूझीलंड या देशापेक्षा ड्यूश बंडेस बँक हे प्रतिमान अत्यंत वेगळे आहे. यूरोपीय मध्यवर्ती बँकेनेदेखील याच प्रतीमानांचा स्वीकार केल्याचे दिसते.
विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात यूरोपात भाववाढीचे नियंत्रण करण्यात ड्यूश बंडेस बँकेचे मोठे योगदान आहे. ड्यूश बंडेस बँकेची ही कार्ये यूरोपीय मध्यवती बँकेच्या धोरणानुसार पार पाडली जातात. यूरोपीय मध्यवर्ती बँकेची स्थापना होईपर्यंत जर्मनीसाठी ड्यूश बंडेस बँकेचे कार्य अत्यंत महत्त्वपूर्ण होते. यूरोपीय मध्यवर्ती बँकेची स्थापना १९९३ मध्ये झाली. त्यानंतर ड्यूश बंडेस बँकेचे कार्ये यूरोपीय बँकेकडे हस्तांतरित केली गेली. २००१ मध्ये यूरोपात सामायिक चलन प्रदेशाची (कॉमन करन्सी एरिया) निर्मिती होऊन संपूर्ण यूरोपात युरो या सामायिक चलनाचा वापर सुरू झाला. पर्यायाने ड्यूश बंडेस बँकेच्या कायद्यात बदल करावा लागला आणि २००२ मध्ये या बँकेची पुनर्रचना करण्यात आली. या कायद्यातील सुधारणांनुसार या बँकेची कार्ये ४ भागांत विभागली गेली : (१) अर्थव्यवस्थेत चलनाची छपाई करून चलनाचा पुरवठा करणे. (२) व्यावसायिक बँकांची बँक म्हणून काम पाहणे. (३) सरकारची बँक म्हणून काम करणे. (४) सोने, परकीय चलन गंगाजळी इत्यादींचे व्यवस्थापन करणे.
ड्यूश बंडेस बँकेचा इतिहास हा जर्मनी या देशाच्या इतिहासाएवढाच जुना असून यूरोपातील अर्थव्यवस्थेच्या वित्तीय नियमन व आर्थिक स्थैर्याच्या दृष्टीने ड्यूश बंडेस बँकेचे योगदान खूप मोठे आहे. तसेच ही बँक यूरोपीय मध्यवर्ती बँकेची सर्वांत मोठी भागधारक आहे. यूरोपातील इतर अर्थव्यवस्थांची आर्थिक क्षमता लक्षात घेता चलन तुटवडा वा इतर कारणांमुळे वित्तीय अथवा चलन विषयक संकट निर्माण झाल्यास ड्यूश बंडेस बँकेला महत्त्वाची भूमिका पार पाडावी लागते. यूरोपीय संघाची एकता व वित्तीय तथा चलनविषयक प्रतिष्ठा टिकविण्याची नैसर्गिक जबाबदारी ड्यूश बंडेस बँकेची असल्याने यूरोपीय संघाचे अस्तित्व व भविष्य ड्यूश बंडेस बँकेच्या कार्यक्षमतेवर बऱ्याच अंशी अवलंबून आहे.
समीक्षक : विनायक गोविलकर