सेबीची एक नोंदणीकृत वित्तीय संस्था. युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया अधिनियम १९६३ नुसार १९६४ मध्ये युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया या वित्तीय संस्थेची स्थापन करण्यात आली. हे ट्रस्ट सार्वजनिक क्षेत्रात कार्यरत आहे. त्यावर केंद्र सरकारचे वित्तमंत्रालय, भारतीय रिझर्व्ह बँक आणि सेबी यांचे नियंत्रण आहे. युटीआयची नोंदणी १ फेब्रुवारी २००३ रोजी सेबीमध्ये करण्यात आली. युटीआयचे मुख्य कार्यालय मुंबई येथे असून जपान, सिंगापूर, लंडन, दुबई, बहरिन या देशांमध्ये तिच्या शाखा आहे. ही जीवन व्यवस्थापनाच्या म्युच्युअल फंड क्षेत्रात भारतातील सातवी मोठी संस्था आहे. देशाच्या व जागतिक पातळीवर ही संस्था सर्वसामान्य लोकांकडून युनिटद्वारे भांडवल गोळा करण्याचे काम करते. देशाच्या आर्थिक विकासास हातभार लावणे, लोकांना बचतीची सवय लावणे आणि त्यांना आर्थिक विकासाच्या प्रवाहामध्ये सहभागी करून घेणे हे या संस्थेचे मुख्य उद्देश आहे.

युटीआयच्या स्थापनेनंतर म्युच्युअल फंड बाजारात विक्रीसाठी आणले गेले. तेव्हापासून त्यांना युटीआय म्युच्युअल फंड असे म्हटले जाऊ लागले. देशात १९६५ मध्ये म्युच्युअल फंडामधील गुंतवणूक ही २५ कोटी रूपये होती. मार्च २०२३ मध्ये युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाची वित्तीय स्थिती सुमारे ४३,७३२.१ आहे.

युटीआयकडून १९८६ मध्ये इंडिया फंड नावाचा म्युच्युअल फंड सुरू करण्यात आला. या फंडामार्फत भारतीय व विदेशी नागरिक यांच्या ठेवी संकलित करण्यात आल्या. मास्टर शेअर ही दुसरी म्युच्युअल फंड योजनाही सुरू करण्यात आली. त्यामुळे अनेक बँका व वित्तीय संस्था या म्युच्युअल फंड योजनेकडे आकर्षित झाल्या. युटीआयची वाढ १९८० पासून झपाट्याने झाली. मध्यम वर्गीय आणि निम्न मध्यम वर्गीय लोकांना त्यांच्या बचतीची गुंतवणूक करण्याचे साधन म्हणून म्युच्युअल फंडला अधिक लोकप्रियता मिळाली. म्युच्युअल फंड या गुंतवणूक संघटनेमध्ये अनेक धंदेवायिक लोक आहेत. विविध गटांतील लोकांकडून म्युच्युअल फंडच्या स्वरूपात निधी गोळा करून विविध रोख्यात गुंतवितात. सार्वजनिक क्षेत्रात १९८७ ते १९९२ या काळात सात नवीन म्युच्युअल फंडांची स्थापना झाली. केंद्र सरकारने १९९३ मध्ये धोरणात बदल करून खासगी आणि परदेशी संस्थात्मक म्युच्युअल फंड क्षेत्रात प्रवेश दिला. मार्च २००० अखेर युटीआयशिवाय भारतात सार्वजनिक क्षेत्रात ९ आणि खासगी क्षेत्रात २७ असे एकूण ३६ म्युच्युअल फंड कार्यरत होते.

प्रकार : युटीआयचे प्रमुख दोन प्रकार आहेत ꞉

(१) खुला निधी ꞉ या फंडात रक्कम कालावधी लवचिक किंवा परिवर्तनीय असतो, म्हणून या फंडाला खुला निधी असे म्हणतात. या प्रकारात म्युच्युअल फंडाद्वारे किती रक्कम उभी करायची, ते ठरलेले नसते. गुंतवणूकदारांवर गुंतवणूक केव्हा करायची, याबाबत कोणतेही बंधन नसते. गुंतवणूकदार या निधीत केव्हाही रक्कम गुंतवणूक करतात, तसेच गुंतवणूक मोकळी म्हणजे काढून घेतात. ठेवी ठेवणे व ठेवी काढून घेणे हे या फंडाचे कार्य असते. गुंतवणूकदाराने ठेवी ठेवल्यास त्याच्या बँक खात्यावर भाग किंवा युनिट जमा दाखविले जातात. भाग किंवा युनिटच्या बाजार मूल्याची माहिती गुतवणूकदारांना नियमितपणे दिली जाते. गुंतवणूकदारांना भाग किंवा युनिटचा मोबदला त्या त्या वेळी ठरलेल्या प्रमाणात कोणत्याही स्वरूपात दिले जात नाही.

(२) बंदिस्त निधी ꞉ यामध्ये गुंतवणुकीची रक्कम आणि कालावधी हा निर्धारित किंवा निश्चित असतो. ३१ मार्च २०१९ अखेर या संस्थेच्या एकूण १९५ योजना कार्यान्वित होत्या. त्यांपैकी २५ समभाग निधी, १५३ कर्ज निधी आणि इतर निधी या वर्षाअखेर विविध योजनांमधील एकूण गुंतवणूकदार १.०७ कोटी फोलीओ गुतवणूकदार होते.

कार्ये ꞉

  • अनेक भागधारकांच्या एकत्रित निधी प्रतिभूतीच्या वैविध्यपूर्ण गटात विभागून गुंतविणे व निश्चित एकत्रीकरण करणे.
  • फंडाचे व्यवस्थापन करणे.
  • व्यक्ती व संस्था यांना गुंतवणुकीचे ज्ञान नसेल, तर त्यांना ते उपलब्ध करून देणे.
  • गुंतवणुकीची संधी उपलब्ध करून देणे.
  • युनिटमार्फत वैविध्यपूर्ण गुंतवणूक व कमी खर्चात व्यावसायिक निधी व्यवस्थापन, गुंतवणूक तरलता निर्माण करून सुरक्षित ठेवणे.
  • लोकांकडून एकत्रित गुंतवणुकीसाठी निधी गोळा करणे.
  • औद्योगिक प्रकल्पांना विस्तारासाठी निधी उभारून देणे.
  • मोठ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी बचत साठविलेल्या गुंतवणूकदारांना युनिटच्या माध्यमातून एकत्र आणणे आणि त्यांच्या आर्थिक समस्या सोडविणे.
  • साधनसंपत्तीचे संकलन करण्यासाठी मध्यस्थी म्हणून काम करणे.
  • अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणुकीचे विभाजन भाग, ऋणपत्र (डिबेंचर्स), बंधपत्र (बाँड्स) यांसारख्या साधनांतून निवड करणे, त्यांमधून गुंतवणूक व्यवसायाची वृद्धी करणे इत्यादी.

युटीआय किंवा म्युच्युअल फंड यांच्या माध्यमातून गुंतवणुकीचे अनेक प्रकारच्या प्रतिभूतीमध्ये विभाजन करून गुंतवणुकीच्या संदर्भातील जोखीम किंवा चिंता कमी करता येते. युटीआयच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या प्रतिभूती खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसा वापरतात. त्यामुळे विविध विभागात गुंतवणूक होते. युटीआय किंवा म्युच्युअल फंड सर्व प्रकारच्या गुंतवणुकीबाबत निर्णय घेतात. कोणत्याही प्रतिभूतीची खरेदी-विक्री केली जाते आणि कमी खर्चात सेवा पुरविल्या जातात. भागधारकांना उत्पन्नाचे वाटप होण्यापूर्वी व्यवस्थापनाचा खर्च एकूण गोळा केलेल्या निधीमधून वगळला जातो.

केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर एम. नरसिंह यांच्या अध्यक्षतेखाली म्युच्युअल फंडासंदर्भात एक समिती नेमली. या समितीने शिफारस केली की, म्युच्युअल फंड व्यवसाय योग्य पद्धतीने चालविण्यासाठी स्पर्धात्मक परिस्थिती निर्माण केल्यास या फंडाची उभारणी व कामकाज योग्य पद्धतीने करता येईल. कर सवलतीच्या क्षेत्रात युटीआयसह वित्तीय म्युच्युअल फंडांना समान वागणूक देण्यात यावी.

भारतीय शेअर बाजारात २००८ मध्ये झालेल्या घोटाळ्यामुळे सुमारे दोन वर्षांपर्यंत म्युच्युअल फंड योजनेची घसरण झाली. यावेळी युटीआय आणि सार्वजनिक क्षेत्रातील म्युच्युअल फंड योजनेला फार मोठ्या संकटातून जावे लागले. या सर्व कारणांमुळे म्युच्युअल फंड अडचणीत आल्याने गुंतवणूकदारांच्या अपेक्षा पूर्ण करणे कठीण झाले. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या अपेक्षा व फंड व्यवस्थापनाची कार्यक्षमता यांमधील समतोल बिघडला; मात्र आता म्युच्युअल फंड उद्योग हा भारतीय बाजारात स्थिर झाल्याचे दिसून येते. वित्तीय क्षेत्रात व्यवस्थापक, बँकर्स, संस्थापक मंडळे यांच्याकडे पुरेसे कौशल्य असल्यामुळे म्युच्युअल फंडांना सध्या धोका नाही; परंत वेगाने बदलणाऱ्या बाजाराच्या स्थितीचे आकलन करण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. म्युच्युअल फंडात घोटाळा झाला, तर या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात मंदी येऊ शकते. युटीआयमध्ये गुंतवणूक केल्याने त्या पैशांचा उपयोग देशाच्या आर्थिक विकासासाठी केला जातो.

समीक्षक ꞉ ज. फा. पाटील