पक्षिवर्गाच्या कॅरॅड्रीफॉर्मिस (Charadriiformes) गणाच्या वॅडर्स (Waders) या उपगणातील जॅकॅनिडी (Jacanidae) या कुलात कमळपक्ष्याचा (Jacana) समावेश होतो. हा पाणपक्षी असून याच्या जवळपास आठ प्रजाती आहेत. त्यापैकी लांब शेपटीचा कमळपक्षी व कांस्य पंखी कमळपक्षी या दोन प्रजाती भारतात सर्वत्र आढळतात. याच्या इतर सहा प्रजातींमध्ये आफ्रिकन कमळपक्षी (ॲक्टोफिलोर्निस आफ्रिकेनस; Actophilornis africanus), उत्तरीय किंवा अमेरिकन कमळपक्षी (जॅकाना स्पिनोसा; Jacana spinosa), तुरेवाला किंवा ऑस्ट्रेलियन कमळपक्षी (इरेडिपॅरा गॅलिनेसिया; Irediparra gallinacea), मादागास्कर कमळपक्षी (ॲक्टोफिलोर्निस ॲल्बिन्यूचा; Actophilornis albinucha), गुलुली असलेला कमळपक्षी (जॅकाना जॅकाना; Jacana jacana) आणि छोटा कमळपक्षी (मायक्रोपॅरा कॅपेन्सिस; Microparra capensis) या प्रजातींचा समावेश होतो.
लांब शेपटीचा कमळपक्षी (Pheasant tailed jacana) : याला पाणमोर असेही म्हणतात. याचे शास्त्रीय नाव हायड्रॉफेशनस कायरुर्गस (Hydrophasianus chirurgus) असे आहे. तरंगणाऱ्या वनस्पती असलेल्या लहान-मोठ्या तलावांमध्ये हे कमळपक्षी आढळतात. हे पक्षी उष्णकटिबंधीय भारत, दक्षिण-पूर्व आशिया आणि इंडोनेशिया येथील निवासी प्रजननकर्ता आहेत. कमळपक्ष्याची ही प्रजाती भारताप्रमाणेच बांगलादेश, कंबोडिया, चीन, इंडोनेशिया, जपान, मलेशिया, म्यानमार, नेपाळ, ओमान, पाकिस्तान, फिलिपिन्स, सिंगापूर, श्रीलंका, तैवान, थायलंड, व्हिएतनाम या देशांतही आढळतात. तसेच हे उष्णकटिबंधीय आशियात पश्चिमेकडील येमेनपासून पूर्वेकडे फिलिपिन्सपर्यंत आढळत असून त्यांच्या या क्षेत्रामध्ये ते हंगामाप्रमाणे स्थलांतर करतात. लांब अंतरावर स्थलांतर करणारी ही कमळपक्ष्याची एकमेव प्रजाती आहे.
कमळपक्ष्याच्या इतर सर्व प्रजातींमध्ये ही प्रजाती आकाराने सर्वांत मोठी आहे. हे पक्षी सु. ३० सेंमी. लांब असून मादी नरापेक्षा मोठी असते. मादीचे वजन १९०—२३० ग्रॅ., तर नराचे वजन १२०—१४० ग्रॅ. असते. प्रौढ पक्ष्याचे पंख साधारण १९—२४ सेंमी. लांब, तर पिलांचे पंख १६—२२ सेंमी. लांब असतात. घोट्याच्या व पायाच्या आतील अस्थी (Tarsus bone) ४—६ सेंमी. लांब असतात. हे पक्षी उथळ पाण्याजवळ आणि दलदल असलेल्या भागांमध्ये आढळतात. पायांचा रंग हिरवट छटायुक्त असून पायाची बोटे आणि नखे लांब असतात, त्यामुळे ते उथळ पाण्यातील वनस्पतींच्या पानांवरही सहजपणे चालू शकतात.
या पक्ष्याचा विणीचा हंगाम उत्तर आशियात उन्हाळ्यामध्ये, तर भारत, श्रीलंका, दक्षिण-पूर्व आशियात पावसाळ्यामध्ये असतो. दक्षिण भारतात जून ते सप्टेंबर हा विणीचा हंगाम असतो. विणीच्या हंगामात मादीच्या तुलनेत नर खूप आकर्षक दिसतो. परिपक्व कमळपक्ष्यामध्ये तीक्ष्ण पांढरे मणिबंध (Carpal spur) विकसित झालेले असून मादीमध्ये ते अजून लांब असतात. स्वसंरक्षणासाठी याचा वापर केला जातो. शेपटी लहान व मजबूत असते. विणीच्या हंगामात याच्या शरीराची शेपटीसहित लांबी ४०—६० सेंमी. इतकी असते. शेपटी अधिक म्हणजे २५—३० सेंमी. लांब होते. प्रजनन काळात होणारा हा शेपटीमधील बदल हे या कमळपक्ष्याचे वैशिष्ट्य आहे. यावरूनच त्याला लांब शेपटीचा कमळपक्षी असे म्हणतात. प्रजनन काळात त्याचा चेहरा, मान आणि पंख यांवर शुभ्र पांढरा रंग असतो. मानेच्या मागील भागावर रेशमी सोनेरी पिवळसर रंगाचा पट्टा असतो. शरीर तपकिरी रंगाचे असते. उड्डाण करताना पांढरे शुभ्र पंख आणि त्यांना काळसर किनार तयार होते. पंखांचे आवरण फिकट तपकिरी असून त्यावर चमकदार हिरवी किंवा जांभळी झूल असते. विणीचा हंगाम नसताना डोक्याचा आणि पाठीचा वरचा भाग गडद तपकिरी रंगाचा असतो. मानेच्या मागच्या भागावर काही सोनेरी पिसे असतात. मानेवर गडद रंगाची गळपट्टी असते व कडेने पांढऱ्या रेषा खाली येतात.
या पक्ष्याची चोच विणीच्या हंगामात कांस्य-पंखी कमळपक्ष्यांपेक्षा बारीक, निळसर काळी आणि टोकाला पिवळी असते. विणीचा हंगाम नसतो तेव्हा चोचीचा रंग फिकट तपकिरी आणि तळाशी पिवळसर असतो. डोळे तपकिरी रंगाचे असून पाय गडद निळसर करड्या रंगाचे असतात.
मादी ही बहुनरगामी (Polyandrous mating system) स्वरूपाची असते. एकावेळी अनेक नरांबरोबर संबंध ठेवत असल्याने मादी एका विणीच्या हंगामामध्ये एकावेळी साधारण दहा अंडी घालते. नर पक्षी मादीभोवती पिसारा फुलवून, नाचून, वेगवेगळे आवाज काढून तिला प्रभावित करण्याचा प्रयत्न करतो. मादी पाणवनस्पतींची पाने आणि देठांच्या साहाय्याने किंचित खोलगट घरटे बांधते. मादी घरट्यामध्ये चार चकचकीत काळे ठिपके असलेली गडद हिरवट तपकिरी अंडी घालते. दोन अंडी घालण्यात २४ तासांचा कालावधी असतो. एक किंवा दोन अंड्यांचा टप्पा झाला की मादी नवे घरटे बांधते. चार अंडी घातली की नर ही अंडी उबवण्यास सुरुवात करतो आणि मादी अंडी घालण्यासाठी दुसऱ्या घरट्याकडे जाते. अंड्यांचा उबवण कालावधी २६–२८ दिवसांचा असतो. उबवणीच्या सुरुवातीच्या काळात मादी घरट्याचे इतर पाणपक्ष्यांपासून संरक्षण करते.
संकटकाळी नर पक्षी चोचीच्या, पंखांच्या किंवा छातीच्या साहाय्याने अंडी इकडून तिकडे नेतात, तर कधी कधी पाणवनस्पतींच्या पानांवर अंडी ढकलून तरंगत नेतात. संकटाच्यावेळी नर पक्षी साधारण १५ मी. लांबपर्यंत घरट्याची जागा बदलतात. शत्रूचे लक्ष विचलित करण्यासाठी नर पक्षी तुटलेल्या पंखांचा पिसारा घेऊन उंदरासारखे धावून दाखवतात. अंड्यातून नुकतीच बाहेर पडलेली पिले घाबरली असता किंवा नर पक्ष्याने इशारा केला असता ती पाण्यात बुडी मारतात व पाण्याबाहेर फक्त चोच बाहेर काढून धोका टळण्याची वाट पाहतात.
उन्हाळ्यात हे पक्षी विखुरले जातात. सोकोत्रा, कतार, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण जपान या भागांत कमळपक्ष्यांची नोंद भटके पक्षी म्हणून झाली आहे. ही प्रजाती सामान्यत: कमी उंचीवर उडणारी आहे. परंतु, हे पक्षी उन्हाळ्यामध्ये काश्मीरमधील ३,६५० मी. उंचीवरील विशनसर तलाव येथे आणि लहुलमध्ये ३,८०० मी. उंचीवर तसेच हिमालयाच्या २,००० मी. उंचीपर्यंत आढळतात.
या पक्ष्याच्या अन्नाचा मुख्य स्रोत कीटक, मृदूकाय प्राणी जसे गोगलगाय, शिंपले आणि तरंगणाऱ्या वनस्पती तसेच पाण्याच्या पृष्ठभागावरील अपृष्ठवंशीय प्राणी हा आहे. तसेच ते तंतुमय शैवाल, वनस्पतींच्या बीया आणि वनस्पतीदेखील खातात. पाण्यात पोहत किंवा पाणवनस्पतींवर चालत ते आपले अन्न शोधत असतात. हे पक्षी खोल पाण्यामध्ये सूर मारण्यात पटाईत असतात. जलाशयामध्ये ते ५०—१०० अशा संख्येने दिसतात. ते पाण्याच्या पृष्ठभागावर कमी उंचीवर उडतात; मात्र, हवेत ते एकत्र एखाद्या शिकारी पक्ष्याप्रमाणे उंच उडतात.
हिवाळ्यात थवेच्या थवे मी-मियुनऽऽ असा आवाज काढत फिरत असतात. विणीच्या हंगामात नर आणि मादीचे आवाज वेगवेगळे असतात. लहान पिले चोच बंद ठेऊन लहानसा परंतु, किंचित कर्कश्श किलकिलाट करतात.
वंचक (Pond Heron) पक्षी लांब शेपटीच्या कमळपक्ष्यांच्या अंड्यांची शिकार करतात, तर कापशी घार (Black-winged kite) त्यांच्या पिलांची शिकार करते. ही कमळपक्ष्याची प्रजाती व्यापक असल्याने ही प्रजाती धोक्याच्या उंबरठ्यावर नाही. परंतु, तैवानमधील या पक्ष्यांचा अधिवास सध्या धोक्यात आला आहे. लांब शेपटीच्या कमळपक्ष्याची आयुर्मयादा सु. ७ वर्षे आहे.
कांस्य पंखी कमळपक्षी (The Bronze Winged Jacana) : याचे शास्त्रीय नाव मेटोपिडिअस इंडिकस (Metopidius inducus) असे आहे. याच्या पंखांचा रंग पिवळसर तपकिरी असून त्यावर चकचकीत हिरव्या-जांभळ्या रंगाची छटा असते. डोके, मान, छाती काळ्या रंगाची असते. डोळ्याच्या वरच्या भागापासून ते मानेच्या मागील भागापर्यंत जाणारा पांढऱ्या रंगाचा पट्टा असतो. चोच हिरवट पिवळी असून वरील चोचीच्या (Mandible) बुडाशी लाल असते. वरील चोचीपासून निघणारा निळसर लाल रंगाचा चट्टा (Lappet) कपाळापर्यंत जातो. याची शेपटी आखूड व जाड; तपकिरी लाल रंगाची असून तिच्या कडा काळ्या रंगाच्या असतात. पाय फिकट हिरवट रंगाचे असतात. पायाची बोटे लांब, सरळ असून पायाच्या मागील बोटाचे नख इतर बोटांच्या नखांपेक्षा लांब असते. या पक्ष्याचा आढळ दक्षिण व दक्षिण-पूर्व आशियामध्ये आहे. नर-मादी दिसायला सारखेच असून मादी आकाराने नरापेक्षा मोठी असते. याची लांबी सु. २९ सेंमी. असते. याचा अधिवास लांब शेपटीच्या कमळपक्ष्याप्रमाणेच आहे. या प्रजातीचा प्रसार भारतीय उपखंडात सर्वत्र परंतु, श्रीलंका व पाकिस्तान येथे आढळत नाही.
कमळपक्ष्याच्या इतर सर्व प्रजातींमध्ये आकाराने लहान असलेल्या छोट्या कमळपक्ष्याची लांबी १५–१६ सेंमी. असून त्याचे वजन सु. ४१ ग्रॅ. इतके असते. आफ्रिकन कमळपक्ष्याचे आयुर्मान हे इतर प्रजातींच्या तुलनेत अधिक म्हणजेच ५–१० वर्षे असते.
संदर्भ :
- https://ebird.org/species/afrjac1
- https://en.wikipedia.org/wiki/Pheasant-tailed_jacana
- https://www.thainationalparks.com/species/pheasant-tailed-jacana
- https://www.oiseaux-birds.com/card-pheasant-tailed-jacana.html
समीक्षक : मोहन मद्वाण्णा