ब्रूम, रॉबर्ट (Broom, Robert) : (३० नोव्हेंबर १८६६ – ६ एप्रिल १९५१). प्रसिद्ध दक्षिण आफ्रिकन पुराजीवशास्त्रज्ञ. त्यांचा जन्म स्कॉटलंडमधील पेझ्ली येथे एका गरीब कुटुंबात झाला. इ. स. १८९५ मध्ये त्यांनी ग्लासगो विद्यापीठाची डी. एस. सी. ही वैद्यकाची पदवी मिळविली. त्यानंतर त्यांनी वैद्यकीय व्यवसायाला सुरुवात केली. इ. स. १८९७ मध्ये ते दक्षिण आफ्रिकेत गेले व तेथे स्थायिक झाले. तत्पूर्वी ते काही काळ ऑस्ट्रेलियात वास्तव्यास होते. तेथे त्यांचा विवाह मेरी बेली यांच्याशी झाला. ब्रूम यांनी वैद्यकीय व्यवसाय हा पृष्ठवंशीय प्राण्यांच्या अभ्यासाशी जोडून घेतला होता. त्यांनी इ. स. १९०३ ते १९१० या काळात व्हिक्टोरिया महाविद्यालय, स्टेलेनबॉश येथे प्राणिशास्त्र आणि भूगर्भशास्त्र या विषयांचे प्राध्यापक म्हणून काम केले.

ब्रूम हे स्मुट्स यांच्या मदतीने प्रिटोरियाच्या ट्रांसव्हाल संग्रहालयात पुराजीवशास्त्र विभागात त्यांचे सहकारी म्हणून रुजू झाले. त्यानंतर इ. स. १९३६ मध्ये पृष्ठवंशीय प्राण्यांच्या जीवाश्मांच्या ट्रांसव्हाल संग्रहालयात ते अभिरक्षक म्हणून काम करताना स्वार्टक्रान्स, क्रोमद्राई आणि स्टर्क फाउंटन या गुहास्थळांच्या उत्खननांत सहभागी झाले. त्या ठिकाणी ते आणि त्यांचे सहकारी जॉन रॉबिन्सन यांनी सर्वांत प्रथम एका संपूर्ण वाढ झालेल्या माणसाची कवटी शोधून काढली (इ. स. १९४७). ज्याला त्यांनी पॅरान्थ्रोपस रोबोस्टस (टोपणनाव ‘मिसेस प्लेस’) असे नाव दिले. तसेच सहा होमिनीड जीवाश्मांचे जबडे, दात, इतर बारीकसारीक हाडे इत्यादी शोधून काढली. यामध्ये ऑस्ट्रॅलोपिथेकस ऑफ्रिकॅनस आणि प्लेसिअँथ्रोपस ट्रान्सव्हॅलॅसिन्स या जीवाश्मांचा समावेश आहे. वर्गीकरण अभ्यासामध्ये ऑस्ट्रॅलोपिथेसिने या गटाचा उल्लेख उपकुटुंब असा करावा, असे त्यांनी सूचविले होते. टाँग या लहान बाळाच्या कवटीविषयी अभ्यास करून ऑस्ट्रॅलोपिथेकस हे उभ्या अवस्थेत चालू शकत असावेत, या रेमंड डार्ट यांच्या मताशी ब्रूम सहमत होते.

ब्रूम यांनी प्रागैतिहासिक जीवनाच्या अभ्यासात मोलाचे योगदान दिले. ज्यामुळे मानवी अस्तित्वाबद्दलची विस्तृत माहिती मिळण्यास मदत झाली. ब्रूम यांना दमा व इतर श्वसन विकारांचा त्रास होता. त्यामुळे ते समुद्रकिनारी राहात होते. तेथे त्यांना सागरी जीवविज्ञानाची माहिती निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांकडून मिळाली होती; तर तेथे येणाऱ्या निसर्गवैज्ञानिकांमुळे त्यांना निसर्गविज्ञानातही गोडी निर्माण झाली. तसेच वनस्पतीविषयक माहिती आणि चित्रकला व उदारमतवादी धार्मिक दृष्टिकोण हेसुद्धा त्यांच्या वडिलांकडून मिळाले होती.

ब्रूम यांनी रॉबिनसन यांच्याबरोबर ऑस्ट्रॅलोपिथेकसविषयी असंख्य संशोधन निबंध आणि विविध विषयांवर विपुल लेखन केले. त्यांची स्टर्क फाउंटन ॲप-मॅन प्लेसिअँथ्रोपस (१९५०); द कमिंग ऑफ मॅन; द मॅम्मल-लाइक रिप्टिलीज ऑफ साउथ आफ्रिका इत्यादी ग्रंथसंपदा आहे. त्यांना इ. स. १९१३ मध्ये लंडनच्या रॉयल सोसायटीने क्रूनियन व्याख्यान देण्यास बोलाविले होते. इ. स. १९२० मध्ये ते या संस्थेचे फेलो झाले. त्यांना अनेक मानसन्मान प्राप्त असून त्यांपैकी रॉयल मेडल (इ. स. १९२८), नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सचे डॅनिएल जेरॉड इलिऑट मेडल (इ. स. १९४६) आणि वॉलास्टन मेडल (इ. स. १९४८) हे महत्त्वाचे होत.

ब्रूम यांचे दक्षिण आफ्रिकेतील प्रिटोरिया येथे निधन झाले.

संदर्भ : Srivastava, R. P., Morphology of the Primates & Human Evolution, New Delhi, 2009.

समीक्षक : सुभाष वाळिंबे