मीड, मार्गारेट (Mead, Margaret) : (१६ डिसेंबर १९०१ – १५ नोव्हेंबर १९७८). प्रसिद्ध अमेरिकन मानवशास्त्रज्ञ. मार्गारेट यांचा जन्म फिलाडेल्फिया येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव एडवर्ड आणि आईचे एमिली (नि फोग) होते. वडील पेनसिल्व्हेनिया विद्यापीठात वित्त विषयाचे प्राध्यापक होते, तर आई इटालियन स्थलांतरीतांची अभ्यासक होती. मार्गारेट यांचे शालेय शिक्षण पेनसिल्व्हेनिया, अमेरिका येथे झाले. शालेय शिक्षणानंतर त्यांनी इ. स. १९२३ मध्ये बर्नार्ड कॉलेजमधून मानवशास्त्र विषयातून बी. ए.; इ. स. १९२४ मध्ये कोलंबिया विद्यापीठातून त्याच विषयातील एम. ए. आणि इ. स. १९२९ मध्ये याच विद्यापीठातून पी. एचडी. या पदव्या संपादन केल्या.

मार्गारेट यांनी इ. स. १९४६ ते १९६९ या कालावधीत अमेरिकन म्युझीयम ऑफ नॅचरल हिस्टरी येथे वंशशास्त्राच्या प्रमुख अधिकारी होत्या. इ. स. १९४८ मध्ये त्यांची अमेरिकन अकॅडेमी ऑफ आर्टस अँड सायन्स येथे साहाय्यक पदी निवड झाली. १९५४ ते १९७८ या काळात न्यू इंग्लिश स्कूल आणि कोलंबिया विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या संस्थेत त्या मानवशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका होत्या. १९६८ ते १९७० मध्ये न्यूयॉर्कमधील लिंकन सेंटर कँपस फोरधाम विद्यापीठात मानवशास्त्राच्या प्राध्यापिका आणि समाजशास्त्र विभागाच्या अध्यक्षा होत्या. त्यांनी ऱ्होड आयलंड विद्यापीठात समाजशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका म्हणूनही समर्थपणे कार्य पार पाडले.

मार्गारेट यांनी ओशनियातील सामोअन अशिक्षित लोकांचे मानसशास्त्र आणि त्यांचे सांस्कृतिक लैंगिक वर्तन, नैसर्गिक वर्ण अशा विविध पैलूंचा अभ्यास केला. महिलांचे हक्क, बाल संगोपन, लैंगिक नैतिकता, आण्विक प्रसार, वंशसंबंध, मादक पदार्थांचे सेवन, लोकसंख्या नियंत्रण, पर्यावरण प्रदूषण, जागतिक भूक इत्यादी समस्यांचा अभ्यास करून त्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न केले. त्यांनी युवक, युवतींसाठी मानवशास्त्र व समाजशास्त्र विषयांसाठी प्रमुख सल्लागार म्हणून अविरत कार्य चालू ठेवले. १९६० मध्ये अमेरिकन मानवशास्त्र संघटनेच्या प्रमुख पदावर काम केले. तसेच न्यूयॉर्क अकॅडेमी ऑफ सायन्सेसमध्येही त्यांनी उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले. अमेरिकन असोसिएशन फॉर द अ‍ॅडव्हान्समेंट ऑफ सायन्स येथे १९७५ पर्यंत विविध पदांवर तसेच मंडळांवर मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या.

मार्गारेट यांनी पुढील पुस्तकांचे लेखन केले : मेल अँड फिमेल : अ स्टडी ऑफ द सेक्स इन चेंजिंग वर्ल्ड, १९४९; अँथ्रोपोलॉजी : अ ह्यूमन सायन्स, १९६४; कल्चर अँड कमिट्मेंट, १९७०; ब्लॅकबेरी विंटर, १९७२; रूथ अँड बेनेडिक्ट, १९७४; लेटर्स फ्रॉम द फिल्ड, १९७७; मार्गारेट मीड ए पोर्ट्रेट, १९७९; मार्गारेट मीड अँड सामोआ, १९८३; विथ ए डॉटर्स, १९८४ इत्यादी. मार्गारेट यांना १९७० मध्ये कलिंगा पुरस्कार आणि १९७९ मध्ये युनाटेड स्टेट्सचा सर्वोच्च प्रेसिडेंशियल मेडल ऑफ फ्रिडम हा पुरस्कार मिळाला.

मार्गारेट यांचे कर्करोगामुळे न्यूयॉर्क येथे निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर न्यूयॉर्क टाईम्सने त्यांना ‘राष्ट्रीय दैवज्ञ’ (अ नॅशनल ओरॅकल) असे संबोधले होते.

संदर्भ : Erickson, Paul A., Anthropological Lines : Biological Sketches of Eminent Women and Men, New Delhi, 1993.

समीक्षक : शौनक कुलकर्णी