भारतातील एक आदिवासी जमात. ती भोक्ता, भगाटा, भोगाटा या नावानेही ओळखली जाते. ही जमात ओरिसातील सुमारे ६२ जमातींपैकी एक आहे. या जमातीचे लोक प्रामुख्याने ओडिसा राज्यातील सुंदरगड व कोरापुत या दोन जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात आढळतात; तर मयूरभंज, बालेश्वर, संबलपूर अशा एकूण १३ जिल्ह्यांमध्ये त्यांची वस्ती आढळून येते. याव्यतिरिक्त ते आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम् येथे आढळून येतात. तेथे त्यांची कंपू अशी ओळख आहे. ही जमात अतिशय साधी आणि परंपरा जपणारी आहे. विशाखापट्टणम् जिल्ह्यातील गोलकोंडा आणि मदुगोला युद्धात त्यांचे पूर्वज सरदार प्राणपणाने लढले. त्यामुळे त्यांच्या ‘भक्ती-शक्तीने प्रेरित असे त्यांचे भक्त’ या विचारातून या जमातीस बगाटा असे नाव पडले, असे मानतात. काही विचारवंत बोक्ता (हूशार नसलेला) या शब्दापासून बगाटा असे नाव झाल्याचे मानतात. त्यांची २०११ च्या जनगणनेनुसार सुमारे १,४७,००० इतकी लोकसंख्या होती. पैकी ८,८१३ ही ओडिसामधली असल्याचे दर्शविते.

बगाटा जमातीची उत्पत्ती किंवा ते कोठून आलेत, याबद्दल वेगवेगळ्या दंतकथा आहेत. त्यांची राजा बगाटा, रेड्डी बगाटा आणि चिटी बगाटा अशी ३ कुळी आहेत. त्यामध्ये पुन्हा उपप्रकार असून प्रत्येक उपप्रकाराचे गोत्र व कुळी वेगवेगळी आहेत. उदा., हथियार, बेल्हार, समुदीया, बंटा इत्यादी. काही बगाटा स्वतंत्र, तर काही समूहाने राहतात. त्यांच्या पारंपरिक समूहाचे कुळपंचायत असते. त्यांचा परंपरागत प्रमुख (कुळपेड्डा) असून त्याला त्यांच्या गावचा पुजारी सहायक असतो. सामाजिक आणि आर्थिक बाबींचे निर्णय तेच घेत असतात.

बगाटा जमातीचे घर

बगाटा जमातींची बगाटा हीच बोलीभाषा असून आता दोन्ही राज्यांमधील बगाटा आपापली प्रादेशिक भाषा बोलताना दिसतात. या व्यतिरिक्त ते लारिया, सद्री व हिंदी या भाषाही बोलतात. हे लोक मध्यम उंचीचे, मोठे नाक, वर्ण काळा व मजबूत बांध्याचे असतात. त्यांचा पोशाख रंगीबेरंगी असतो. पूर्वी बगाटा पुरुष आखुड सदरा, लुंगी, धोतर व डोक्यावर टोपी परिधान करत आणि स्त्रिया लुंगी आणि लांब कुर्ता घालत; परंतु आता पुरुष शर्ट, पँट आणि स्त्रीया साडी-चोळी किंवा आधुनिक पद्धतीचे वस्त्र परिधान करतात. त्यांची घरे इतर जमातींच्या घरांप्रमाणे विशिष्ट प्रकारची आढळून येत नाही. उतरत्या छपराची, निमुळत्या छोट्या कवलारुंची, लाकडी मेढे व मातीची मिळून ती बनविलेली असतात. काही सधन बगाटा लोक पक्क्या घरांत वास्तव्यास आहेत.

बगाटा लोकांचा शेती व मच्छिमारी हे मुख्य व्यवसाय आहे. त्यामुळे इतर जमातींपेक्षा बगाटा जमातीला आर्थिकबाबतीत सधन मानले जातात. काहीजण शिकारही करतात. तसेच ते वेगवेगळ्या प्रकारच्या टोपल्या आणि खजुराच्या पानांपासून चटया बनवितात. हे लोकं मांसाहारी व शाकाहारी असून मासे, बकरा, कोंबडे, अंडी, तसेच भात, बाजरी, गहू, डाळी, हरभरे इत्यादी कडधान्यांचाही आहार करतात.

घरातला मोठा पुरुष हा प्रमुख असतो. वडिलांच्या मृत्युनंतर संपत्तीचा अधिकार फक्त मुलांनाच समप्रमाणात असतो; मात्र आई आपल्या मुलीला दागिन्यांमध्ये हिस्सा देत असते. हे लोक लग्न ठरवून, तसेच प्रेमविवाह, पळून जाऊनही लग्न करतात. लग्नाचा सर्व खर्च नवरा मुलगा करतो. घटस्फोटाची मान्यता असून विधवांना पुनर्विवाह करण्यास मान्यता आहे. गर्भवती महिलांना मंदीर, स्मशानभूमी या ठिकाणी, तसेच ग्रहणाच्या वेळी घराबाहेर पडणे निषिद्ध मानतात. ही जमात इतर समाजांच्या संपर्कात असल्याने ते त्या समाजांच्या देवदेवतांची पूजा करताना दिसतात. सर्व सण, समारंभांत ते कर्मानामक नृत्य करतात व गायनात उत्साहाने सहभागी होतात. आंध्र प्रदेशातील बगाटा लोकांचा गोंड आदिवासी जमातीप्रमाणे ढेमसा हा लोकप्रिय नृत्यप्रकार आहे. सर्व वयोगटातील स्त्री-पुरुष नाचून, गाऊन सण साजरा करतात. लग्न समारंभातही नाच, गाण्याचा समावेश असतो. त्यांच्यात मृताला पुरण्याची प्रथा आहे.

संदर्भ : Singh, K. S., People Of India, Delhi, 1998.

समीक्षक : शौनक कुलकर्णी