भारतातील एक आदिवासी जमात. एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकांत झाखरिंग जमातीचे लोक तिबेटमधून स्थलांतर करून भारताच्या ईशान्येकडील अरुणाचल प्रदेशात स्थलांतरित झाले. ही जमात अरुणाचल प्रदेशाच्या उत्तरेकडील डोंगराळ भागात, मुख्यत्वे अंजाव जिल्ह्यातील वोलोंगमधील लोहित नदीकिनारी आणि किबिटो या भागांत प्रस्थापित झाली आहे. ही जमात ‘मेयॉर’ या नावानेही ओळखली जाते; मात्र प्रत्यक्षात मेयॉर ही झाखरिंग या जमातीच्या जवळची जमात आहे. त्यांची २०११ च्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्या ९०० इतकी होती.

झाखरिंग जमातीची शारीरिक ठेवण ही बारीक डोळे, सैल केस, त्वचेचा रंग गोरा व मध्यम उंची अशा प्रकारची असते. ते आपापसांत झाखरिंग किंवा मेयॉर भाषा बोलतात. ही भाषा मूळ तिबेटी-ब्रह्मी भाषासमूहातील आहे. झाखरिंग भाषेवर मिदझुईश आणि पूर्व बोडिश या भाषांचा प्रभावही दिसून येतो. पूर्वी हातमाग व विणकाम करणे हे व्यवसाय ते करीत; मात्र घटत्या लोकसंख्येमुळे त्यांचा हा व्यवसाय मागे पडल्याचे दिसून येते. डोंगर उतारावर लागवड (शेती) करणे हा त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे. झाखरिंग स्त्रिया शेती आणि सामाजिक कामांत सहभागी होतात. या लोकांचा तिबेटी आणि मिश्मी या लोकांशी व्यापार चालतो. बुद्धाच्या लाकडी मूर्ती बनविणे, तसेच लाकडी वस्तुंना आणि मुखवट्यांना रंग देणे यांसारख्या कामांत ते पटाईत आहेत.

झाखरिंग लोक शाकाहारी व मांसाहारी असून भात, गहू, विविध भाज्या, कंदमुळे, मासे, मटण इत्यादींचे ते सेवन करतात. त्यांची घरे साधारणपणे पाईन व इतर लाकडांपासून उतरत्या छपरांची बनलेली असतात. थंड वातावरणात उब मिळावी म्हणून प्रत्येकांच्या घारांमध्ये शेकोटी आढळून येते.

झाखरिंग लोक एकपत्नीत्व पाळतात. ते तिबेटियन आणि मोनपा या जमातींबरोबर जास्तीत जास्त नातेसंबंध जोडतात. आईकडील नात्यात मुला-मुलींची लग्ने जमविण्याची पद्धत आहे. वधुमूल्याच्या स्वरूपात वस्तू, गाय, डुक्कर इत्यादी दिले जातात. गर्भधारणेला देवाचा आशीर्वाद मानला जाऊन आई व होणाऱ्या बाळाच्या दीर्घायुष्यासाठी धार्मिक विधी करून प्रार्थना केली जाते. झाखरिंग जमातीचा त्यांच्याच गावातला एक प्रमुख असतो. त्याला ‘एप्पा’ असे म्हणतात. तो त्या गावाचा सल्लागार असतो.

झाखरिंग जमातीवर तिबेटी प्रभाव असल्याने त्यांचा तिबेटियन बुद्धीजम यावर विश्वास आहे. ते स्वतःला तिबेटियन बुद्धीस्ट मानतात. ते बुद्धीस्ट सर्वचेतनवादी आणि मंत्रतंत्र करणारे, जादुटोणा मानणारे असल्याचे आढळून येते. हे लोक बुद्ध आणि बोधीसत्व मानणारे आहेत. ही जमात निसर्गपुजक असून ते डोंगर, टेकड्या, पाणी इत्यादींची पुजा करतात. तसेच डोंगराळ भागातली ‘योंग’ या त्यांच्या जमातीच्या देवाला तसेच ‘गोम्पा’ या देवाला ते पूजतात. जमातीमध्ये एक पारंपरिक पुजारी असतो, जो त्यांच्या आवश्यक धार्मिक विधी पार पाडतो.

‘याउद्दाक’ ही शेतीसंबंधीत देवता असून ‘ल्हाच्छुथ’ हा त्यांचा मुख्य सण आहे. पिकाची वृद्धी आणि जमातीतील प्रत्येकाच्या उत्तम आरोग्यासाठी पौर्णिमेच्या दिवशी हा सण साजरा केला जातो. जमातीमध्ये कोणतेही राजकीय वर्चस्व नसून जमातीतील एखादा विवाद सोडविण्यासाठी जमातीतील प्रतिष्ठित, हुशार, श्रीमंत व्यक्तीची मदत घेतली जाते. असे असले, तरी ‘त्सोंगो’ नामक त्यांची ग्राम परिषद असते.

झाखरिंग जमातीत मृत्यूनंतर मृताला पुरले जाते. पारंपरिक पुजाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याला नव्याने बांधलेल्या विशिष्ट विभागात दर्शनाकरिता ठेवतात.

काही झाखरिंग लोक शिक्षण घेऊन सरकारी व खाजगी सेवेत कार्यरत असून ते आधुनिक जीवन जगत आहेत.

संदर्भ : Singh, K. S., People Of India, Delhi, 1998.

समीक्षक : लता छत्रे