रेखा : ज्ञानेश्वरीतील महत्त्वाची साहित्य संज्ञा. ज्ञानेश्वरी हा  अभिजात ग्रंथ. या ग्रंथात धार्मिक, सांस्कृतिक, साहित्यिक अशा अनेक अंगांना स्पर्श करणाऱ्या संज्ञा आलेल्या आहेत. त्यातील रेखा ही साहित्यविषयक संज्ञा अत्यंत महत्त्वाची आहे. मराठी साहित्यशास्त्राच्या अभ्यासिका उषा माधव देशमुख यांनी त्यांच्या मराठीचे साहित्यशास्त्र रामदास ते रामजोशी या ग्रंथामध्ये या संकल्पनेचे विवेचन केले आहे. भारतीय साहित्यशास्त्राचे अभ्यासक मा. गो. देशमुख यांनी या संज्ञेची तुलना रीती  या भारतीय साहित्यशास्त्रातील महत्त्वाच्या साहित्यविषयक संकल्पनेशी केली आहे.

रेखा ही संज्ञा ज्ञानेश्वरीमधील तीन ओव्यांमध्ये आलेली आढळते.

१.स्मृती तेचि अवयव |रेखा अंगिकभाव |तेथ लावण्याची ठेव |अर्थ शोभा ||

२.जेथ साहित्य आणि शांती| हे रेखा दिसे बोलती| जैसी लावण्य गुणकुळवती | आणि प्रतिव्रता||

३. नवल बोलतीये रेखेची वाहणी |देखता डोळ्याही पुरा लागे धणी| ते म्हणती उघडली खाणी |रूपाची हे ||

या तीन ओव्यांमध्ये ज्ञानेश्वरांनी रेखा या संज्ञेचा उपयोग केला आहे. ज्ञानेश्वरांची रेखा ही संकल्पना अर्थशोभा,अलंकार, रस या काव्य गुणांशी निगडित आहे. या संज्ञच्या आधारे ज्ञानेश्वरांनी साहित्याच्या रमणीय शैलीवर भर दिला आहे. संस्कृत साहित्यात कालिदास, राजशेखर, श्रीहर्ष या कवींनी रेखा या शब्दाचा उपयोग त्यांच्या साहित्यात केलेला आढळतो. मात्र संज्ञा म्हणून साहित्यशास्त्रात रेखा ही संज्ञा आढळत नाही. रीती या संस्कृत साहित्यशास्त्रातील संकल्पनेबद्दल अनेक साहित्यकारांनी मते व्यक्त केली आहेत. वामनाने त्याच्या काव्यअलंकारसूत्रवृत्ती या ग्रंथामध्ये रीती या संज्ञेची प्रथमच व्याख्या दिली आहे. रीती ही शब्दांची अद्वितीय मांडणी पद्धत आहे असे त्याने सुचवले आहे. अर्थ आणि निवेदन यांच्यामधील एकात्मता या साहित्यगुणांचा विचार करून विश्वनाथाने याविषयी मत व्यक्त केले आहे. मा. गो. देशमुख यांच्या मते ज्ञानेश्वरांची रेखा ही संकल्पना रीतीहून भिन्न आहे. रीती या संकल्पनेत केवळ अर्थगुणांचाच समावेश आहे. रेखा ही संज्ञा मराठी आणि भारतीय साहित्यशास्त्रातील अद्वितीय साहित्य संकल्पना आहे. या साहित्य संकल्पनेचे जनकत्व ज्ञानेश्वरांना दिले जाते.

संदर्भ : डहाके,वसंत आबाजी आणि इतर (संपा ), वाङ्मयीन संज्ञा-संकल्पना कोश ,मुंबई, २००१ .