मानुषता : मानवी अस्तित्वाविषयी आणि त्यातील मूलभूततेविषयी विधान करणारी साहित्य संकल्पना. ही संकल्पना शरदचंद्र मुक्तिबोध यांनी  सृष्टी, सौंदर्य आणि साहित्यमूल्य या त्यांच्या ग्रंथात उपयोजलेली  आहे. महायुद्धोत्तर काळात साहित्य आणि सौंदर्य या चर्चेपलीकडे मानवी अस्तित्वाविषयी, त्याच्या प्राणभूत तत्वांविषयी विस्तृत चर्चा झाली आहे. दादावाद, अतिवास्तववाद, अस्तित्त्ववाद, मार्क्सवाद या विचारसरणींच्या निमित्ताने अनेक संकल्पना मांडण्यात आल्या. मुक्तिबोध हे मार्क्सवादी विचारसरणीचा प्रभाव असणारे साहित्यिक होत. मानवाच्या असण्याविषयीचा सकारात्मक सूर त्यांच्या साहित्यात अभिव्यक्त झाला आहे. साहित्यातील सौंदर्य या घटकांपलीकडे जाऊन साहित्यातील माणूस हा घटक केंद्रित करून मानुषता ही संकल्पना त्यांनी मांडली आहे. ललित साहित्याचे प्राणभूत तत्त्व रस, लय हे नसून त्यातील माणूस प्रधान आहे असे ही संकल्पना प्रतिपादित करते. मुक्तिबोधांच्या मते मानुषता हे सामाजिक मानवाचे आंतरिक असणे आहे. बदलत्या सामाजिक मूल्याचे ते अधिष्ठान आहे. मानुषता हा मानवी अस्तित्वाचा प्रधान पैलू असून सामाजिक मूल्यात्म जीवन हा मानवी व्यावहारिक अस्तित्वाचा प्रगमनशील पैलू आहे असे मुक्तिबोध या संकल्पनेतून प्रकट करतात. मानुषता मानवाचे मुळातले असणे आहे आणि समाजाची परिवर्तनशीलता ही मानवाची होत जाण्याची प्रक्रिया आहे. ललितकृतीला आकार देणारे अनेक संघटक तत्व असतात. आशा-निराशा, भय-धाडस, प्रेम-वैर अशा अनेक संघटनतत्वांचा ललितकृतीत आढळ असतो. या संघटनतत्वांना बांधून घेण्याची क्षमता मानुषता या संकल्पनेत आहे अशी मुक्तिबोधांची धारणा आहे. मानुषता म्हणजे निव्वळ माणुसकी असा मर्यादित अर्थ न घेता मानुषता म्हणजे माणसाचे सत्व हा विस्तारित अर्थ त्यात अभिप्रेत आहे. मानुषता हे तत्व सार्वत्रिक असून विश्वातील श्रेष्ठ साहित्यकृतींची रचना याच  तत्त्वावर झाली असल्याचे मुक्तिबोध यांनी प्रतिपादिले आहे.

संदर्भ : डहाके,वसंत आबाजी आणि इतर (संपा ), वाङ्मयीन संज्ञा-संकल्पना कोश ,मुंबई, २००१ .