खाँ, उस्ताद अब्दुल हलीम जाफर : (१८ फेब्रुवारी १९२७ ? — ४ जानेवारी २०१७). भारतातील प्रसिद्ध सतारवादक. विसाव्या शतकाच्या मध्यावर भारतीय शास्त्रीय वाद्यसंगीताच्या विश्वात ज्या कलाकारांनी आपल्या प्रतिभेचा वेगळा ठसा उमटवला, त्यात उस्ताद अब्दुल हलीम जाफर खाँ यांचे नाव घेतले जाते. त्यांचा जन्म रतलाम जिल्ह्यातील (मध्य प्रदेश) जावरा येथे झाला (काही ठिकाणी त्यांचे जन्म वर्ष १९२९ असल्याचा उल्लेख आहे). खाँसाहेबांचे घराणे मूलतः बीनकारांचे. इंदौर घराण्याचे बीनकार आणि सतारवादक उ. जाफर खाँ हे त्यांचे वडील. ते गातही असत. अब्दुल हलीम लहान असतानाच जाफर खाँ उदरनिर्वाहासाठी मुंबईत स्थायिक झाले (१९३०). त्यावेळी ग्रँट रोड परिसरात असणाऱ्या त्यांच्या घरी प्रख्यात बीनकार उ. मोहम्मद खाँ, सतार आणि बीनवादक बाबू खाँ तसेच त्यावेळच्या अनेक गायकवादकांचे जाणे-येणे असे. अब्दुल हलीम यांचे सतारवादनाचे आणि गायकीचे शिक्षण त्यांच्या वडिलांकडेच झाले; पण उ. बाबू खाँ यांच्या शैलीने ते अधिक प्रभावित झाले. त्यांच्या वादनातील अनेक तांत्रिक गोष्टी अब्दुल हलीम यांनी आत्मसात व विकसित केल्या आणि आपल्या वादनात स्वतःच्या खास शैलीत त्या अभिव्यक्त केल्या.

आपली साधना सुरू ठेवत अब्दुल हलीम यांनी १९४० च्या दशकात ऑल इंडिया रेडियोवर स्टाफ आर्टिस्ट म्हणून व्यावसायिक दृष्ट्या आपली सांगीतिक वाटचाल सुरू केली; पण त्याच सुमारास त्यांच्या वडिलांचे दुःखद निधन झाले. तोपर्यंत अब्दुल हलीम यांचा एक कलाकार म्हणून संगीत विश्वाला परिचय व्हायचा होता. योगायोगाने त्याच वेळी ख्वाजा खुर्शीद अहमद या संगीतकारांमुळे त्यांचा चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला. परवाना (१९४७) हा त्यांचा पहिला चित्रपट. त्याकाळी चित्रपटसृष्टीत मोहम्मद शफी, राम लाल आणि अझीझ खाँ (प्रख्यात सतारवादक उ. शाहिद परवेझ यांचे वडील) हे सतारवादक कार्यरत होते. शास्त्रीय संगीताच्या मैफिली करत करत अब्दुल हलीम यांनी अल्पावधीतच चित्रपटसृष्टीत चांगलाच जम बसविला. त्यावेळचे आघाडीचे संगीतकार नौशाद, मदनमोहन, वसंत देसाई, सी. रामचंद्र इ.च्या अनेक प्रसिद्ध गाण्यात त्यांनी सतार वाजविली आहे. तेव्हा चित्रपटगीतांच्या ध्वनीमुद्रणाच्या वेळी वाद्यवृंदातील वादकांना स्वरलेखन (नोटेशन) पाश्चिमात्य पद्धतीने म्हणजे ‘स्टाफ नोटेशन’च्या स्वरूपात देण्यात येत असे. अब्दुल हलीम यांना ती पद्धत माहीत नव्हती; पण त्यांनी अभ्यास करून ती पद्धत आत्मसात केली आणि आपल्या सतारवादनाने अनेक चित्रपटगीते अजरामर केली. मुघल-ए-आझम, गूँज उठी शहनाई, कोहिनूर, झनक झनक पायल बाजे हे त्यातील काही प्रमुख चित्रपट.

अब्दुल हलीम जाफर खाँ यांचे सतारवादन जोरकस आणि कणीदार आघात, त्यातील स्पष्टता, गमकयुक्त मींड, लाडिक मुरक्या आणि वेगवान ताना इ.नी परिपूर्ण होते. ते रागाची ‘बढत’ अतिशय प्रभावशाली पद्धतीने करीत असत. तंतूवाद्यातील ‘क्रिन्तन’ या वैशिष्ट्यपूर्ण क्रियेवर त्यांचे विशेष प्रभुत्व होते. या प्रकारात उजव्या हातातील ‘मिझराफ’ने (नखीने) मुख्य तार एकदाच छेडून, डाव्या हाताच्या बोटानी ‘पडद्या’वर एकाच वेळी अनेक आघात वेगाने करत विशिष्ट परिणाम साधला जातो. (पाश्चिमात्य संगीतात गिटार वादनात वापरल्या जाणाऱ्या या क्रियेस ‘legato’ असे म्हणतात). त्यांनी आपल्या खास शैलीने सतारवादनाला एक वेगळेच परिमाण बहाल केले. म्हणूनच त्यांची वैशिष्ट्यपूर्ण शैली आज ‘जाफरखानी बाज’ म्हणून ओळखली जाते.

अब्दुल हलीम जाफर खाँ यांना दाक्षिणात्य संगीतातही रस होता आणि तो त्यांच्या अभ्यासाचा विषयही होता. किरवाणी, कनकांगी, लतांगी, गानमूर्ती इ. दक्षिण भारतीय राग उत्तर भारतीय संगीतात रूढ करण्याचे श्रेय प्रामुख्याने त्यांना जाते. दक्षिणेतील प्रख्यात व्हायोलिनवादक एम. एस. गोपालकृष्णन आणि वीणावादक शंकर शास्त्री यांच्याबरोबर त्यांनी सहवादनाचे अनेक कार्यक्रम केले. त्या काळात त्यांनी प्रख्यात पाश्चिमात्य गिटारवादक ज्यूलियन ब्रीम यांच्याबरोबर तसेच जॅझ पियानोवादक डेव्हिड ब्रुबेक यांच्याबरोबर फ्यूजन संगीतात अनेक नवनवीन प्रयोग केले आणि पाश्चिमात्य संगीत जगतातही आपल्या सतारवादनाचा ठसा उमटवला.

अब्दुल हलीम जाफर खाँ यांच्या शिष्यांमध्ये त्यांचे चिरंजीव झुनेन खाँ, प्रसाद जोगळेकर, गार्गी शिंदे यांचा प्रामुख्याने समावेश होतो. उ. अब्दुल हलीम जाफर खाँ यांना पं. रविशंकर किंवा उ. विलायत खान यांच्या इतकी प्रसिद्धी मिळाली नाही किंवा त्यांना त्यांच्या इतके अनुयायी लाभले नाहीत, पण आपल्या खास जाफरखानी शैलीने खाँसाहेबांनी रसिकांची मने जिंकली.

खाँसाहेबांनी त्यांच्या खास ‘जाफरखानी बाजा’च्या प्रसारासाठी मुंबईत १९७६ मध्ये ‘हलीम अकादमी ऑफ सितार’ या संस्थेची स्थापना केली. त्यांचे चिरंजीव झुनेन खाँ सध्या या संस्थेचे काम पाहतात.

अब्दुल हलीम जाफर खाँ यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. भारत सरकारने ‘पद्मश्री’ (१९७०) व ‘पद्मभूषण’ (२००६) या पुरस्कारांनी त्यांना गौरविले आहे. याशिवाय त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार (१९८७), महाराष्ट्र गौरव पुरस्कार (१९९०), मध्य प्रदेश सरकारचा शिखर सन्मान (१९९१), उ. हाफीज अली खाँ पुरस्कार (१९९२), संगीत नाटक अकादमीची मानाची विशेष ‘टागोर फेलोशिप’ मिळाली आहे (२०१२). खाँसाहेबांचे संगीत बहुसंख्य ध्वनिमुद्रिका आणि दृकश्राव्यफिती इ.च्या स्वरूपात उपलब्ध आहे.

ज्या काळात भारतरत्न पंडित रविशंकर, आफताब-ए-सितार उ. विलायत खाँ आणि पंडित निखिल बॅनर्जी या दिग्गज कलाकारांनी वाद्यसंगीताचे (खास करून सतारवादनाचे) अवकाश व्यापले होते, त्या काळात आपल्या तांत्रिक आणि सांगीतिक वैशिष्ट्यांमुळे खाँसाहेबांची सतार रसिकांना मोहवत होती. उस्ताद अब्दुल हलीम जाफर खाँ मुंबई येथे पैगंबरवासी झाले.

समीक्षण : सुधीर पोटे