विनिमय दरामधील अस्थिरतेचे व्यवस्थापन करण्यासाठी उपयोजित केली जाणारी एक करपद्धती. हा कर सामान्यपणे ‘रॉबिन हूड कर’ म्हणूनदेखील ओळखला जातो. प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ व केन्स विचारांचे समर्थक सर जेम्स टोबिन यांनी या कराची संकल्पना मांडली. अर्थमितीय विचारांबद्दल ‘टोबिन प्रतिमान’ यावर संशोधन कार्य केल्याबद्दल त्यांना १९८१ मध्ये अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला. टोबिन कर हे त्यांचे संकल्पनात्मक प्रतिमान असून यामध्ये अल्पमुदतीच्या व्याजदराला महत्त्व प्राप्त आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर चलन सट्टा कमी करण्यासाठी आणि परकीय चलन व्यवहारांवर कर लावण्यासाठी या प्रकारचा कर लागू केला जातो. टोबिन यांच्या मते, अशा प्रकारचा चलन सट्टा व व्यवहार हे अकार्यक्षम असतात आणि त्यांचा अर्थव्यवस्थेतील वाढ कमी करण्याकडे कल असतो.

टोबिन कराचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे वित्तीय व्यवहार कराच्या माध्यमातून देशाच्या चलनाची स्थिरता नियंत्रित करणे हा आहे. ब्रेटन वुड्स प्रणाली अंतर्गत निश्चित विनिमय दराचा भंग केल्यामुळे आणि १९७१ मधील लवचिक विनिमय दरासह त्याच्या पुनर्स्थापनेदरम्यान निधीच्या भरीव कामांशी संबंधित गोष्टी कमी होणे किंवा नष्ट करणे हे या कर प्रणालीमागे अपेक्षित होते. त्यामुळे १९७२ मध्ये टोबिन कर प्रस्तावित करण्यात आला होता.

टोबिन कर प्रामुख्याने अल्पकालीन प्रासंगिक चलन सट्टा यास दंड करण्याच्या उद्देशाने प्रस्तावित करण्यात आला. हा प्रासंगिक चलन रूपांतरणावरील कर आहे. अशा करामागील संकल्पना म्हणजे अल्प मुदतीच्या चलन देवाणघेवाणीतून मोठ्या प्रमाणात पैसे कमाविणाऱ्या लोकांकडून थोडे पैसे काढून घेणे अशी आहे. उदा., कमकुवत बँकिंग क्षेत्राच्या कर्ज संकटामुळे इटलीला टोबिन कर लागू करण्यास भाग पडले होते. यामुळे इटालियन सरकार महसूल आणि आर्थिक सट्टा वाढवून बाजार स्थिर करू शकला; मात्र काही विरोधकांच्या मते, अशा प्रकारचे कर लागू केल्यास चलन बाजारात नफा मिळण्याची शक्यता कमी होईल; कारण दीर्घ काळामध्ये जागतिक आर्थिक वाढ आणि विकास कमी करण्याची प्रवृत्ती यामध्ये आहे.

समीक्षक : अनील पडोशी

भाषांतरकार : हितेश देशपांडे