दोशी, बाळकृष्ण : (२६ ऑगस्ट १९२७ – २४ जानेवारी २०२३). बाळकृष्ण विठ्ठलदास दोशी (बि. व्ही. दोशी). प्रख्यात भारतीय वास्तुविशारद. तसेच शैक्षणिक क्षेत्रातही त्याचे मोठ योगदान आहे. वास्तुशास्त्रातील नोबेल पारितोषिकसम असणाऱ्या प्रित्झर पारितोषकाने २०१८ साली त्यांना सन्मानित करण्यात आले. हा पारितोषिक प्राप्त करणारे ते पहिले भारतीय आहेत.

दोशी यांचा जन्म  पुण्यात (महाराष्ट्र)  झाला. सर जे जे स्कूल ऑफ आर्किटेक्चर येथून त्यांनी वास्तुकलेचे शिक्षण घेतले (१९४७–५०). त्यानंतर ते यूरोपला उच्च शिक्षणाकरिता गेले. त्यांना तेथे ला कार्ब्यूझ्ये यांसोबत काम करण्याची संधी मिळाली (१९५१–५४). ला कार्ब्यूझ्ये यांचे अनेक प्रकल्प भारतात सुरू होते. त्या प्रकल्पांची पाहणी करण्याकरिता दोशी परत भारतात परतले. या प्रकल्पात साराभाई व्हिला (१९५५), शोधन व्हिला, मिल ओनर्स ॲसोसिएशन बिल्डिंग (१९५४) आणि संस्कार केंद्र यांचा समावेश होतो. त्यानंतर ते भारतातच (गुजरात) स्थायिक झाले. दोशी यांच्या नंतरच्या कामावर ला कार्ब्यूझ्ये यांच्या कार्यशैलीचा मोठा प्रभाव दिसतो. भारतात त्यांनी बांधलेल्या वास्तूंमध्ये कमला हाऊस (पत्नीच्या नावाने; १९६३), संगथ स्टुडिओ (१९८०) आणि कामी महत्त्वाच्या वास्तू प्रकल्पांवर या कार्यशैलीचा प्रभाव अधोरेखित होतो.

दोशी यांनी १९५६ साली वास्तुशिल्प या नावाने संस्था स्थापन करून स्वतंत्रपणे कार्य करण्यास सुरूवात केली (नंतरचे नाव वास्तुशिल्प कन्स्लटंट). या संस्थेने भारतभर शंभराहून अधिक प्रकल्पांवर काम केले आहे. लुईस कान यांसोबत ते इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, अहमदाबाद या प्रकल्पात सहभागी होते.  दोशी यांनी १९६६ मध्ये अहमदाबाद येथे स्कूल ऑफ आर्किटेक्चर या संस्थेची स्थापना केली. या संस्थेची संरचनेचा दर्शनी भाग मिल ओनर्स ॲसोसिएशन बिल्डिंगच्या ग्रिडची आणि विटाचा व काँक्रिटचा वापर साराभाई व्हिलाची आठवण करून देते. निर्मळ प्रकाशाची निर्मिती करून लोकांची चेहरे प्रकाशमान व्हावीत, या प्रशंसनीय ला कार्ब्यूझ्येच्या कार्यशैलीचा वापर दोशी यांनी तिरप्या प्रकाशाचा आणि सरकते दरवाजे यांचा वापर प्रकाश हाताळण्यासाठी आणि तापमान नियंत्रित करण्यासाठी केला. भारतात असणाऱ्या तीव्र ऊन्हाची जाणीव ठेवून संस्थेच्या संपूर्ण परिसरात विश्रांती ठिकाणे पाने व झाडांनी छायांकित केली, जेणेकरून अशा ठिकाणी विद्यार्थी आनंदाने भेटू शकणार. या संस्थेची पुढील दशकात दीर्घोत्तर प्रगती होत गेली. स्कूल ऑफ प्लानिंग (१९७०), द व्हिज्युअल आर्ट सेंटर (१९७८) आणि स्कूल ऑफ इंटिरिअर डिझाइन (१९८२) या संस्था त्याच्या विस्तारित शाखा आहेत. या सर्व संस्थांचे मिळून २००२ मध्ये सेंटर फॉर एन्व्हारमेंटल प्लानिंग अँड टेक्नॉलॉजी असे नामकरण करण्यात आले.

दोशी यांनी वॉशिंग्टन येथील मॅसॅचूसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, हाँगकाँग येथील सेंट लूईस विद्यापीठ आणि इतरही विद्यापीठांत अभ्यागत-प्राध्यापक म्हणून भेटी दिल्या होत्या. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी विस्तृत व्याख्यान दिले आणि २०११ मध्ये पथ अनचार्टे्ड नावाने स्वत:चे आत्मचरित्र लिहिले.

जर्मनी येथील व्हिट्रा डिझाईन म्यूझीयम आणि शिकागो येथील राईटवुड ६५९ येथे दोशी यांच्या कामाचे सिंहावलोकन करण्याकरिता २०१९ मध्ये बाळकृष्ण दोषी : आर्किटेक्चर फॉर द पिपल या नावाने प्रदर्शन भरविण्यात आले. प्रित्झर पारितोषिकासोबतच त्यांना ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्सचे (२०११) अधिकारी बनवण्यात आले. हा कलेसाठी फ्रान्सचा सर्वोच्च सन्मान आहे.  वास्तुकलेच्या प्रगतीत भरीव योगदान दिल्याबद्दल वार्षिक पुरस्कारार्थ रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ ब्रिटिश आर्किटेक्ट्सकडून २०२२मध्ये त्यांना रॉयल गोल्ड मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे त्यांनी संरचना केलेल्या इंदोर येथील अरण्ययाग्रुह प्रकल्पाला  प्रिन्स आगा खान अवॉर्ड फॉर आर्किटेक्चर पुरस्कार मिळाले आहे.

दोशी यांचे काही प्रकल्प नगररचना, गृहप्रकल्प स्ंस्था व इत्र बांधकामांची नावे पुढीलप्रमाणे :

नगररचना : (१) विद्याधर नगर, जयपूर., (२) बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स , मास्ट र्प्लॅन.

संस्था : (१) इंडियन इन्स्ट‍िट्यूट ऑफ मॅनेजमेंट (१९७७), (२) इन्स्ट‍िट्यूट ऑफ इंडोलॉजी, अहमदाबाद (१९६२), (३) इंडियन इन्स्ट‍िट्यूट ऑफ मॅनेजमेंट, उदयपूर, (४) गांधी लेबर इन्स्ट‍िट्यूट, अहमदाबाद, (५) नॅशनल इन्स्ट‍िट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी, दिल्ली, (६) नालंदा युनिव्हर्सिटी, राजगिर, (७) फ्लेम युनिव्हर्सिटी, पुणे, (८) धिरूभाई अंबानी युनिव्हर्सिटी, भोपाल, (९) सेंटर फॉर इन्व्हायरमेंटल प्लॅनिंग अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजी, अहमदाबाद.

ग्रुहप्रकल्प : (१) अरण्या लो कॉस्ट हाऊसिंग, इंदोर (१९८९), (२)  लाइफ इन्शुरन्स कॉरपोरेशन हाऊसिंग, अहमदाबाद (१९७३), (३) गुजरात फर्टिलायझर कॉर्प, बडोदा, (४) दुर्गापूर हाउसिंग, दुर्गापूर, (५) रिलायन्स हाउसिंग, पाताळगंगा, (६) इंडियन फार्मर्स अ‍ॅंड फर्टिलायझर्स कॉर्पोरतिओन हाउसिंग, कलोल,

इतर : (१) संगाथ, अहमदाबाद, (२) नॅशनल वॉर म्यूझीयम, दिल्ली, (३) काइट म्यूझीयम, अहमदाबाद, (४) सवाई गंधर्व स्मारक, पुणे, (५) स्मृती वन अर्थक्वेक मेमोरियल, भूज, (६) अमदावादनी गुफा ,अहमदाबाद (१९९४), मक्बूल फीदा हुसैन, द बुलबॉउ रुफ, प्रेमाबाई हॉल, अहमदाबाद (१९७६).

पहा : श्रीपाद भालेराव