सामाजिक कल्याणाच्या पर्याप्तता पातळीचे उत्पादक संस्था, उत्पादन घटक आणि उपभोक्ता या दृष्टिकोणातून विवेचन करणारे तत्त्व. इटालियन अर्थशास्त्रज्ञ विलफ्रेडो पॅरेटो यांनी या तत्त्वाची मांडणी केली असल्याने त्यास पॅरोटोचे तत्त्व असे म्हटले जाते. पॅरेटो यांचा जन्म १५ जुलै १८४७ रोजी पॅरिस येथे झाला. प्राथमिक शिक्षण पॅरिस येथे झाले. त्यांनी तूरिनच्या पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटमधून अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली. इटलीतील दोन रेल्वे कंपन्यांमध्ये संचालक आणि फ्लॉरेन्समधील एका लोखंडनिर्मिती उद्योगात व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांनी काम केले. इ. स. १८९३ मध्ये व्हालराच्या सेवानिवृत्तीनंतर ते अर्थशास्त्राचे प्राध्यापक झाले.
पॅरेटो यांनी सामाजिक कल्याणाची संकल्पना स्पष्ट करताना क्रमदर्शी उपयोगिता, उपभोग व उत्पन्न या पद्धतींचा आधार घेतला. या आधारे त्यांनी एखाद्या व्यक्तीच्या कल्याणात सुधारणा होताना इतरांच्या कल्याणात घट न झाल्यास कल्याणाची पर्याप्त पातळी गाठली जाते, हे तत्त्व मांडले. पॅरेटो यांनी संपूर्ण कल्याणात वाढ होण्यासाठी पुढील तीन निकष मांडले आहेत.
(१) उपभोक्त्यांना उत्पादित वस्तूंचे कार्यक्षम वाटप पॅरेटो यांच्या पर्याप्तता निकषानुसार वस्तूंच्या कार्यक्षम वाटपासाठी सीमांत पर्याप्तता दर हा सर्व उपभोक्त्यांसाठी समान असल्यास महत्तम कल्याणाची पातळी गाठता येईल.
(२) उत्पादन घटकांचे उद्योगसंस्थांना कार्यक्षम उत्पादनासाठी सर्व उत्पादन संस्थांचा सीमांत तांत्रिक पर्याप्तता दर समान असावा.
(३) उत्पादन घटकांच्या पर्यायी उपयोगाच्या साहाय्याने कार्यक्षम उत्पादन सामाजिक कल्याणात वाढ करण्यासाठी विविध वस्तूंच्या उत्पादनाचा निर्णय काळजीपूर्वक घ्यावा लागतो, ज्यामुळे उत्पादनदेखील कार्यक्षमतेने होईल; त्याच वेळी उपभोक्त्यांना अधिक समाधान प्राप्त होईल.
एखाद्या समाजाला एका अवस्थेकडून दुसऱ्या अवस्थेकडे नेताना जर किमान एक जरी व्यक्तीच्या स्थितीत सुधारणा होणार असेल आणि इतर कुणाच्याही सुस्थितीवर अनिष्ट परिणाम होणार नसेल, तर त्या समाजासाठी दुसरी अवस्था ही पहिल्या अवस्थेपेक्षा उच्चतर मानली जाते. म्हणजेच पहिल्या अवस्थेकडून दुसऱ्या अवस्थेकडे जाणे वांछनीय असते; या स्थित्यंतरास पॅरेटो सुधारणा म्हणतात; मात्र जेव्हा एखाद्या समाजाच्या विद्यमान अवस्थेत कोणतीही पॅरेटो सुधारणा करणे शक्य नसते, तेव्हा असे समजले जाते की, त्या समाजाने पॅरेटो पर्याप्तता गाठली आहे. अर्थव्यवस्थेच्या पॅरेटो पर्याप्तता स्थितीत दुसऱ्या कोणाच्याही सुस्थितीवर अनिष्ट परिणाम न करता एकाही व्यक्तीच्या स्थितीत सुधारणा घडवून आणणे शक्य होत नाही.
आकृतीत दाखविल्याप्रमाणे व्यक्ती अ ची उपयोगिता वाढत जाते, तर व्यक्ती ब ची उपयोगिता स्थिर राहते. त्यामुळे सामाजिक कल्याणाचा स्तर W0 पासून W1 पर्यंत जातो. त्यामुळे कल्याणकारी अर्थशास्त्राच्या भाषेत बिंदू A ते बिंदू B पर्यंतची हालचाल पॅरेटो सुधारणा आहे. येथे एका व्यक्तीचा स्तर सुधारला आहे आणि तसे होताना दुसऱ्या व्यक्तीच्या स्तरावर अनिष्ट परिणाम झालेला नाही, या संकल्पनेलाच पॅरेटो तत्त्व म्हणतात.
मर्यादा : पॅरेटो निकषाच्या दोन मर्यादा आहेत.
- (१) पर्यायी उत्पन्न वितरणांमधून निवड करण्यासाठी हा निकष वापरता येत नाही. अर्थव्यवस्थेतील उत्पन्न वितरणाच्या विभिन्न स्तरांसाठी आपल्याला विभिन्न पॅरेटो पर्याप्त स्थिती काढता येऊ शकतात. म्हणजेच हा निकष मुख्यतः ‘जैसे थे’ परिस्थितीत वापरण्यासाठी अधिक योग्य ठरतो.
- (२) पॅरेटो निकष केवळ सुस्पष्ट कल्याणकारी बदलच विचारात घेतो. म्हणजेच या धोरणात्मक निर्णयांचा काही लोकांना फायदा होतो, तर काहींचे नुकसान होते. अशा परिस्थितीत हा निकष उपयोगी पडत नाही. उदा., गरिबांना मदत व्हावी म्हणून श्रीमंतांवर अधिक कर लादावेत अशी सूचना आल्यास तिचे मूल्यमापन पॅरेटो निकषाच्या आधारावर केले जाऊ शकत जाही. म्हणजेच ज्याच्यामुळे काही लोकांचा फायदा, तर काही लोकांचे नुकसान होणार आहे, असा कोणताही बदल हा पॅरेटो तत्त्वाच्या कक्षेत येत नाही. त्यामुळे त्यात उत्पन्न वितरणाचा प्रश्न टाळला जातो. बरेचसे धोरणात्मक निर्णय असे असतात की, ज्यांचा परिणाम म्हणून, जर योग्य भरपाई दिली गेली नाही तर, काही लोकांची उपयोगिता कमी होऊ शकते.
संदर्भ :
- अर्थशास्त्र परिभाषा कोश, भाषा संचालनालय, महाराष्ट्र शासन, मुंबई, १९८७.
- डायमंड अर्थशास्त्र कोश, डायमंड पब्लिकेशन, पुणे.
- सिंह, कटार; शिशोदिया, अनिल, पर्यावरणीय अर्थशास्त्र : सिद्धांत आणि उपयोजन, नवी दिल्ली, २०१७.
समीक्षक : विनायक देशपांडे
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.