सामाजिक विज्ञान क्षेत्रातील संशोधन करणारी एक मुख्य राष्ट्रीय संस्था. विशेषत्वाने या संस्थेची स्थापना आंतरविद्याशाखीय संशोधन, सामाजिकशास्रांतील प्रशिक्षण आणि आर्थिक, राजकीय, सामाजिक परिवर्तनावर परिणाम करणाऱ्या क्लिष्ट समस्यांचे विश्लेषण करण्यासाठी करण्यात आली आहे. या संस्थेची स्थापना पद्मविभूषण व्ही. के. आर. व्ही. राव यांनी १९७२ मध्ये बंगलोर येथे एका छोट्याशा भाड्याच्या घरात केली. नंतर ही संस्था राज्य शासनाने वितरित केलेल्या कार्लेटन हाऊस या इमारतीत आणि त्यानंतर १९७५ मध्ये नागर्भावी बंगलोर येथे उभारण्यात आलेल्या स्वतःच्या वास्तुत स्थिरस्थावर झाली. यापूर्वी राव यांनी सामाजिक विज्ञान क्षेत्रातील ‘दिल्ली स्कूल ऑफ इकनॉमिक’ आणि ‘इन्स्टिट्यूट ऑफ इकनॉमिक ग्रोब’ या दोन संस्था उत्तर भारतात उभारल्या होत्या. या संस्थेला कर्नाटक सरकार आणि भारतीय समाज विज्ञान अनुसंधान परिषद (आयसीएसएसआर, नवी दिल्ली) यांनी आर्थिक पाठबळ दिले.
आयएसईसी ही संस्था सुमारे ४९ वर्षांपासून भारतातील सामाजिक विज्ञान क्षेत्रात संशोधन करीत आहे. समाजाचे प्रश्न समजून घेणे आणि त्यावरील उपाययोजना सूचविणे हे कोणत्याही सामाजिक विज्ञान संशोधन संघटनेचे मूलभूत कर्तव्य आहे, या दृष्टीकोनातून आयएसईसी पुढे वाटचाल करीत आहे. आर्थिक, सामाजिक, मानवशास्त्र, समाजकार्य, राज्यशास्त्र, लोकप्रशासन, लोकसंख्याशास्त्र, नागरी अभ्यास आणि समस्या अंतर्भूत असलेले सांख्यिकीय अध्ययन यांवरील चिरंतन संशोधन गरजेचे असून यासाठी आयएसईसीने भिन्न मार्ग प्रस्थापित केले आहे.
दारिद्र्याचे विविध पैलू आणि मानव विकास समजून घेण्यासाठी आयएसईसीने मोठ्या प्रमाणात संशोधन अभ्यास हाती घेतला आहे. ज्याचा संबंध गरीब आणि लाभवंचित गटांचे ठळकपणे प्रगटीकरण यांच्याशी आहे. धोरणासंदर्भात विश्लेषणात्मक व उपयोजित संशोधन अभ्यास हेसुद्धा आयएसईसीचे प्राधान्य क्षेत्र आहे. केंद्र, राज्य आणि स्थानिक सरकारे यांच्या विविध धोरणांचे आणि कार्यक्रमांचे मूल्यांकन करण्यासाठी संस्थेशी संपर्क साधला जातो. गेल्या अनेक वर्षांत संस्थेने भारतातील व परदेशांतील प्रतिष्ठित संस्थांशी सलोख्याचे संबंध स्थापित केले. विदेशी विद्यापीठांमध्ये लंडन स्कूल ऑफ इकनॉमिक्स, नोरिक केंद्र; मास्ट्रिच विद्यापीठ, नेदरलंड; वॉरसा विद्यापीठ, पोलंड इत्यादी विद्यापीठांरोबर संस्थेने सहयोग स्थापित केला आहे.
उद्दिष्टे :
- आंतरविद्याशाखीय चौकटीत विकसनशील समाजाच्या सर्व बाजूंचा समावेश करणारे शुद्ध आणि उपयोजित सामाजिकशास्त्रातील संशोधन करणे. यामध्ये देशातील आर्थिक, पर्यावरणीय, सामाजिक, लोकसंख्याशास्त्रीय, शैक्षणिक आणि प्रशासकीय अडचणी व समस्या यांच्या अभ्यासाचा समावेश होतो.
- संशोधन अभ्यासावर आधारित धोरणमुद्दे देण्यासाठी केंद्र, राज्य आणि स्थानिक सरकारला साहाय्य करणे.
- विद्यावाचस्पती विद्यार्थ्यांना आणि महाविद्यालये व विद्यापीठातील शिक्षकांना नियमितपणे प्रशिक्षण देणे; त्याच बरोबर अधिकारी व विशेषतः स्थानिक पातळीवरील राजकीय कार्यकर्ते यांना सामाजिक आणि आर्थिक समस्यांबाबत जागृत करणे व त्यांचे कौशल्यवृद्धींगत करण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम हाती घेणे.
- सामाजिक शाखांच्या अभ्यासासाठी माहिती केंद्र (डेटा सेंटर) निर्माण करणे व कागदपत्रांची देखभाल करणे.
- सामाजिक व आर्थिक विकास आणि बदल यांमधील शुद्ध व उपयोजित संशोधनास उत्तेजन देणे. यासाठी संस्थेच्या क्षमतेनुसार सर्वतोपरी उपाययोजना हाती घेणे.
- जागतिक बँक, अशियायी विकास बँक, संयुक्त राष्ट्रे (यूएस), युनिसेफ आणि आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (आयएलओ) या बहुस्तरीय किंवा बहुपक्षीय संघटनांना सामायिकपणे संशोधन व प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यासाठी साहाय्य करणे.
- संशोधन व प्रशिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी विद्यापीठे, संशोधन संस्था आणि बिगर शासकीय संघटना (एनजीओ) यांच्यासोबत सहयोग साधणे इत्यादी.
आयएसईसीच्या संशोधनाचे परिणाम : संस्थेने हाती घेतलेल्या धोरणात्मक संशोधन व धोरणात्मक संवादाचा समाजाच्या विविध स्तरांवर प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे पुढील प्रमाणे परिणाम झाला.
- अर्थव्यवस्था, सभ्यता आणि समाज यांना समजून घेण्यासाठी प्रकाशने, चर्चासत्रे, कार्यशाळा आणि प्रशिक्षण कार्यक्रमांच्या माध्यमातून माहिती जनतेपर्यंत पाहोचविण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
- धोरण, संशोधन व मूल्यांकन या अभ्यासाच्या माध्यमातून विशेषतः राज्य व स्थानिक पातळीवरील सरकारांना धोरणांची आखणी आणि अंमलबजावणी याकामी साहाय्य व सल्ला देण्यात योगदान दिले.
- विविध आयोग, समित्या आणि कार्यकारी गटांमधील प्रतिनिधींच्या माध्यमातून आयएसईसीच्या प्रतिनिधीत्वाने सरकारी धोरणांवर थेट परिणाम केला आहे.
- विविध धोरणांची आखणी व अंमलबजावणी करण्यामागील तत्त्वज्ञान आणि युक्तिवाद समजून येण्यास मदत करण्यासाठी आयएसईसीने सरकारी अधिकारी वर्गास वेळोवेळी प्रशिक्षण दिले.
- विकेंद्रीकृत कारभारासाठी विशेषत: जिल्हा पंचायतीमधून व्यापक प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन केले.
- स्वयंसेवी संस्थांशी क्रियात्मक संशोधन करण्यासाठी आणि त्यांच्या कामात सुधारणा करण्यासाठी प्रशिक्षित स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
- कठोर, रचनात्मक कार्यक्रमांद्वारे सामाजिक शास्त्रज्ञांना प्रशिक्षण दिले, ज्यामुळे सर्व सामाजिक शास्त्रांच्या शाखांमध्ये विद्यावाचस्पती पदवी या संशोधन अभ्यासक्रमास चालना मिळाली.
- अध्यापन व संशोधनाची गुणवत्ता वाढविण्यासाठी विद्यापीठ, महाविद्यालयीन शिक्षक आणि सामाजिकशास्त्रज्ञांना नवीनतम घडामोडींवर प्रगत प्रशिक्षण दिले.
- देश-विदेशांसमोरील महत्त्वपूर्ण राजकीय, सामाजिक आणि आर्थिक विषयांवर तसेच घडामोडींवर प्रख्यात सामाजिकशास्त्रज्ञांची जाहीर व्याख्याने आयोजित केली.
- आयएसईसीने खासगी क्षेत्राबरोबर जवळून काम करताना चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, भारतीय उद्योग संघ (सीआयआय) आणि इतर उद्योजक संघटना यांना उदयोन्मुख व्यावसायिक घडामोडीसाठी तयार करण्यास मदत केली. उदा., जागतिक व्यापार संघटना किंवा नवीन करप्रणालीबाबत परिचित करणे.
- इतर सामाजिक विज्ञान संशोधन संस्थांशी मोठ्या प्रमाणात प्रकाशने सामायिक केली गेली. सामाजिक विज्ञान व धोरण निर्मात्यांद्वारे त्यांना एकसारखेपणा प्राप्त झाला आहे. यामध्ये विविध आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि प्रशासकीय विषयांवर सुमारे १,९६५ उपयोजित आणि धोरणासंबंधित अभ्यास हाती घेतले.
- फोर्ड फाउंडेशनच्या अर्थसाहाय्याने वित्तीय, राजकीय, प्रशासकीय आणि समाजशास्त्रीय पैलूंवर अनेक अभ्यास केले गेले. कार्यक्रम व धोरणांवरील विविध मूल्यांकन अभ्यासानुसार शिक्षण, आरोग्य सेवा, गरिबीविरोधी धोरणांची अंमलबजावणी आणि सामाजिक कल्याणकारी योजनांवरील सरकारी धोरणांची आखणी व धोरण सुधारणा करण्यासाठी उपयुक्त माहिती प्रदान केली गेली.
आयएसईसी ही संस्था बहुतेक सामाजिकशास्त्रांमधील पीएच. डी. अभ्यासक्रमासाठी ओळखली जाते. पीएच. डी. करीता निवड करण्यात येणारे विद्यार्थी सिद्धांत, संशोधन कार्यपद्धती आणि परिणामात्मक तंत्रांचा कठोर अभ्यासक्रम पार पाडतात.
संस्थेद्वारा विविध गटांसाठी प्रशिक्षण आयोजित केले जाते. त्यामध्ये अर्थशास्त्र, समाजशास्त्र, शिक्षण व विकास प्रशासन विषयातील महाविद्यालयीन आणि विद्यापीठातील शिक्षकांसाठी उजळणी वर्ग इत्यादी महत्त्वाचे आहे. वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांसाठी अर्थव्यवस्था व धोरणांसंबंधित विविध बाबींचे प्रशिक्षण घेणे; विविध जिल्हा पंचायतींमधील प्रतिनिधींना प्रशिक्षण देण्याची क्षमता निर्माण करणे; खासगी क्षेत्रांपर्यंत पोहोचण्यासाठी हिंदुस्तान लिव्हर लिमिटेडच्या ग्रामीण विपणन व्यवस्थापन प्रशिक्षणार्थ्यांसाठी एक अभिनव प्रशिक्षण कार्यक्रम घेणे; आय. ए. एस. अधिकाऱ्यांसाठी सुक्ष्म पातळीवरील नियोजन आणि विकेंद्रीकरणासाठी व माहिती वापरण्यासाठी क्षमता विकास कार्यक्रम घेणे; भारत सरकारच्या वरिष्ठ आय. ई. एस. अधिकाऱ्यांना इकोमेट्रिक साधने आणि इकॉनिकचे प्रशिक्षण घेणे; जागतिक बँक, अशियायी विकास बँक, फोर्ड फाऊंडेशन, कॉमनवेल्थ ऑर्गनायझेशन, इतर संशोधन संस्था आणि विद्यापीठे यांसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांसोबत परिषदा, चर्चासत्रे आणि कार्यशाळा आयोजित करण्यासाठी संस्था सहकार्य करीत आहे.
आयएसईसी संस्थेच्या परिक्षेत्रात शैक्षणिक व प्रशासकीय संकुल, विद्यार्थी वसतीगृहे, सुमारे ६० वातानुकुलीत खोल्यांचे अतिथीगृह, सुमारे ७७ शिक्षक व कर्मचाऱ्यांसाठी निवासी सुविधा, सुमारे ४ चर्चासत्रकक्ष, २ समितीकक्ष आणि सुमारे ३०० आसनव्यवस्थेचे सभागृह आहे.
आयएसईसीचे व्ही. के. आर. व्ही. राव या नावाचे संपूर्ण संगणकीकृत ग्रंथालय आहे. यामध्ये सुमारे २ लाख पुस्तकांचा संग्रह, सुमारे ४०० नियतकालिके, औपचारिक आणि अनौपचारिक कागदपत्रे, मागील व्यावसायिक नियतकालिकांचे खंड उपलब्ध आहेत. हे ग्रंथालय दक्षिण भारतामध्ये सामाजिकशास्त्राचे उत्तम संदर्भ ग्रंथालय समजले जाते. या ग्रंथालयाकडे जागतिक व विविध आंतरराष्ट्रीय संस्थांकडून प्राप्त संदर्भांचा संग्रह आहे. याशिवाय भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या वारसा म्हणून प्राप्त मौल्यवान ग्रंथांचा संग्रह, प्रा. राव आणि प्रा. पी. आर. ब्रह्मानंद यांच्या किमती वस्तूंचे त्यामध्ये मोलाचे योगदान देतात.
भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाने १९९७ मध्ये प्रा. व्ही. के. आर. व्ही. राव चेअरची स्थापना केली. याच्या संचालक मंडळातील सदस्य प्रत्येक दोन वर्षांसाठी गव्हर्नर्स चेअरसाठी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अर्थशास्त्रज्ञ निवडतात. प्रा. टी. एस. श्रीनिवासन, अध्यक्ष अर्थशास्त्र विभाग, बेल विद्यापीठ हे आयएसईसीचे पहिले चेअर प्राध्यापक होय.
समीक्षक : संतोष दास्ताने
भाषांतरकार : अविनाश कुलकर्णी