इनामदार, मनीषा : (२५ फेब्रुवारी १९६७ ). भारतीय मूल-पेशी (स्कंद, बुध्न, आद्य पेशी; स्टेम सेल) विकसनशील जीवशास्त्रज्ञ. सध्या त्या भारताच्या जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर अॅडव्हान्स सायंटिफिक रिसर्च संस्थेच्या (JNCASR ; जेएनसीएएसआर) बेंगलुरू (कर्नाटक) येथील स्टेम कोशिका विज्ञान आणि पुनर्योजी औषधी संस्था अर्थात डीबीटी-इन्स्टेम (Institute for Stem Cell Science and Regenerative Medicine) येथे संचालक पदावर कार्यरत आहेत. भारतातील मूल-पेशीवर कार्य करणारी ही पहिलीच संस्था आहे.
इनामदार यांनी रेणवीय-जीवशास्त्र या विषयातून टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (टिआयएफआर; TIFR) येथून पीएच.डी. मिळवळी आणि त्यानंतर चॅपल हिल येथील नॉर्थ कॅरोलायना विद्यापीठात हृदयवाहिका-जीवशास्त्र या विज्ञान शाखेत (cardiovascular biology) संशोधन केले. त्यांचे प्रावीण्य मूल-पेशी आणि भ्रूण विकास विज्ञान या क्षेत्रांत आहे. त्या इंडियन अकादमी ऑफ सायन्सेस आणि इंडियन नॅशनल सायन्स अकादमी यांचे अधिछात्र आणि जेसी बोस राष्ट्रीय अधिछात्र आहेत.
इनामदार यांनी जेएनसीएएसआर या संस्थेत मूल-पेशी संशोधन प्रयोगशाळा सुरू केली. त्यांच्या प्रयोगशाळेत अनेक संशोधक, विद्यावाचस्पती अधिछात्र, प्रशिक्षणार्थी-संशोधक आणि सहाध्यायी संशोधन करतात. या संस्थेमध्ये त्या निकामी पेशींची जागा सुधारित मूल-पेशी कशा स्थापित करायच्या यावर संशोधन करतात. त्यांनी विकृत भ्रूणामधून सामान्य मूल-पेशी मिळवल्या आहेत. युनायटेड किंगडममधील मूल- पेशी संग्रहालयात (स्टेम सेल बँक) त्यांचा समावेश केला आहे. आंतरराष्ट्रीय मूल-पेशी संघटन (International Stem Cell Forum (ISCI2) ही संस्था या आंतरराष्ट्रीय मूल- पेशी संघटटन संस्थेची एकमेव सभासद आहे.
इनामदार या पुनुरुत्पादक औषध विज्ञान क्षेत्रात नव्या उपचार पद्धती शोधत आहेत. रुग्णातून मुद्दाम विकसित केलेल्या बहुसम्भवी मूल-पेशीवर त्या संशोधन करीत आहेत. यावर त्यांचे अनेक शोधनिबंध आणि लेख प्रसिद्ध झाले आहेत. त्यांनी त्यांच्या प्रकल्पांचे मार्गदर्शन सुद्धा केले आहे. यूके –इंडिया रिसर्च इनिशिएटिव्ह, इंडो यूएस सायन्स अॅन्ड टेक्नॉलॉजी, वेलकम ट्रस्ट यू के, डीबीटी (डिपार्टमेंट बायोटेक्नॉलॉजी ) इंडो डॅनिश प्रोग्राम आणि इंडो फ्रेंच सेंटर फॉर प्रमोशन ऑफ अॅडव्हान्स रिसर्च यांचे प्रकल्प यांचाही त्यांच्या संशोधनात समावेश आहे. इंडियन सोसायटी ऑफ सेल बायॉलॉजी संस्थेच्या त्या आजीव सभासद, सोसायटी फॉर डेव्हलपमेंटल बायॉलॉजी यूएसए, इंटरनॅशनल सोसायटी फॉर स्टेम सेल रिसर्च, नॉर्थ अमेरिकन, व्हॅस्क्युलर बायालॉजी ऑर्गनायझेशन आणि इंडियन सोसायटी ऑफ डेव्हलपमेंटल बायॉलॉजी यांच्याही सभासद आहेत. इंटरनॅशनल स्टेम सेल इनिशिएटिव्हमध्ये त्या भारताचे प्रतिनिधित्व करतात. आंतरराष्ट्रीय मूल-पेशी बॅन्किंग इनिशिएटिव्हच्या सुकाणू समितीच्या त्या सदस्य आहेत. पुढील अनेक राष्ट्रीय व आंतर राष्ट्रीय समित्यांच्या त्या मार्गदर्शक आहेत : युरोप आंतरराष्ट्रीय मूल-पेशी संशोधनातील नैतिकता समिती, जैव संशोधन नैतिकता नियोजन समिती आणि जागतिक आरोग्य संघटना आणि मानवी जीनोम प्रकल्पावरील सम्पादन समित्या.
इनामदार या मानवी गर्भ पेशी मूल-पेशी वृद्धी मिश्रणात वाढवून त्या पेशी संशोधनाकरिता उपलब्ध करून देतात. सस्तन प्राण्यांच्या हृदय विकासातील मूळ पेशींचे कार्य, उंदीर भ्रूण विकास, जनुकीय बदल केलेले सजीव आणि ड्रासोफिला आनुवंशविज्ञान यावर त्यांच्या प्रयोगशाळेत महत्त्वपूर्ण संशोधन झालेले आहे. सध्या सस्तन प्राण्यांच्या भ्रूण विकासात मूल-पेशींचे स्थान यावर त्या संशोधन करत आहेत.
इनामदार यांना इंडियन अॅकॅडमी ऑफ सायन्सेसचे तरुण वैज्ञानिक पुरस्कार, डिपार्ट्मेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजीचे जीवविज्ञान पुरस्कार -फॉर करियर डेव्हलपमेंट ॲवार्ड, इंडियन अॅकॅडमी ऑफ सायन्स फेलोशिप, कल्पना चावला ॲवार्ड, प्रो. सीएनआर राव ओरेशन ॲवार्ड आणि जे सी बोस नॅशनल फेलोशिप असे सन्मान मिळाले आहेत.
कळीचे शब्द : मूल-पेशी आणि भ्रूण विकास.
संदर्भ :
समीक्षक : मोहन मद्वाण्णा