कार्सन, रेचल (२७ मे १९०७ – १४ एप्रिल १९६४)

अमेरिकन सागरी जीवशास्त्रज्ञ. कार्सन या निसर्ग आणि मानव यांचा परस्परसंबंध दाखवून देणाऱ्या प्रभावी लेखिका मानल्या जातात.

कार्सन  यांचा जन्म  पेनसिल्व्हेनियातील (यूएसए)  स्प्रिंगडेल येथे झाला. आठव्या वर्षी त्या प्राण्यांच्या गोष्टी लिहू लागल्या. दहाव्या वर्षी त्यांची पहिली गोष्ट प्रसिद्ध झाली. लहान वयातच त्यांनी पक्षी निरीक्षणाचा छंद जोपासला होता. समुद्र आणि त्याच्याशी संबंधित गोष्टी वाचायला त्यांना फार आवडत. कार्सन यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण पेनसिल्व्हेनियातील शाळेत झाले आणि नंतर त्यांनी पेनसिल्व्हेनिया कॉलेज फॉर विमेन  महाविद्यालयात इंग्रजी भाषेच्या पदवी परीक्षेसाठी प्रवेश घेतला. परंतु महाविद्यालयातील  प्राणिशास्त्र विभागाशी संबंध आल्यावर त्यांनी इंग्रजी भाषेचा अभ्यास थांबवला. त्या प्राणिशास्त्राच्या अभ्यासक झाल्या. जॉन्स हॉपकिन्स विश्वविद्यालयातून त्यांनी प्राणिशास्त्र विषयाचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले(१९२९). त्यांना डॉक्टरेट करण्याची फार इच्छा होती. परंतु त्यांच्या वडिलांचे अचानक निधन झाल्यावर नाईलाजाने घरच्या आर्थिक जबाबदाऱ्यांमुळे कार्सन यु एस ब्युरो ऑफ फिशरीज (U.S. Bureau of Fisheries) या शासकीय संस्थेत काम करू लागल्या. सागरी संशोधनाबरोबरच स्थानिक वर्तमानपत्र व नियतकालिकांमध्ये मत्स्यजीवशास्त्राविषयी त्या लेख लिहू लागल्या.

कार्सन आकाशवाणीसाठी  रे या नावाने अधिकृत अहवाललेखन करीत होत्या.त्यांनी रोमान्स अंडर द वॉटर (Romance Under the Waters)  या नावाची ५२ भागांची शैक्षणिक मालिकाही आकाशवाणीच्या कार्यक्रमासाठी लिहीली. त्यातून त्यांचे अंडर द सी विंड Under the Sea Wind (१९४१)  हे पहिले पुस्तक प्रसिद्ध झाले. या पुस्तकासंबंधी उत्तम परीक्षणे लिहिली गेली. परंतु ते फारसे विकले गेले नाही.

अमेरिकन शासनाने १९४५च्या दरम्यान रासायनिक कीटकनाशकाच्या वापरासाठी एक मोठी मोहिम ठिकठिकाणच्या राज्यांमध्ये राबविण्यास सुरुवात केली. त्याच्यात कार्सन यांचाही मोठा सहभाग होता. त्यांनी सर्वप्रथम डी.डी.टी. या अत्यंत परिणामकारक कीटकनाशकाबद्दल लिहिले. या विषयाचे गांभीर्य लक्षात न आल्याने १९६२ पर्यंत डी.डी.टी.बद्दलचे त्यांचे लेखन प्रसिद्ध होऊ शकले नाही. त्यांनी १९४८मध्ये पूर्ण वेळ लेखक म्हणून काम करण्याचे ठरविले. त्यानंतर तीन वर्षातच त्यांचे ‘सी अराउंड अस’(The Sea Around Us) हे  पुस्तक ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने प्रकाशित केले. त्याच्या दोन लाख प्रती खपल्या. न्यूयॉर्क टाईम्सच्या सर्वाधिक खपाच्या पुस्तक यादीत ८६आठवडे या पुस्तकाला स्थान मिळाले. या पुस्तकाने कार्सन यांना प्रसिद्धी, पुरस्कार आणि आर्थिक स्थैर्य मिळवून दिले.

कार्सन यांनी १९५५मध्ये द एज ऑफ द सी (The Edge of the Sea)  हे समुद्रकिनाऱ्याच्या परिसंस्थेविषयी पुस्तक लिहीले. त्यानंतर कार्सन यांनी पर्यावरणावर आधारित अभ्यास आणि लेखन सुरु केले. त्यातून रिमेमबरन्स ऑफ द अर्थ (Remembrance of the Earth)  हे पुस्तक तयार झाले. रसायनांमुळे पर्यावरणाचे प्रचंड नुकसान होत आहे, हे पाहून कार्सन फार अस्वस्थ झाल्या. कीटकनाशकांचे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम अमेरिकन जनता आणि शासनासमोर आणण्यासाठी त्यांनी सायलेंट स्प्रिंग (Silent Spring) हे पुस्तक लिहिले. २७ सप्टेंबर १९६२ या दिवशी हॉग्टन मिफ्लीन (Houghton Mifflin Harcourt) या प्रकाशन संस्थेने ते प्रकाशित केले.

सायलेंट स्प्रिंग प्रसिद्ध झाल्यावर अमेरिकेतील रासायनिक उद्योगांनी कार्सन यांच्याविरुद्ध प्रचार सुरु केला. त्यांना कायदेशीर पत्रे पाठवली. परंतु सामान्य जनतेने हे पुस्तक अक्षरशः डोक्यावर घेतले. त्याची पहिली आवृत्ती फारच लवकर संपली. या पुस्तकाला आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी मिळाली. अमेरिकन शासनाच्या टीकेला निसर्गप्रेमी कार्सन यांनी समर्थपणे तोंड दिले. जनतेने त्यांना पाठिंबा दिला. सायलेंट स्प्रिंगमुळे पर्यावरणवादी चळवळीचा पाया घातला गेला. रसायनांविरुद्ध आवाज उठवला गेल्याने, समाजाला निसर्ग पर्यावरणाकडे बघण्याची नवी दृष्टी मिळाली. सायलेंट स्प्रिंगमुळे संपूर्ण मानव जातीत एक क्रांती घडवून आणली. शास्त्रीय माहिती आणि काव्यमय भाषा एकत्र गुंफलेले  २०व्या शतकातील अत्यंत महत्त्वाचे पुस्तक, अशी कीर्ती या पुस्तकाला मिळाली. त्यांचा सरकारी संस्था, पर्यावरणप्रेमी संस्था यांच्याकडून मरणोत्तर गौरव करण्यात आला. १९८० मध्ये कार्सन यांना प्रेसिडेन्शिल मेडल ऑफ फ्रिडम (Presidential Medal of Freedom) बहाल करण्यात आले. तसेच त्यांच्या स्मरणार्थ टपाल तिकीटही प्रकाशित झाले. सायलेंट स्प्रिंग हे पुस्तक ज्या घरात बसून कार्सन यांनी लिहीले ते घर राष्ट्रीय ऐतिहासिक स्मारक स्थळ म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांच्या हयातीत आपल्या लेखनाचा परिणाम त्याना प्रत्यक्ष पहाता आला नाही.

कार्सन यांच्या कार्याची ओळख रहावी म्हणून अमेरिकेतील बऱ्याच संरक्षित क्षेत्रांना रेचल कार्सन असे नाव देण्यात आले आहे. पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना रेचल कार्सन पुरस्कार दिले जातात. कार्सन यांच्या २००७ या जन्मशताब्दी वर्षात  पर्यावरण संमेलनाचे आयोजन, त्यांच्या काही पुस्तकाचे प्रकाशन आणि पर्यावरण जागृतीसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजनही केले गेले.

कार्सन यांचा मृत्यू सिल्वर स्प्रिंग, मेरीलंड येथे झाला.

संदर्भ :

समीक्षक – मोहन मद्वाण्णा

प्रतिक्रिया व्यक्त करा