भारतीय शेतकर्‍यांच्या समस्यांचा व त्यावरील उपायांचा विस्तृतपणे विश्लेषण करणारे एक महत्त्वपूर्ण पुस्तक. भारतीय शेतीवरील वैज्ञानिक दृष्टीकोनातून लिहिलेले हे पहिले पुस्तक आहे. इसवी सन १८७५ मध्ये महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्‍यांनी सावकार व जमीनदारांविरुद्ध एक मोठे आंदोलन केले. बहुदा याच विषयावर महात्मा फुले यांनी अभ्यास करण्याचे ठरवून इ. स. १८८३ मध्ये शेतकऱ्यांचा असूड हे पुस्तक लिहिले असावे. तत्पूर्वी त्यांनी शेतकरी आणि शेतीसंबधातील समस्यांचे प्रदीर्घ काळ संशोधन व चिंतन केले. सदर पुस्तकात त्यांनी भारतीय शेतीतील समस्यांचा शास्त्रशुद्ध पद्धतीने आलेख मांडला व त्यावर तर्कशुद्ध पद्धतीने उपाय सुचविले. त्यांच्या विश्लेषणाची पद्धत ही प्रामुख्याने निरीक्षणात्मक आणि ऐतिहासिक या दोन प्रकारात मोडते. त्यांनी आपल्या ग्रंथात समकालीन परिस्थितिची कारणमीमांसा ऐतिहासिक दृष्टीकोनातून केली आहे.

भारतीय शेतकर्‍यांच्या समस्या आज स्वातंत्र्य प्राप्तीच्या ७७ वर्षांनंतरदेखील कमी झालेल्या नसून, उलट त्यात भर पडल्याचे दिसून येते. सद्यस्थितीमध्ये मागील एका दशकापेक्षा अधिक काळापासून होणार्‍या शेतकर्‍यांच्या आत्महत्येचा वाढत जाणारा आलेख त्यांच्या हलाखीच्या जीवनाचे निर्देशक मानता येईल. एका बाजूला उत्पन्नात वाढ होत नाही, तर दुसऱ्या बाजूस त्यांना वृद्धापकाळातदेखील श्रम केल्याशिवाय पर्याय नसतो. यांव्यतिरिक्त वर्तमानकाळात शेतीतील सरासरी धारण क्षेत्र एक हेक्टरपेक्षा कमी झालेले असून जमिनीची प्रत मोठ्या प्रमाणात खालावलेली आहे. यामुळे उत्पन्नापेक्षा उत्पादन खर्च अधिक होत असून याचा सरळ परिणाम शेतकर्‍यांच्या उत्पन्नावर होतो. हीच बाब महात्मा फुले यांनी आपल्या पुस्तकातून स्पष्टपणे मांडताना सामाजिक रचना कशाप्रकारे शेती व शेतकर्‍यांच्या सर्वांगीण विकासास बाधित करते, हे सोदाहरण स्पष्ट केले आहे. त्यांच्या एकंदर विश्लेषणाचे तीन प्रमुख मुद्दे सांगता येतील.

(१) भारतीय शेतकरी दुहेरी पारतंत्र्यात ꞉ पहिले पारतंत्र्य हे ब्राह्मणी व्यवस्थेचे असून त्याचा कालखंड शेकडो वर्षांचा आहे; तर दुसरे पारतंत्र्य ब्रिटिश राजवटीचे होते, जी तुलनेने अलीकडील आहे. ब्राह्मणी व्यवस्था ही विषमता आणि शोषणावर आधारित असून ती जातीव्यवस्थेच्या आधारावर अवलंबित आहे. याचा वरच्या समाजघटकाला आर्थिक व सामाजिक नफा प्राप्त होतो, तर खालच्या समाजघटकाला तोटा होतो. महात्मा फुले यांनी यासंदर्भात सूक्ष्म निरीक्षण नोंदविताना म्हणतात की, अश्रमिक ब्राह्मणांचे जीवन बहुजन समाजातील लोकांच्या अंधश्रद्धेवर टिकले असून श्रमिकवर्गाला जन्मापासून पुढे मृत्यूनंतरदेखील सामाजिक रुढी-परंपरांनुसार दान-दक्षिणा करणे बंधनकारक होते. याउलट, शेतकर्‍यांना त्यांच्या या कार्याकरिता कोणताही परतावा मिळत नव्हता. शेतकर्‍यांच्या मुलांना शिक्षणापासून दूर ठेवले गेले, कर्जबाजारीपणा वाढून जमिनी हडप करण्यात आल्या आणि बरेचदा त्यांच्यावर चुकीचे न्यायिक खटलेसुद्धा भरविण्यात येत. ब्रिटिश अधिकारीदेखील शेतकर्‍यांच्या समस्या सोडविण्यात रस दाखवीत नव्हते. ब्रिटिश राज्यात ब्राह्मण मोठ्या पदावर कार्यरत असल्याने ते शेतकर्‍यांच्या समस्यांचा स्वत꞉ला फायदा करून घेण्यासाठी ब्रिटिश अधिकार्‍यांचादेखील वापर करून घेत. अशा प्रकारे शेतकरी दुहेरी पारतंत्र्यात असल्याने त्यांची शेतीद्वारे मोठ्या बदलांची आशा भंग झालेले चित्रण महात्मा फुले यांनी मांडली. ते येथेच न थांबता भारतीय इतिहासात ब्राह्मणी विषमता व शोषण कसे पुरलेले होते, याचादेखील ऊहापोह त्यांनी आपल्या पुस्तकात केला आहे.

(२) शेती, शेतकर्‍यांची स्थिती आणि त्यांच्या समस्या ꞉ महात्मा फुले यांनी आपल्या शेतकऱ्यांचा असूड या पुस्तकातून शेतकऱ्यांच्या समस्यांचे अध्ययन करताना ते आधुनिक अर्थशास्त्रातील मानवी भांडवल या संकल्पनेचा पाया उभारतात. शेतकरी हे श्रम आणि भांडवल वापरून शेती हा व्यवसाय करतात; परंतु भारतीय शेती ही संपूर्णपणे पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे त्यांचे उत्पादन व उत्पन्न कमी असल्यामुळे बहुधा त्यांना भांडवलाकरिता सावकारांवर अवलंबून राहावे लागते. अशा वेळी सावकार शेतकर्‍यांचे अतोनात शोषण करतात आणि शेवटी त्यांची जमीनदेखील बळकावतात.

महात्मा फुले यांनी शेतकर्‍यांमधील शिक्षणाचा अभाव हे त्यांच्या शोषणाकरिता आणि मागासलेपणाकरिता महत्त्वाचे कारण असल्याचे स्पष्टपणे सांगतात. ते केवळ शिक्षणाबद्दल बोलत नाहीत, तर शिक्षणाच्या गुणवत्तेवरदेखील बोलतात. त्यांच्या मते, ‘शेतकर्‍यांना जाणीवपूर्वक शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आले. ज्या तुरळक घटकाला ही संधी उपलब्ध झाली, त्यांना धार्मिक शिक्षण देण्यात येत; परंतु त्यांना आवश्यक व गरजेचे शेती किंवा व्यावसायिक शिक्षण दिले जात नाही’. कौशल्याधारित शिक्षणाचा विचार फुले यांनी शंभर वर्षांआधी केवळ मांडलाच नाही, तर ते त्यांनी सुरू केलेल्या शाळेतून दिला. शिक्षणाच्या अभावाचे परिणामदेखील आपल्या पुस्तकात स्पष्ट करताना ते म्हणतात, ‘शेतकरी शिक्षणाच्या अभावामुळे धोरणात्मक कार्यवाहीमध्ये सहभागी होऊन शेती विकासासंबंधीचे निर्णय घेऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्या ज्ञानाचा व अनुभवाचा वापरच होत नाही. याव्यतिरिक्त अवाजवी शेतसारादेखील शेतकर्‍यांच्या मागासलेपणाचे एक कारण आहे’.

शेतीच्या स्थितीसंबंधीचे विश्लेषण आणि त्याची कारणे आजदेखील तंतोतंत लागू पडताना आढळून येते. यांत्रिकीकरणाच्या अगोदर भारतीय शेतीमध्ये चांगल्या प्रतीच्या वळूंचा पुरवठा आवश्यक असून तो मुख्यतः दोन कारणांनी कमी झाल्याचे महात्मा फुले स्पष्ट करतात. एक, ब्रिटिशांच्या आगमनानंतर वळूंचा उपभोगामध्ये अत्याधिक वापर सुरू झाल्याने शेतीकरिता योग्य प्रमाणात आणि उत्तम प्रतीचे वळू मिळणे कठीण झाले. दोन, साथीच्या रोगानेदेखील मोठ्याप्रमाणात वळू मृत्यूमुखी पडल्याने पुरवठा कमी झाला आहे.

(३) शेती व शेतकरी यांची स्थिति सुधारण्यासाठी उपाययोजना ꞉ हा तिसरा महत्त्वपूर्ण मुद्दा महात्मा फुले यांनी आपल्या पुस्तकातून मांडला आहे. वर्तमान स्थितीमध्येदेखील त्यांचे शेतीबाबतचे सर्व विचार लागू पडतात. सत्ताधारी आणि शेतकऱ्यांचे हितसंबंध वेगवेगळे असून त्यांचे एकमत होऊ शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचे हितसंबंध काटेकोरपणे जपावे लागतील. त्याकरिता शेतीविषयक आधुनिक ज्ञान व पद्धती वापरावी लागेल. उत्तम जातीची जनावरे उपयोगात आणावी लागतील. त्याच प्रमाणे समाजमान्य रूढी व परंपरा सोडून नवीन वैज्ञानिक विचार रुजवावा लागेल. उशिरा लग्न व कमी संततीचा अवलंब करावा लागेल. महात्मा फुले यांनी सरकारने कोणती कामे करावीत, याबद्दल स्पष्ट सूचना केल्याचे दिसते. सरकारने धरणे बांधून पाणी अडवावे, शेतकऱ्यांच्या मुलांकरिता शिक्षण द्यावे, योग्यतेनुसार व लोकसंख्येनुरूप सरकारमध्ये सामाऊन घ्यावे इत्यादी उपाययोजना ते आपल्या पुस्तकात सुचवितात.

शेतकर्‍यांचा असूड हे पुस्तक आजही भारतीय शेतकरी आणि शेती या दोन्हींबद्दल मूलगामी मार्गदर्शन करते. आज शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे वाढते प्रमाण महात्मा फुलेंच्या विचारांना अंमलात आणण्याचे पुरेसे कारण विशद करते. भारतीय शेती पारंपरिक पद्धतीने न करता आधुनिक पद्धतीने करण्याची गरज आहे. त्यांना दुप्पट उत्पन्न नाही, तर त्यांच्या मालाला योग्य भाव, साठवणुकीची साधने, आधुनिक शेतीचे ज्ञान, पारंपरिक पद्धतीने शेती केल्याने होणारे आर्थिक, सामाजिक, पर्यावरणीय परिणाम यांची जाणीव करून देणे गरजेचे आहे.

महात्मा फुले एकोणविसाव्या शतकातील क्रांतिकारी विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी ब्राह्मणी व सनातनी वर्चस्वाचा जोरदार विरोध करून त्या वर्चस्वातील अनेक सामाजिक प्रथा व चालीरीतींचा नायनाट करण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. स्त्रियांचे शिक्षण, विधवा पुनर्विवाह, स्त्रियांच्या घटस्फोटाचा अधिकार यांचे सशक्तपणे समर्थन केले. तेवढ्याच ताकदीने विधवा केशवपन, बाल विवाह आणि बहुविवाह पद्धतींचा विरोधही त्यांनी केला. मुलींच्या शिक्षणाकरिता भारतातील पहिली मुलींची शाळा इ. स. १८४८ साली पुण्यात सुरू केली. या कार्यात त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी तेवढ्याच क्रांतिकारक रीत्या त्यांना साथ दिली. त्यांच्या लिखाणात सातत्याने काळाच्या पुढे जाऊन तळागाळातील समाजाला दिशा दिली.

समीक्षक ꞉ संतोष दास्ताने