आंतरराष्ट्रीय व्यापार आणि व्यापार व्यवहारांच्या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण घटक म्हणजे विदेशी विनिमय दर होय. विदेशी विनिमय बाजारात विदेशी चलनाच्या देवाणघेवाणीचे व्यवहार होतात. तसेच एका चलनाचे दुसऱ्या चलनाच्या संदर्भातील मूल्य निश्चित केले जाते. म्हणजेच आंतरराष्ट्रीय व्यवहाराच्या पूर्ततेसाठी एका चलनाचा दुसऱ्या चलनाशी होणारा देवाणघेवाणीचा दर म्हणजे विदेशी विनिमय दर होय. उदा., १ अमेरिकी डॉलर ($) = भारतीय ८३ रुपये.

भारतीय रुपया आणि अमेरिकी डॉलर यांच्यात देवाणघेवाण होताना लागू होणारा विनिमय दर १ अमेरिकी डॉलर ($) = ८३ रुपये एवढा आहे. म्हणजेच १ अमेरिकी डॉलर विकत घेण्यासाठी ८३ रुपये मोजावे लागतात. थोडक्यात, विदेशी विनिमय दरावरून एका चलनाचे दुसऱ्या चलनासंदर्भातील मूल्य लक्षात येते. त्यामुळे विदेशी विनिमय दर हा नेहमी सापेक्ष असतो.

प्रकार ꞉ विदेशी विनिमय दर निश्चित करण्याचे दोन प्रकार आहेत.

  • (१) नियंत्रित विनिमय दर (फिक्स्ड एक्सचेंज रेट) ꞉ नियंत्रित विनिमय दर पद्धतीमध्ये चलनाचा विनिमय दर हा त्या त्या देशाच्या मध्यवर्ती बँकेकडे असणाऱ्या विदेशी चलन गंगाजळीवरून नियंत्रित केला जातो. आंतरराष्ट्रीय मुद्रानिधी स्थापन होण्यापूर्वी बहुतांश देशांमध्ये नियंत्रित विनिमय दर ही पद्धत अस्तित्वात होती. यामध्ये विनिमय दर हा सुवर्णमान पद्धतीनुसार (गोल्ड स्टँडर्ड) ठरवला जात असे.
  • (२) लवचिक विनिमय दर (फिक्सेबल एक्सचेंज रेट) ꞉ आंतरराष्ट्रीय मुद्रानिधी अस्तित्वात आल्यानंतर व जागतिकीकरणाच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून लवचिक विनिमय दर ही पद्धत अस्तित्वात आली. या पद्धतीत विनिमय दराची निश्चिती ही प्रत्यक्ष बाजाराकडून होते. विदेशी विनिमय बाजारातील चलनाच्या मागणी व पुरवठ्यानुसार विनिमय दर निश्चित होतो व तो बाजारातील बदलांना प्रतिसाद देणारा असल्याने विनिमय दरात चढ-उतार होताना दिसतात.

बाजारनियमानुसार एखाद्या चलनाचे मूल्य कमी झाले, तर त्यास मूल्यऱ्हास (डिप्रेसिएशन) असे म्हणतात आणि एखाद्या चलनाचे मूल्य वाढत असेल, तर त्यास मूल्यवृद्धी (ॲप्रिसिएशन) असे म्हणतात. बाजारातील विविध घटक हे अशा प्रकारच्या विनिमय दर निश्चितीवर परिणाम घडवत असतात. लवचिक विनिमय दर पद्धतीचा स्वीकार केल्यानंतर देशाच्या मध्यवर्ती बँकेला विनिमय दर निश्चितीमध्ये सरसकट हस्तक्षेप करता येत नाही; परंतु विनिमय दरामध्ये अवास्तव मूल्यऱ्हास अथवा मूल्यवृद्धी घडून येत असेल, तर मध्यवर्ती बँक काही प्रमाणात या परिस्थितीवर नियंत्रण ठेवू शकते. यालाच मर्यादित हस्तक्षेप पद्धत (मॅनेज्ड फ्लोट सिस्टिम) असे म्हणतात. या पद्धतीमध्ये विनिमय दरातील बदल एका विशिष्ट मर्यादेत राखण्याचा प्रयत्न केला जातो; मात्र ही मर्यादा ओलांडल्यानंतर देशाची मध्यवर्ती बँक त्यात हस्तक्षेप करू शकते. आजमितीला भारतात मर्यादित हस्तक्षेप पद्धत अस्तित्वात आहे.

आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रात विनिमय दर निश्चितीसाठी सुवर्णमान सिद्धांत, मागणी-पुरवठा सिद्धांत, व्यवहारतोल सिद्धांत अशा अनेक सिद्धांतांचा अभ्यास केला जातो.

विदेशी विनिमय दराचा थेट संबंध हा देशाच्या गुंतवणूक व व्यापार व्यवहारांशी असल्याने विदेशी विनिमय दरामध्ये होणारे चढ-उतार हे अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण बदल घडवून आणतात. म्हणूनच विकसनशील देशांसाठी विनिमय दरातील स्थैर्य महत्त्वाचे  ठरते.

लेखक ꞉ कुलकर्णी, अपर्णा

समीक्षक ꞉ आर. माहोरे