नैसर्गिक शेती हा एक पर्यावरणीय दृष्टिकोण आहे. शेतीच्या पद्धतीचा हा दृष्टिकोण जपानी शेतकरी व तत्त्ववेत्ता मसनोबू फुकौका यांनी त्यांचे पुस्तक द वन-स्ट्रॉ रिव्होल्युशन यामध्ये १९७५ मध्ये मांडला. या शेतीपद्धतीस फुकौका पद्धती असेही संबोधले जाते. नैसर्गिक शेती ही सुपीक शेती, सेंद्रीय शेती, शाश्वत शेती, वनशेती, आणि पर्यावरणीय शेतीशी संबंधीत आहे; परंतु ही जैवगती शेतीपेक्षा वेगळी आहे.
नैसर्गिक शेतीच्या संदर्भात फुकौका असे प्रतिपादन करतात की, शेतकऱ्यांना शेतीच्या स्थानिक परिसराच्या प्रत्यक्ष निरिक्षणाचा फायदा होऊ शकतो. ही एक बंदिस्त पद्धती आहे. फुकौका असा दावा करतात की, हा शेतीचा दृष्टिकोण विपुल प्रमाणात धान्य उपलब्ध करून देताना जलप्रदूषण, जैवविविधतेचे नुकसान आणि जमिनीची धूप यांना प्रतिबंध करतो. फुकौका यांनी या शेतीपद्धतीची शेतात नांगरणी न करणे, खतांचा वापर न करणे, कीटकनाशकांचा वापर न करणे, तणांची कापणी न करणे आणि रोपांची कापणी न करणे असे पाच तत्त्वे सांगितले आहेत.
नैसर्गिक शेतीचे फायदे :
- नैसर्गिक शेती ही अधिक हळुवार प्रक्रिया असली, तरी या शेतीमध्ये पर्यावरणीय, आरोग्य, आर्थिक दृष्ट्या अनुकूलता असतेच. यामुळे लहान शेतकऱ्यांसाठी संक्रमण सुलभ होते.
- गरीब शेतकरी किंवा असुरक्षित शेतकरी यांनी नैसर्गिक शेती पद्धतीचा अवलंब केल्याने सर्वाधिक फायदा होतो.
- नैसर्गिक शेतीमुळे माती मऊ होऊन अन्नाची चव सुधारते. त्यामुळे शेतकऱ्यांचे निव्वळ उत्पन्न वाढू शकते.
- नैसर्गिक शेतीमधील रासायनिक खते, फवारणी, तण कापणी इत्यादी पर्कार नसल्यामुळे खर्चाची बचत होऊन वाजवी किमतीत सुरक्षित अन्न मिळू शकते.
- नैसर्गिक शेतीवर आधारित वन व्यवस्थापन आणि शेतीपद्धतीमुळे सध्या रसायनांच्या वापरामुळे जी जागतिक भूपत खालावत आहे, ती पुन्हा भरून मातीच्या सुपीकतेच्या पूर्वतयारी तसेच पौष्टिक अखंडतेची पूर्तता करू शकते.
- नैसर्गिक शेती केवळ शेतकऱ्यांचे पैसे वाचवत नाही, तर ते जमिनीत कार्बनचे स्थिरीकरणदेखील वाढवते; ज्यामुळे हवामान बदल कमी होण्यास मदत होते.
भारतात नैसर्गिक शेतीचा संदर्भ नेहमी ऋषीमुनींच्या शेतीपद्धतीशी लावला जातो. यामध्ये प्राचीन वैदिक तत्त्वांचा समावेश होतो. त्यामधे प्राण्यांचे मलमूत्र आणि वनस्पती यांचा उपयोग कीडप्रतिबंधक आणि पिकांच्या वाढीस पोषक तत्त्व म्हणून केला जातो. भारतातील ऋषीमुनी गो-उत्पादन पदार्थ म्हणजे ताक, दूध, दही आणि गोमूत्र यांचा पीकांच्या वाढीस पोषक घटक म्हणून उपयोग करत. यापद्धतीत कोणत्याही प्रकारच्या अनैसर्गिक रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा वापर केला जात नसे. म्हणून ही शेती अहिंसक होती.
महाराष्ट्रातील शेतकरी डॉ. सुभाष पाकिर यांनी १९८८ ते २००० या कालावधीमध्ये जंगलांचा अभ्यास केला. त्यांना २००० मध्ये एका नवीन शेतीपद्धतीचा शोध लागला. त्या पद्धतीस त्यांनी ‘झिरो बजेट नैसर्गिक शेती’ असे नाव दिले. या शेतीतील गुंतवणूक उत्पादनापेक्षा कमी असते. या शेतीमुळे मातीचा ऱ्हास होत नाही. डॉ. पाळेकर म्हणतात, कोणतेही खत हे पिकाचे अन्न नसून वरून कोणतेही खत टाकण्याची आवश्यकता नाही. पिके व फळझाडे स्वतःचे अन्न स्वतःच तयार करतात आणि वापरतात. मूलभूत विज्ञानानुसार झाडाच्या शरीराचा ९८.५ टक्के भाग हा फक्त हवा, पाणी, आणि सूर्यप्रकाश यांपासून बनतो. ही तीनही तत्त्वे त्यांना निसर्गतः मिळतात. सरोज काशीकर म्हणतात, शाश्वत शेती, नैसर्गिक शेती, शून्य खर्च शेती (झिरो बजेट फार्मिंग) या सर्व पद्धती एकच आहेत. रासायनिक खतांचे अवशेष, कीटकनाशकांचे अवशेष व सेंद्रीय शेतीमधील कॅडमियम, आर्मेनिक, पारा, शिसे या अत्यंत विषारी जडपदर्थांचे अवशेष झाडांच्या पेशीमध्ये विषारी पदार्थ बनून साठतात; परंतु नैसर्गिक शेतीपद्धतीत या कोणत्याही निविष्ठांचा वापर नसल्यामुळे वनस्पतीच्या पेशीमध्ये विष जमा होत नाही. त्यामुळे अशा नैसर्गिक शेतीपद्धतीद्वारे उत्पादन केलेल्या धान्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे.
नैसर्गिक शेती अथवा सेंद्रीय शेती ईशान्य भारतातील राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात केली जाते. सिक्कीम हे १०० टक्के नैसर्गिक शेती करणारे राज्य आहे.
संदर्भ :
- कुलकर्णी, अविनाश; जाधव, प्रविण, पर्यावरण आणि विकासाचे अर्थशास्त्र, पुणे, २०१६.
- Fukuoka, Masanobu, The One-Straw Revolution, India, 1986.
समीक्षक : व्ही. परांजपे