बहू चूलतळ भट्टी

घरगुती सांडपाण्यातील गाळामध्ये सेंद्रिय व निरींद्रीय पदार्थ मोठ्या प्रमाणावर असतात, तसेच त्यामध्ये जीवाणूंचे प्रमाणही मोठे असते. त्यामधील पाण्याचे प्रमाण अधिक असल्याने त्याची विल्हेवाट लावण्यापूर्वी त्याचे वायुजीवी किंवा अवायुजीवी पद्धतीने स्थिरीकरण करणे आणि  त्यातील पाण्याचे प्रमाण (आणि पर्यायाने त्याचे घनफळ) कमी करणे आवश्यक असते. स्थिरीकरणाच्या पद्धती व पाण्याचे प्रमाण कमी करण्याच्या पद्धती यांची माहिती घ. सां. : गाळाची हाताळणी या नोंदीमध्ये दिली आहे. ह्या गाळाची विल्हेवाट लावण्याच्या पद्धतींची माहिती सदर नोंदीत दिली आहे. ह्या पद्धती पुढीलप्रमाणे : (१) गाळ शेतजमीनीवर पसरणे, (२) गाळापासून उपपदार्थ निर्माण करणे, (३) जमिनीत भराव टाकणे, (४) दहन आणि (५) समुद्रात विसर्जन.

  • गाळ जमिनीवर पसरणे : गाळामधील पाणी न काढता देखील तो जमिनीवर फवारता किंवा पसरता येतो, परंतु त्याचे स्थिरीकरण करणे आवश्यक असते. कारण त्यातील रोगजंतू त्यावर घेतलेल्या पिकाला दूषित करू शकतात. तसेच त्यामुळे वायुप्रदूषण होऊ शकते. म्हणून अशा गाळाचा उपयोग अखाद्य पिके (उदा. गवत) काढण्यासाठी केला जातो. अशा जमिनीची खोलवर नांगरणी केली जाते. हा गाळ खाद्यपिकांसाठी वापरणे आवश्यक असल्यास त्याचे निर्जंतुकीकरण केले जाते.
  • गाळापासून उपपदार्थ निर्माण करणे : (अ) वायुजीवी स्थिरीकरणामुळे उत्पन्न झालेल्या अतिरिक्त गाळामध्ये आणि अवायुजीवी स्थिरीकरणाच्या (विशेषतः शेणाच्या) प्रक्रियेमुळे गाळामध्ये ब१२ जीवनसत्त्व असते, ते सुकविलेल्या गाळाच्या माध्यमातून पशुखाद्यात (मुख्यतः कोंबड्यांच्या) वापरले असता त्याचा कोंबड्यांच्या वाढीवर योग्य परिणाम होतो असे दिसून आले आहे. (आ) सुकवलेला गाळ आणि घन कचर्‍यापासून उत्पन्न केलेले इंधन (Refuse derived fuel) ह्यांच्या मिश्रणाचे उत्ताप विच्छेदन (Pyrolysis) करून मिळालेल्या ऊर्जेचा उपयोग शुद्धीकरण केंद्रामधील वीजबचतीसाठी होतो. त्यासाठी विशिष्ट प्रकारच्या बहू चूलतळ भट्टीचा (Multiple hearth furnace) उपयोग केला जातो. (आ) गाळाचे खतामध्ये रूपांतर करणे, वायूजीवी पद्धतीने स्थिर केलेल्या अतिरिक्त गाळामध्ये लाकडाच्या कपच्या मिसळून वायुजीवी पद्धतीनेच गाळाचे खतामध्ये रुपांतर करणे शक्य होते. ह्यामधील लाकडाच्या कपच्यांचे पुनर्चक्रीकरण केले जाते. खताच्या उत्पादनासाठी जीवाणूंना लागणार्‍या कार्बनचा पुरवठा लाकडाच्या कपच्यांमधून होते.
  • जमिनीत भराव टाकणे : ज्या ठिकाणी गाळ पसरण्यासाठी पुरेशी जमीन उपलब्ध नसेल आणि उपलब्ध जमिनीपर्यंत गाळ वाहून नेणे खर्चिक ठरत असेल त्या ठिकाणी गाळामधील पाणी काढून सुकवलेला गाळ जमिनीत भराव टाकण्यासाठी उपयोगी पडतो. तसेच ज्या गाळामध्ये जड धातू (Heavy metals) चे प्रमाण जास्त असेल तो गाळ भराव टाकण्यास वापरता येतो. सांडपाण्याचा गाळाचा उपयोग आणखी एका प्रकारे करतात. तो म्हणजे कोळसा, लोखंड इत्यादींच्या खाणींमधून बाहेर काढलेले आणि त्यांमधून पाहिजे असलेले पदार्थ काढल्यावर उरलेल्या मातीच्या ढिगांचे वनस्पतींसाठी पुनरूज्जीवन करणे हा होय. त्यासाठी घरगुती सांडपाण्याचा गाळ, साखर उत्पादनामधून निघालेला कागद (press mold paper) व तेल उत्पादनांतून निघालेला गाळ ह्यांचे योग्य प्रमाणांत मिश्रण करून ह्या मातीच्या ढिगार्‍यांवर पसरून मिसळणे याला संकलित जीवतंत्रशास्त्रीय उपागम (Integrated Biotechnological Approach) म्हणतात. त्याच्या वापराने अनेक हेक्टर जमिनीमधून बर्‍याच उपयुक्त वनस्पतींचे उत्पादन करता येते, तसेच जमिनीची धूप थांबविता येते.
  • दहन : गाळाचे स्थिरीकरण न करता, तो घनकचर्‍याबरोबर मिसळून विशिष्ट प्रकारच्या भट्टीमध्ये जाळला तर दहन चालू करण्यापुरतेच इंधन (Furnace oil किंवा Gas) वापरावे लागते. स्थिरीकरण न केलेल्या गाळाचा ऊष्मांक (Calorific Value; कॅलॉरिफिक व्हॅल्यू) स्थिर केलेल्या गाळाच्या ऊष्मांकापेक्षा जास्त असण्याचा फायदा येथे घेता येतो. दहन पूर्ण झाल्यावर उरलेली राख सिमेंटच्या उत्पादनामध्ये वापरता येते. गाळाचे दहन करणे ही खर्चिक बाब असली तरी ज्या देशांमध्ये (जपान, द. कोरिया) जमिनीचा तुटवडा आहे. तेथे हीच पद्धत वापरावी लागते.
  • समुद्रात विसर्जन : ही पद्धत समुद्राच्या सानिध्यात असणार्‍या शहरांच्या उपयोगाची असू शकते. परंतु ती अत्यंत खर्चिक आहे. कारण (अ) किनार्‍यापासून गाळ वाहून नेण्यासाठी लागणार्‍या नलिकेची लांबी इतपत असली पाहिजे की तो भरतीच्या पाण्याबरोबर परत किनार्‍याकडे येणार नाही. (ब) समुद्रातील पाण्याचे प्रवाह सतत किनार्‍यापासून दूर जाणारे असतील अशा ठिकाणी गाळ सोडावा लागेल. (क) भरतीच्या वेळी गाळ पंप करावा लागतो आणि (ड) प्रदूषणनियंत्रणाचे नियम वेळोवेळी अधिक कडक केले जातात. त्यामुळे प्रथम गाळाचे शुद्धीकरण करणे आणि मगच तो समुद्रात सोडणे ह्याचा खर्च मोठा असतो.
  • गाळाचे निर्जंतुकीकरण : शेतीच्या कामामध्ये रासायनिक खतांच्या बरोबर किंवा जमिनीचा पोत सुधारण्यासाठी वापरण्याचा गाळ रोग पसरविणार्‍या जीवाणूंपासून मुक्त असणे आवश्यक असते. ह्या कामासाठी कोबाल्ट-६० किंवा सीसियम-१३५ ह्या किरणोत्सारी पदार्थाचा उपयोग करतात. भारतात भाभा अणुसंशोधन केंद्राने बडोदा (गुजरात) आणि हैदराबाद (आंध्रप्रदेश) ह्या शहरांमधील सांडपाण्याच्या गाळावर ही प्रक्रिया यशस्वीपणे राबवली आहे. ह्या प्रक्रियेमुळे गाळाच्या भौतिक आणि रासायनिक गुणधर्मांमध्ये कोणताही बदल झाला नाही. ही प्रक्रिया परिणामकारक असली तरी शुद्धीकरण केंद्रामध्ये काम करणार्‍या लोकांना किरणोत्सारापासून संरक्षण मिळावे ह्यासाठी विशेष व्यवस्था करावी लागली आहे. क्लोरीन, क्लोरीन डायऑक्साईड, ओझोन, अतिनील किरण ह्या जंतुनाशकांपेक्षा कोबाल्ट-६० अधिक परिणामकारक असल्यामुळे त्याचा उपयोग ह्या कमी केला आहे.

समीक्षक : सुहासिनी माढेकर