अटेनबरो ,डेव्हिड  (८ मे १९२६ )‍

विज्ञानप्रसारक आणि नाविन्यपूर्ण शैक्षणिक दूरदर्शनवरील कार्यक्रम राबविणारे म्हणून त्यांची प्रसिद्धी आहे.अटेनबरो यांचा जन्म पश्चिम लंडनमधील इझेलवर्थ या ठिकाणी झाला. त्यांचे वडील लायसेस्टर येथील विद्यापीठात अध्यापक होते. विद्यापीठाच्या विस्तीर्ण, भरपूर झाडी असलेल्या आवारात खेळायचे आणि पक्ष्यांची अंडी, रंगीबेरंगी दगड, छोट्या मोठ्या प्राण्यांचे अवशेष गोळा करायचे, हे त्यांचे लहानपणचे उद्योग होते. या सगळ्या वस्तूंचा घराच्या एका कोपऱ्यात त्यांनी संग्रह केला होता. वयाच्या नवव्या वर्षी त्यांनी निसर्ग अभ्यासक ग्रेऑउल (Grey Owl) यांचे व्याख्यान ऐकल्यानंतर त्यांच्या मनात निसर्गाबद्दलचे कुतूहल जागृत झाले. त्यामुळे त्यांनी पदवीनंतर केंब्रिज विद्यापीठात निसर्ग विज्ञानाचे पदव्युत्तर शिक्षण घेतले (1947). अटेनबरो यांनी 1949 साली पहिल्यांदा बी.बी.सी.च्या (British Broadcasting Corporation ) प्रशिक्षण कार्यक्रमात भाग घेतला. दोन वर्षांच्या प्रशिक्षणानंतर त्यांची बी.बी.सी.चा  कार्यक्रम निर्माता म्हणून नेमणूक झाली.

निसर्ग अभ्यासक ज्युलीयन हक्सले (John Huxley) यांच्याबरोबर अटेनबरो यांनी प्राणी, वनस्पती आणि खनिजे यांच्यासंबंधी कार्यक्रम सुरू केले. त्यांनी स्वतंत्रपणे ‘झू क्वेस्ट (Zoo Quest)’ नावाच्या धारावाहिकेची निर्मिती केली. बंदिस्त स्टुडिओत प्राण्यांचे चित्रीकरण करण्याऐवजी प्राण्यांच्या नैसर्गिक हालचाली, लकबी कॅमेऱ्यात टिपण्यासाठी  सहकाऱ्यांबरोबर जंगलामध्ये त्यांनी खूप भटकंती केली. बी.बी.सी.वर प्रसारित झालेल्या या मालिकेला अफाट लोकप्रियता मिळाली. प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून बी.बी.सी.ने 1957 मध्ये वनस्पती व प्राणी यांच्या अभ्यासासाठी विशेष विभाग सुरू केला. यानंतर अटेनबरो यांनी बी.बी.सी ची नोकरी सोडली आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या संस्थेच्या सामाजिक मानवजातिशास्त्र/ मानववंशशास्त्र (Social Anthropology) विषयाच्या अभ्यासासाठी प्रवेश घेतला.

अटेनबरो यांना 1965मध्ये बी.बी.सी.ने कार्यक्रम प्रसारणासाठी बी.बी.सी.-2 हा नवीन विभाग सुरू करताना केंद्र निदेशक या पदासाठी खास निमंत्रित केले. या केंद्रासाठी  अटेनबरो यांनी नवनवीन कार्यक्रम तयार केले. त्यांना जंगलाची ओढ स्वस्थ्य बसू देईना. त्यासाठी त्यांनी बी.बी.सी.ची नोकरी सोडली. त्यानंतर ते मुक्तपणे स्वतःच्या आवडीने निसर्ग, पर्यावरण, जंगलजीवन अशा विविध विषयांवर विविध वाहिन्यासाठी कार्यक्रमांचे लेखन व प्रसारण करू लागले. त्यांच्या ‘लाईफ ऑन अर्थ (Life on Earth, 1979)’, ‘द लिव्हिंग प्लॅनेट (The Living Planet, 1984)’, ‘द ट्रायल्स ऑफ लाईफ (The Trials  of Life, 1990)’, ‘लाईफ इन द फ्रिझर (Life in The Freezer, 1993)’, ‘द प्रायवेट लाईफ ऑफ प्लांट (The Private Life of Plants, 1995)’, ‘द लाईफ ऑफ बर्ड्स (The Life of Birds, 1998)’, ‘द लाईफ ऑफ मॅम्मल्स (The Life of Mammals, 2002-03)’,  ‘लाईफ इन द अंडरग्राऊंड (Life in the Undergrowth, 2005)’, ‘लाईफ इन कोल्ड ब्ल्ड (Life In Cold Blood, 2008)’  ‘प्लॅनेट अर्थ (Planet Earth)’, यांसारख्या मालिका जगभर गाजल्या. ‘द ब्लू प्लॅनेट (The Blue Planet)’, ‘लाईफ ऑफ बर्डस (Life of Birds)’, ‘द फर्स्ट अनिमल्स (The First Animals)’ अशा मालिकांनी अटेनबरो यांनी समाजाला निसर्गाच्या अद्भूत दुनियेची ओळख करून दिली. त्यातून पर्यावरण रक्षणाचे महत्त्व जगभर पोहोचविले.

अद्वितीय शिक्षक, उत्तम प्रक्षेपक, सृष्टिविज्ञानावर आधारित माहितीपटांचे जनक अशी अटेनबरो यांची ओळख निर्माण झाली. त्यांच्या या कार्याबद्दल एकतीस ब्रिटिश विद्यापीठांनी त्यांना ‘सन्मानीय पदवी’ अर्पण केली. 2002 मध्ये एलिझाबेथ राणीने ‘ऑर्डर ऑफ मेरिट’ हा ब्रिटिश बहुमान त्यांना बहाल केला. अटेनबरो यांचे ‘लाईफ ऑन एअर (Life on Air)’ हे चरित्र प्रसिद्ध झाले आहे. काही जातीच्या वनस्पती, कीटक आणि पक्ष्यांना अटेनबरो यांचे नाव देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आहे. 60 वर्षे निसर्गाच्या अद्भूत दुनियेची ओळख करून देणारे अटेनबरो ‘टेलिव्हिजन डायनॉसोर’ म्हणून ओळखले जातात.

निसर्गाशी एकरूप झालेल्या अटेनबरो यांना भविष्यकाळातील पृथ्वीवरील जीवनाची काळजी वाटते. त्यांच्या मते ‘‘निसर्गविश्व टिकवून ठेवणे फार महत्त्वाचे आहे. एकूणच समाजात, आपल्या आर्थिक नियोजनात आणि राजकारणात यांविषयी सकारात्मक बदल घडले, तरच पर्यावरण सुधारण्यात यश मिळू शकेल. ते नष्ट करायचे की समृद्ध करायचे याची निवड आपल्याला करायची आहे ”.

दृक्-श्राव्य  :

संदर्भ :

समीक्षक – मोहन मद्वाण्णा

प्रतिक्रिया व्यक्त करा