नाइटिंगेल, फ्लॉरेन्स (१२ मे १८२० – १३ ऑगस्ट १९१०).
फ्लॉरेन्स नाइटिंगेल या इंग्रज परिचारिका आणि आधुनिक रुग्ण परिचर्या शास्त्राच्या (शुश्रूषा) संस्थापिका होत. त्यांनी सार्वजनिक आरोग्य विज्ञानात मोलाची भर घातली. तसेच त्यांनी समाज सुधारणेसाठी संख्याशास्त्राचा (सांख्यिकी) वापर करण्याचे विशेष कार्य केले. त्यात स्वत: काढलेल्या रंगीत रोझ रेखाकृती किंवा तक्ते यांद्वारे त्यांनी संख्याशास्त्रीय आधारसामग्रीचे आलेखीय निदर्शन केले.
नाइटिंगेल यांचा जन्म इटलीतील फ्लॉरेन्स येथे झाला. त्या घरीच शिकल्या. ग्रीक, लॅटिन, फ्रेंच, जर्मन व इटालियन या भाषांशिवाय त्यांना त्यांच्या वडिलांनी इतिहास, तत्त्वज्ञान, गणित हे विषय शिकवले. पुढे आयुष्यभर त्यांनी विविध भाषांचा अभ्यास चालू ठेवला. रुग्णालयात जाऊन रुग्णपरिचर्या शिकावी या त्यांच्या इच्छेला तीव्र विरोध झाला व संसदेच्या कामकाजाचे वृत्तांत अभ्यासावेत असे सुचवण्यात आले. तथापि, पुढील तीन वर्षांत त्या सार्वजनिक आरोग्य व रुग्णालये या विषयातील तज्ज्ञ म्हणून गणल्या जाऊ लागल्या. १८५० साली कैसरव्हर्ट (जर्मनी) येथील एका संस्थेत दाखल होऊन त्यांनी रुग्णपरिचर्याविषयक संपूर्ण शिक्षणक्रम पार पाडला. १८५३ मध्ये लंडनच्या इन्स्टिट्यूशन फॉर द केअर ऑफ सिक जंटलविमेन इन डीस्ट्रेस्ड सरकमस्टन्सेस या छोट्या रुग्णालयात त्या अधीक्षक म्हणून रुजू झाल्या.
रशियाविरूध्द ब्रिटन, फ्रान्स, सार्डेनिया व तुर्कस्तान या देशांबरोबर क्रिमिया येथे १८५४ मध्ये युध्द सुरू झाले. तेव्हा ब्रिटिश मंत्रिमंडळातील युद्ध सचिव सिडनी हर्बर्ट यांनी नाइटिंगेल यांच्या कार्याचे महत्त्व ओळखून त्यांना युद्धभूमीकडे जाण्याचे सुचविले. तुर्कस्तानातील सर्व सैनिकी रुग्णालयातील रुग्णपरीचर्याविषयक व्यवस्थेची जबाबदारी नाइटिंगेल यांच्यावर सिडनी हर्बर्ट यांनी सोपवली व ती त्यांनी चोखपणे पार पाडली.
१८५५ साली स्कूटारी (आताचे ऊस्कूदार) रुग्णालयात पटकी व प्रलापक सन्निपात ज्वर (टायफस ज्वर) यांची मोठी साथ उद्भवली होती ती त्यांनी नाना प्रयत्न करून आटोक्यात आणली. त्यांनी ब्रिटिश सैनिकांचे आरोग्य, निवारा व अन्न यांत सुधारणा घडवून आणण्यासाठी अविरत परिश्रम घेतले. परदेशी शासन यंत्रणाही याबाबतीत त्यांचा सल्ला घेत असत. ब्रिटिश जनतेने उभारलेल्या नाइटिंगेल निधीतून सेंट टॉमस रुग्णालयात नाइटिंगेल स्कूल फॉर नर्सेस ही स्त्रियांना रुग्णपरिचर्याविषयक शिक्षण देणारी जगातली पहिली संस्था स्थापन झाली.
नाइटिंगेल यांना संख्याशास्त्राची गोडी होती व त्याचा त्यांनी आपल्या कार्यासाठी उपयोगही केला. विविध प्रकारची आकडेवारी गोळा करून त्यातून अर्थ काढण्यात त्यांना बालपणापासून रस होता. मात्र तेव्हा ब्रिटनमध्ये महिलांना महाविद्यालयात प्रवेश दिला जात नसे. मात्र त्यांनी स्वत:च अभ्यास करून संख्याशास्त्रात प्राविण्य संपादन केले व लोककल्याणासाठी त्याचा भरपूर उपयोगही केला. त्यामुळे त्या वैद्यकिय संख्याशास्त्राच्या संस्थापिका मानल्या जातात. १८६० मध्ये त्यांनी लंडनमध्ये सर्वात पहिली निधर्मीय नाइटिंगेल शुश्रुषा शाळा स्थापन केली.
१८५६ मध्ये, क्रिमियन युद्ध संपल्यावर युद्धात जखमी झालेल्या आणि मृत्यू पावलेल्या सैनिकांचा अहवाल त्यांनी ब्रिटिश लष्करी कमिशनकडे सुपूर्द केला. त्यात त्यांनी स्वत: काढलेल्या ध्रुवीय क्षेत्राच्या रंगीत रेखाकृती (पोलर एरिया डायग्राम) म्हणजेच रोझ तक्ते होते. त्या रेखाकृती पोचे पडलेल्या पात्राप्रमाणे ओबडधोबड दिसत होत्या, मात्र त्यामध्ये वर्तुळाचे भाग करून प्रत्येक भागात वर्षाचा एक विशिष्ट कालावधी दाखविला होता. लष्करी रुग्णालयातील मृत्युदराची हंगामी कारणे प्रदर्शित करण्यासाठीही त्यांनी त्या रोझ रेखाकृती काढल्या. त्या काळी ही पद्धत अतिशय नवीन होती. संख्याशास्त्रीय आधारसामग्रीचे आलेखीय प्रदर्शन त्यांनी याप्रकारे प्रसिद्ध केले. म्हणून संख्याशास्त्राचे आलेखीय प्रतिनिधित्व करणाऱ्या त्या एक पथदर्शक मानल्या जातात. ही रेखाकृती आधुनिक वृत्तीय आयताकृतीचे (सर्क्युलर हिस्टोग्राम) किंवा (पाय डायग्राम) पूर्वरूप आहे. हिस्टोग्राम हे वंटन फलनाचे (डिस्ट्रिब्यूशन फंक्शन) आयताकृतींद्वारे केलेले निदर्शन आहे. निरीक्षित मूल्यांची ज्या अंतरालांमध्ये (इंटरव्हल) विभागणी केलेली असते ते अंतराल आयताच्या रुंदीने आणि प्रत्येक अंतरालात घडणाऱ्या निरिक्षणांची संख्या आयताच्या उंचीने दर्शविली जाते. अशा रेखाकृतींच्या संकलनाला त्यांनी ‘कॉक्सकोम्ब’ हे नाव दिले होते. पारंपरिक शाब्दिक लेखनपद्धतीने मांडलेला संख्याशास्त्रीय अहवाल न समजू शकणाऱ्या नागरी (मुलकी) अधिकारी आणि संसदेतील सभासदांसाठी त्यांनी या कॉक्सकोम्बचा व्यापक उपयोग केला. त्या आलेखाला त्यांच्या सन्मानार्थ ‘नाइटिंगेल कॉक्सकोम्ब’ म्हणतात.
युद्धाच्या व शांततेच्या काळात वैद्यकीय शुश्रुषा आणि सार्वजनिक आरोग्यसेवा यात सुधारणा करण्यासाठी त्यांनी समर्पक प्रस्तावाचा मसुदा तयार केला. त्यात तत्कालीन स्थितीचे काळजीपूर्वक निरीक्षण, कुशल संघटन आणि तत्पर प्रशासन यांवर आधारलेल्या पद्धती सुचविल्या. त्यासाठी त्यांनी समकालीन बेल्जियमचे संख्याशास्त्रज्ञ व सामाजिक संख्याशास्त्राचे संस्थापक क्विलेट ॲडॉल्फ यांच्या कल्पना अंगिकारल्या. राजकारणी व प्रशासकीय अधिकारी यांनी योग्य निर्णय घेण्यासाठी आकडेवारींचे संख्याशास्त्रीय विश्लेषण समजून घ्यायला हवे असा आग्रह नाइटिंगेल यांनी नेहेमी धरला. त्यासाठी त्यांनी काही मूलभूत रेखाकृती तयार केल्या. त्याद्वारे मानवी जीवांचा अकारण होणारा नाश आणि तो टाळण्यासाठी अतिशय सोपे उपाय परिणामकारकपणे प्रदर्शित केले. आरोग्यसेवा, शिक्षण, बालमजुरी, गुन्हे इत्यादी प्रश्नांवरील अहवालात व प्रस्तावात या रेखाकृती त्यांनी समाविष्ट केल्या. त्यांनी काढलेल्या नाविन्यपूर्ण रेखाकृतींच्या स्पष्टीकरणामुळे आणि प्रबोधनामुळे ब्रिटनच्या राजकीय सत्ताधाऱ्यांनी काही प्रमाणात सुधारणा अमलात आणून तेथे सामाजिक विकासाच्या प्रगतीचा वेग वाढवला.
१८५७ नंतर भारतात पाठवलेल्या ब्रिटिश सैनिकांचा मृत्युदर दर हजार सैनिकांमागे ६९ असा होता. तो इंग्लंडमधील सैनिकांच्या मृत्युदराच्या तिप्पट होता. नाइटिंगेल यांनी त्यासंबंधी प्रश्नावलीद्वारे आकडेवारी गोळा करून संख्याशास्त्रीय विश्लेषणाद्वारे असे सांगितले केले की, याला भारतातील हवामान हे मुख्य कारण नसून सैनिकांच्या वसतिगृहातील अस्वच्छता व गलिच्छपणा हे मूळ कारण आहे. त्यांच्या त्याबाबतच्या शिफारसी अमलात आणल्यानंतर दहा वर्षातच भारतात पाठवलेल्या ब्रिटिश सैनिकांचा मृत्युदर दर हजार सैनिकांमागे १८ इतका खाली आला. भारतातील सार्वजनिक आरोग्यसेवाही तशीच सुधारावी यासाठी त्या प्रयत्नशील राहिल्या.
फ्रान्सिस गाल्टन आणि कार्ल पीअर्सन या संख्याशास्त्रज्ञांना प्रभावित करून उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमात उपयोजित (अनुप्रयुक्त) संख्याशास्त्र हा नवा शब्दप्रयोग (संज्ञा) नाइटिंगेल यांनी अमलात आणला. त्यानंतर १९११ साली युनिव्हर्सिटी कॉलेज, लंडन येथे उपयोजित संख्याशास्त्र विभाग सुरू करण्यात आला.
अशा रीतीने संख्याशास्त्राचा वापर करण्यावर भर तसेच व्हिक्टोरियन सनातनी परंपरा, अज्ञानी नोकरशाही आणि आग्रही लष्करी यंत्रणा यांच्या विरूध्द लढा देऊन नागरी व लष्करी क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी नाइटिंगेल यांनी धैर्याने व सोशिकपणे अपार कष्ट घेतले.
नाइटिंगेल यांनी बरेच लेखनही केले आहे. त्यांचा नोट्स ऑन नर्सिंग (१८६०) हा ग्रंथ नावाजलेला आहे. तसेच नोट्स ऑन मेटर्स अॅफेक्टिंग द हेल्थ, एफिशियन्सी अँड हॉस्पिटल अॅडमिनिस्ट्रेशन ऑफ द ब्रिटिश आर्मी हा त्यांचा मोठा ग्रंथ १८५८ साली प्रसिध्द झाला.
संख्याशास्त्राची कुठलीही पदवी पदरी नसूनही १८५९ मध्ये त्या रॉयल स्टॅटिस्टिकल सोसायटीच्या पहिल्या महिला सदस्य म्हणून निवडून आल्या. त्या अमेरिकन स्टॅटिस्टिकल असोसिएशनच्या मानद सदस्यही झाल्या. १८८३ मध्ये राणी व्हिक्टोरियाने त्यांना रॉयल रेड क्रॉस प्रदान करून त्यांचा सन्मान केला. शिवाय १९०७ मध्ये त्यांना ब्रिटिश सरकारकडून ऑर्डर ऑफ मेरिट हा किताब बहाल करण्यात आला व तो मिळविणाऱ्या त्या पहिल्याच महिला होत्या. १९०१ च्या सुमारास त्यांना अंधत्त्व आले. त्या लंडन येथे मृत्यू पावल्या.
संदर्भ :
- http://www.history.mcs.st-and.ac.uk/Biographics/Nightiangale.html
- https://en.wikipedia.org/wiki/Florence.Nightingale
- http://www.datascope.be/sog/SOG-Chapter5.pdf
- https://plus.maths.org/Content/florence-nightingale-compassionate-stastician
समीक्षक – विवेक पाटकर