हंपी जवळील किन्नल

लाकडातील मूर्तीकामाची प्रसिद्ध हस्तकला. कर्नाटकातील विजापूरच्या दक्षिणेला १८० किमी.वर कोप्पल या जिल्ह्यात किन्नल हे छोटेसे गाव आहे. येथे लाकूडकामातील मूर्तीकामाची कला परंपरा अजूनही टिकून आहे. जवळच असलेल्या हंपी येथील प्राचीन कलापरंपरेशी या लोककलेचे नाते जोडले जाते. किन्नलमधील मूर्तींची प्रतिमाविद्या (iconography) बहुतांशी हंपीच्या कलेशी मिळतीजुळती आहे.

मूर्ती बनविण्याची पद्धत : किन्नल कलेत प्रामुख्याने लाकडी मूर्ती बनवल्या जातात. या मूर्तींसाठी हलके लाकूड वापरले जाते. पोलकी, हद्दी, बेवेन कट्टगी अशा प्रकारची स्थानिक लाकडे यासाठी वापरतात. सागाच्या लाकडाप्रमाणे या लाकडात सुबक कोरीवकाम शक्य नसते. मूर्तीकामाकरिता उपरोक्त स्थानिक लाकडापासून मूर्तीचे सुटे अवयव बनवतात. असे ढोबळ आकाराचे सर्व तुकडे खिळ्याने जोडतात. चिंच व चिंचेच्या बियांची पावडर शिजवून त्यात गरजेनुसार लाकडाचा भुसा मिसळून हातासरशी मूर्तीचे जोड भरतात व मूर्तीला काही अंशी मूर्तीला सुबकपणा आणला जातो. अशी मूर्ती वाळल्यावर कानसीने घासतात. पुन्हा चिंचेच्या कणकेपासून नाक, डोळे असे बारकावे बनवतात. मूर्ती वाळल्यावर तिला घासकागदाने (पॉलिश पेपरने) घासून गुळगुळीतपणा आणतात. नंतर संपूर्ण मूर्तीवर तलम पातळ कापड चिकटवले जाते. चिकटवताना त्यामध्ये घड्या येणार नाहीत याची काळजी घ्यावी लागते. त्यानंतर संपूर्ण मूर्तीवर वूड प्रायमर (प्राथमिक काष्ठरंग) लावला जातो. जेथे अल्प उठाव (emboss) आहे. तेथे चुनखडीच्या पावडरीचे मिश्रण लावले जाते. प्रामुख्याने अल्प उठावात नक्षीकाम केले जाते. या मूर्तींना चमकदार कृत्रिम तैलरंगांनी रंगवले जाते. रंगसंगती ही प्रामुख्याने शुद्ध रंगांची म्हणजे लाल, पिवळा, निळा, हिरवा अशा रंगांची असते. पूर्वीच्या काळात जलरंगात रंगकाम होत असे. त्याकरिता प्रामुख्याने खनिज रंग तसेच वनस्पतीजन्य रंग हे पाणी व डिंकाबरोबर मिसळून लावले जात.

मूर्ती बनविण्याचे काही टप्पे

किन्नल कलेतील विविध कला वस्तू : किन्नल कलाकार विविध कलावस्तू वर्षभर करत असतात. ग्रामदेवता, पालखी, छत्र, चामर, पूजा मंदिर, विविध प्रकारच्या मूर्ती असे अनेक प्रकार ते बनवतात.

ग्रामदेवता : बहुतांशी गावात ग्रामदेवतेची मूर्ती असते. दक्षिण भारतात अंकम्मा, अंकलम्मा, कालीमम्मा, मरियम्मा, यल्लम्मा, गंगम्मा, दुर्गम्मा, पोलेरम्मा इत्यादी स्त्री देवतांच्या मूर्ती आहेत. त्या दर पाच वर्षांतून रंगवल्या जातात. त्यांच्याकरता छत्र, चामर, पालखी इत्यादी गोष्टी बनवतात. विविध आयुधांनी युक्त अशी ग्रामदेवतेची मूर्ती असते. तिची प्रतिमा कशी बनवायची हे ठरलेले असते. किन्नल कलाकार त्याप्रमाणे ती मूर्ती तयार करतात. पाडवा, दसरा, दिवाळी अशा प्रसंगी ग्रामदेवतेचा उत्सव असतो. तसेच दरवर्षी ग्रामदेवतेची जत्रा असते. अशावेळी किन्नल कलाकारांकडून ग्रामदेवतेची विशेष सजावट करून घेतली जाते.

पालखी : प्रत्येक ग्रामदेवतेची तसेच विविध देवळातील देवतांची देखील पालखी असते. किन्नल कलाकार या पालखीवर सर्व बाजूंनी चित्रे काढतात. प्रत्येक देवतेनुसार चित्रविषय व पद्धत ठरलेली असते. देवाची आरती, वाद्यांचे वादन, जत्रेतील बगाड, मुख्य देवदेवता, पोपट, वाघ, सिंह इत्यादी पक्षी व प्राणी यांचे चित्रण केलेले असते तसेच संपूर्ण पालखीवर वेलबुट्टीचे नक्षीकाम करण्यात येते. त्या त्या देवतेच्या पालखीवर संबंधित देवतेचे चित्र असते. उदा., अंजयेन गुडी या मारुतीच्या पालखीवर चपेटहस्त मारुतीची मुद्रा चित्रित केलेली असते, तर दुर्गादेवी गुडी या दुर्गाम्मा देवीच्या पालखीवर दुर्गामातेचे चित्र असते.

देवदेवतांचे रथ : मोठ्या देवस्थानांचे रथ असतात. हे रथ बडगेर लोक बनवतात. या रथावर सजावटीकरता मूर्ती बनवल्या जातात. या मूर्ती किन्नल कलाकार तयार करतात. रथ व पालखी हे केवळ भिन्न रूपाकार आहेत. या दोन्हींचा हेतू देवदेवतांची मिरवणूक हाच आहे.

दुरगमुरगी देव्हारा : आंध्र प्रदेश, कर्नाटक व महाराष्ट्रात पोतराजांचा कडकलक्ष्मी देवीचा चित्ररूप देव्हारा असतो. आंध्र प्रदेशामध्ये पेद्दमा देवीचा लाकडी चित्रांकित देव्हारा असतो. त्याला ‘पेद्दमा गुडी’ असे म्हणतात. तर कर्नाटकात दुरगमुरगी लोकांचा दुर्गव्वा देवीचा देव्हारा असतो. तीनही ठिकाणचा देव्हारा एकाच प्रकारचा आहे. विविध प्रदेशात त्याला कालांतराने स्थानिक नावे व संदर्भ आले; पण पुढे मात्र त्यावरील चित्रांच्या शैली मध्ये फरक पडलेला दिसतो. रंगद्रव्यात झालेला बदल व स्थानिक कलाकारांच्या कसबातील फरक यातून हा शैलीभेद झालेला दिसतो. किन्नलचे कलाकार दुरगीमुरगी देव्हारा बनवतात. पोलकी या हलक्या लाकडापासून तो बनविलेला असतो. संपूर्ण देव्हाऱ्यावर चारही बाजूंनी चित्रे काढलेली असतात. यावर राम-रावण युद्ध, पाप-पुण्याच्या संबंधी चित्रे असतात. गरुड पुराणात ज्या शिक्षांचे वर्णन असते. अशा शिक्षा जसे की, करवतीने शरीर कापणे, सर्प दंश, कडेलोट, सूळ वध, गरम तेलाचे चटके अशांचे चित्रण यात असते. जत्रेतील बगाड, पालखी तथा रथाचे चित्र, देव्हाऱ्याच्या मागील बाजूस किल्ला व सैनिकांचे चित्र, देव्हाऱ्याच्या समोरील भागात झाडावरून ताडी काढण्याचे दृश्य इत्यादी चित्रे असतात. दरवेशी तसेच विविध करमणूक करणारे इतर फिरस्ते यांचीही चित्रे असतात. 

विविध जातींच्या देवदेवतांच्या मूर्ती : प्रत्येक जातीत स्वतंत्र देवदेवता पूजल्या जातात. त्यांचे सण व उत्सवही स्वतंत्रपणे साजरे केले जातात. त्यामध्ये प्रामुख्याने दुर्गादेवी, मरिअम्मा, साऱ्यांम्मा, गाळ्याम्मा इत्यादी देवता छोट्या मूर्तींच्या स्वरूपात पूजल्या जातात. कुरबर या पशुपालक जातीकडे घोड्यावर बसलेल्या बीरलिंगेश्वरमची मूर्ती असते. लिंगायतांकडे गौरी नवमीच्या दिवशी शिवपार्वतीची मूर्ती पूजली जाते. ब्राह्मणांकडे शिवपार्वती मूर्ती बरोबरच क्वन्तिपट्टी असा नऊ मूर्तींचा छोटा पट असतो. गोकूळमध्ये घराचा देखावा असतो. त्यात छोट्या छोट्या मूर्ती असतात. मड्डर या मासे पकडणाऱ्या जातीमध्ये दुर्गाम्मा तर शट्टर म्हणजे वाण्यांकडे पालखी असते. या सर्व प्रकारच्या मूर्तींशिवाय किन्नल कलाकार भूगम्मा, गरुड, कामधेनू, काम-रती अशा मूर्तीही बनवतात.

निधर्मी कला वस्तू (secular art objects) : यांचे प्रचलन हल्ली दिसून येत आहे. मोठ्या शहराकरिता अशा कलावस्तू बनविल्या जातात. त्यात प्राणी, पशू, पक्षी, फोटोंची चौकट, आरशांची चौकट, फळे, पाळणा अशा गोष्टी बनविल्या जातात. किन्नल प्रमाणेच तेलंगणातील नक्काश कलाकारांनी निर्मल गावात अशाच प्रकारच्या कलावस्तू बनविण्याचा कारखाना सुरू केला आहे. या वस्तू प्रामुख्याने मोठ्या शहरात व महानगरांतील हस्तकलेच्या प्रदर्शनात विकल्या जातात.

किन्नलचे चित्रकार : किन्नल गावात चित्रकार जातीची सुमारे ५० घरे आहेत. त्यांपैकी सुमारे १५ घरे आजही चित्रकाम व मूर्तीकाम करतात. इतर लोक सुतारकाम, शिलाईकाम, नोकरी अशा व्यवसायात आहेत. यांचे आडनाव ‘चित्रगार’ असे आहे. ग्रामीण लोक त्यांना ‘जिनगार’ असे म्हणतात. तेलंगणातील निर्मल येथील राजाने कर्नाटकातून ४०० वर्षांपूर्वी चित्रकारांना बोलविले. कालांतराने हा समाज तेलंगणामध्ये स्थायिक झाला. पटचित्रे रंगविणे, मूर्ती बनविणे हे काम ते करीत राहिले. आज या कलेला चेरियाल कला म्हणून ओळखले जाते. हे कलाकार स्वतःला ‘नक्काश’ असे म्हणवतात. त्यांची भाषा तेलगू आहे.

तेलंगणातील ‘नक्काश’ व किन्नल मधील ‘चित्रगार’ हे दोघेही सोमक्षत्रीय असून त्यांचे कुलदैवत निमशाम्बा देवी आहे. जिचे मूळ स्थान म्हैसूर जवळ आहे. प्रायः एका प्रदेशातील कुलदेवता या त्याच प्रदेशातील व्यावसायिकांच्या असतात. चित्रगार व नक्काश लोकांतील वांशिक साम्यस्थळे पाहता दोन्ही कलांचा उद्भव एकाच प्रदेशातून असावा, याला पुष्टी मिळते. तसेच चेरियाल व किन्नल कलेतील रूपात्मक साम्यस्थळे हेच अधोरेखित करतात. विजयनगरच्या पाडावानंतर उत्तर कर्नाटक व तेलंगणा भागात हे चित्रकार विखुरले गेले असावेत ही शक्यता बळावते. तसेच हंपी व लेपाक्षी या मंदिरांच्या चित्रकलेच्या प्रभावातून चेरियाल व किन्नल या लोककलांचा आविष्कार झाला असावा असे निश्चितपणे म्हणता येईल.

कोणत्याही लोककलेच्या अस्तित्वाला सांस्कृतिक परिवेष पोषक ठरत असतो; किंबहुना या दोन्ही बाबी एकच आहेत. आधुनिकता व जागतिकीकरणाचा रेटा ग्रामीण भागापर्यंत गेला आहे. त्यातून लोककलांच्या आविष्कारांचा ऱ्हास झाला आहे अथवा त्याचे रूपांतरण व्यवसायिक पद्धतीने होऊन त्याचा सामाजिक संदर्भ नष्ट झाला आहे. कर्नाटकातील ‘किन्नल’ या कला अशाच स्थितीला आहे. त्यांचे समाजजीवनाशी निगडित वैविध्यपूर्ण आविष्कार मूळ स्वरूपात न राहता केवळ सजावटीची वस्तू (Deco-object) बनत आहेत. किन्नलच्या कलेचे पुरेसे प्रलेखपोषणही (डॉक्युमेंटेशन) झालेले नाही;पण आता किन्नल कलाकारांची नवीन पिढी सजग झाली असून त्यातील काही या कलेस आश्वासक आणि पोषक असे काम करीत आहेत.

संदर्भ :

  • Rajan, Aditi and Rajan M.P., Crafts of India – Handmade in India, New Delhi, 2007.
  • Santhosh, D., Nirmal a historical cultural craft centre in Telangana : A study, International Journal of Advanced Research, 2017. 

समीक्षण : स्मिता गीध