आशिया खंडातील मेसोपोटेमिया या प्राचीन प्रसिद्ध देशात आकारास आलेल्या शिल्पकलेचा सुरुवातीचा कालखंड ऊरूक काळ म्हणून ओळखला जातो. सुमेरियन नगरराज्यांचा उदय प्रागैतिहासिक – ताम्रपाषाण ते प्रारंभिक कांस्य (ब्राँझ) युगातील उबाइड (इ.स.पू. ६५०० ते ४१००) आणि ऊरूक (इ.स.पू. ४१०० ते २९००) या काळात झाल्याचे आढळते. ‘ऊरूक काळ’ हा ऊरूक या सुमेरियन शहराच्या नावावरून ओळखला जातो. मेसोपोटेमियाच्या कलेतील पहिला ‘महान कलात्मक काळ’ म्हणून या काळाकडे बघितले जाते. ऊरूक काळात मेसोपोटेमियात लेखनकलेचा आरंभ झाला. म्हणून याला ‘नवसाक्षर काळ’ असेही म्हणतात. याच काळात शहरी जीवनाची सुरुवात होऊन नंतर सुमेरियन संस्कृतीचा उदय झाल्याचे आढळते. ऊरूक काळापासून त्रिमित आणि उत्थित अशा दोनही स्वरूपाच्या शिल्पकलेला असाधारण महत्त्व प्राप्त झाले. या कलेच्या केंद्रस्थानी मानवाकृतींचे चित्रण केलेले आढळते. मध्य ऊरूक काळाच्या सुरुवातीस दंडगोलाकार शिक्के प्रथमच बनविण्यात आलेले दिसतात. दंडगोलाकार शिक्क्यांचा वापर करणारी ऊरूक ही पहिली संस्कृती होती. या शिक्क्यांच्या वापराची प्रथा नंतरच्या काळात संपूर्ण मेसोपोटेमिया व पूर्वेकडील प्रदेशांत पसरलेली दिसते. तत्कालीन शिल्पकलेमध्ये शिक्क्यांची शैली व विषयांचे अनुकरण केलेले दिसते. प्रामुख्याने देवता व मुख्य पुजारी असलेल्या राजांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या छोट्या शिल्पप्रतिमांची निर्मिती केलेली आढळते. ऊरूक काळाच्या तिसऱ्या टप्प्यात (याला ‘जमडेट नस्र काळ’ Jemdet Nasr period : इ.स.पू. ३१०० ते २९०० असेही ओळखले जाते) मिळालेल्या अनेक कलाकृतींच्या साठ्यावरून ऊरूकच्या कलाकारांनी बहुविध उल्लेखनीय कलाकृतींची निर्मिती केलेली दिसते.
ऊरूक काळाच्या तिसऱ्या टप्प्यातील काही स्टेलेंवर (stelae – थडग्यांवरील चिन्हांकित शिलालेख वा उत्थितशिल्प कोरलेला स्तंभ अथवा उभी फरशी) असलेली उत्थित शिल्पे उपलब्ध झाली आहेत, जसे सिंहाच्या शिकारीचे दृश्य असलेला स्तंभ, याच काळातील दुसरे महत्त्वाचे उदाहरण म्हणजे, अवशेषरूपी ‘वारका’ मुखवटा. हा संगमरवरातील ८ इंचाचा मुखवटा म्हणजे एका यथार्थवादी स्त्री-शिल्पाचे राहिलेले शीर होय.
मेसोपोटेमियन कलेमध्ये तीन प्रमुख घटकांचे योगदान दिसून येते : सुमेरियन नगरराज्यांचे सामाजिक-राजकीय संघटन, यशस्वी राज्ये व साम्राज्ये; दुसरी अधिक महत्त्वाची बाब म्हणजे मेसोपोटेमियाच्या राज्यातील संघटित धर्माने स्वीकारलेली प्रमुख भूमिका, सुमेर आणि बॅबिलोनियाच्या सुरुवातीच्या काळामध्ये प्रामुख्याने धार्मिक इमारतींना प्राधान्य देण्यात आले होते आणि सर्व शिल्पनिर्मितीही त्याच धार्मिक उद्देशाने झाली होती; तर तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे तेथील कलेवर असलेला नैसर्गिक वातावरणाचा प्रभाव होय. या प्रदेशांतील भूरचनाशास्त्र आणि हवामानाचा विचार करता या प्रदेशांत दगड किंवा लाकूड फारसे उपलब्ध नसल्याने व त्यामुळे कलाकारांवर असलेल्या व्यावहारिक मर्यादा लक्षात घेता शिल्पकार अल्प प्रमाणात आयात केलेल्या वस्तूंवर तसेच टेराकोटा (भाजलेली मृत्तिका) यांसारख्या पर्यायांवर अवलंबून होते.
संदर्भ :
- Black, J., Gods, Demons and Symbols of Ancient Mesopotamia, University of Texas Press, 1992.
- Frankfort Henri, The Art and Architecture of the Ancient Orient, Pelican History of Art, 4th ed, London, 1970.