देवी इश्तार हिचे शिल्प

मेसोपोटेमियन शिल्पकलेतील बॅबिलोनियन संस्कृतीतील शिल्पकला. ही कला मुख्यत्वे अनुप्रयुक्त स्वरूपाची होती. त्यांतील कलात्मक म्हणता येतील असे फारच थोडे शिल्पावशेष उपलब्ध आहेत. प्रारंभिक बॅबिलोनियन काळातील (इ.स.पू.सु. १८००) पक्व मृदेतील (टेराकोटातील) बर्ने उत्थित शिल्पफलक (Burney Relief) विशेष उल्लेखनीय आहे. या शिल्पामध्ये मेसोपोटेमियाची सौंदर्य व युद्धशास्त्राची देवता इश्तार वा इन्नाना हिचे नग्न शिल्प काढलेले आढळते. २ ते ३ सेमी. जाडीच्या व २० इंच बाय १५ इंच इतक्या आकाराच्या पक्व मृदेच्या फरशीवर बनवलेल्या या शिल्पातील देवी इश्तारचे शिर फरशीच्या पृष्ठापासून ४.५ सेमी. इतके उठावदार केलेले आहे. पंख असलेल्या या देवीचे पाय एखाद्या पक्ष्यासारखे उपखूर असलेले दाखवलेले असून ती समोर पाहत असलेल्या बैठ्या दोन सिंहांवर उभी आहे. तिच्या दोन्ही हातात पवित्र कडे असलेले दांडे पकडलेले दाखवलेले असून तिच्या शिरोभूषणामध्ये शिंगांची चार ओळींतील वैशिष्ट्यपूर्ण रचना केलेली दिसते व त्यावर मध्यभागी एक चकती रोवलेली आढळते. शिल्पफलकावर तिच्या दोन्ही बाजूला एक एक असे समोर पाहत असलेले व उभे घुबड दाखवलेले आहेत. शिल्पातील सिंहाच्या शरीरावरील केस व घुबडांच्या शरीरावरील पिसे, देवीच्या शरीराची प्रमाणबद्धता आणि सुडौलता, पायाचे व चेहऱ्यावरील बारकावे व त्यांतील नैसर्गिकता विशेष उल्लेखनीय आहे.

राजा हामुराबी याच्या विधिसंहितेची स्मृतिशिळा

इराणमध्ये १९०१ मध्ये बॅबिलोनियन राजा हामुराबी याच्या विधिसंहितेची डायोराइट या कठीण दगडांत केलेली इ.स.पू. १७५४ च्या काळातील ७.५ फूट इतकी उंच स्मृतिशिळा सापडली. या स्मृतिशिळेच्या पुढील व मागील अशा दोन्ही बाजूस क्यूनिफॉर्म लिपी वापरून अकेडियन भाषेत संहिता लिहिलेली आढळते. शिळेच्या पुढील बाजूस सर्वांत वरील भागात उभा असलेला राजा हामुराबी हा त्याच्या समोर राजपदावर बसलेल्या बॅबिलोनियन न्यायदेव मार्डुक (अथवा शामाश) याच्या हस्ते शाही पदचिन्ह स्वीकारताना दाखवलेला आढळतो. पदचिन्ह स्वीकारताना हामुराबी याने डाव्या हातात स्वतःचे पायघोळ वस्त्र पकडलेले असून उजव्या हाताने देव मार्डुक यांच्या प्रार्थनेसाठी हात वर केलेला दिसतो.

 

 

संदर्भ :

  • Black, J., Gods, Demons and Symbols of Ancient Mesopotamia, 1992.
  • Frankfort Henri, The Art and Architecture of the Ancient Orient, Pelican History of Art, 4th ed, Penguin, 1970.
  • Frankfort Henri, Cylinder Seals, London, 1939.