आ. १६.१. अधोगामी प्रवाह शुद्धीकरण प्रक्रिया.

निमज्जित माध्यम शुद्धीकरण प्रकारच्या पद्धतीमध्ये सांडपाण्याचा माध्यमावरील प्रवाह खालून वर (upflow) किंवा वरून खाली (downflow) होतो, तसेच माध्यम पूर्णपणे सांडपाण्यात बुडवलेले असते. वायुमिश्रण टाकीमध्ये वायुजीवी जीवाणूंना लागणारा प्राणवायू संपीडित हवेच्या रुपामध्ये पुरवला जातो.  बारीक वाळू, विशिष्ट क्रिया केलेल्या प्रभावित कार्बनचा चुरा इ. माध्यमे वापरून सांडपाण्याच्या आणि हवेच्या खालून वर होणार्‍या प्रवाहामुळे आलंबित स्थितीमध्ये ठेवली जातात, त्यामुळे शुद्धीकरण अधिक प्रभावी होते. शुद्ध झालेल्या सांडपाण्याबरोबर हे माध्यम वायुमिश्रण टाकीच्या बाहेर वाहून जाऊ नये. म्हणून बहिर्गम मार्गावर जाळी बसवलेली असते. जीवाणूंच्या चयापचयामुळे उत्पन्न झालेले नवे जीवाणू (गाळ) टाकीमधून अधूनमधून काढावे लागतात. ह्या पद्धतीमध्ये दुय्यम निवळण टाकी आणि गाळाचे पुनर्चक्रीकरण अनावश्यक असते, परंतु प्रथम सांडपाण्याचे प्रारंभिक आणि प्राथमिक शुद्धीकरण करावे लागते.

आ. १६.२. बायोफोर ऊर्ध्वगामी प्रवाह शुद्धीकरण प्रक्रिया.

अधोगामी प्रवाह शुद्धीकरण प्रक्रियेचे एक एकस्व जैविक कार्बन प्रक्रिया (biocarbon process) ह्या नावाने घेतले आहे. त्यामध्ये प्रभावित कार्बनचा चुरा किंवा चिकण मातीचे भाजलेले बारीक कण माध्यम म्हणून वापरतात. सांडपाण्याचा प्रवाह वरून खाली असल्यामुळे जलशुद्धीकरणातील निस्यंदकाप्रमाणे संपीडित हवा आणि शुद्ध केलेले सांडपाणी ह्यांच्या सहाय्याने माध्यम धुवून घेण्याची व्यवस्था दिवसांतून एकवेळा केलेली आहे (आकृती क्र. १६.१).

आ. १६.३. बायोस्टीयर ऊर्ध्वगामी प्रवाह शुद्धीकरण प्रक्रिया.

ऊर्ध्वगामी प्रवाह शुद्धीकरण प्रक्रियेचे एक अत्यंत साधे उदाहरण म्हणजे पूतिकुंडामधून बाहेर पडणार्‍या सांडपाण्याचे अधिक शुद्धीकरण करणारा अवायुजीवी निस्यंदक होय. (पहा : घ. सां. – पूतिकुंड व अवायुजीवी निस्यंदक). ऊर्ध्वगामी प्रवाह शुद्धीकरणच्या बायोफोर (biofor) व बायोस्टीयर (biostyr) अशा दोन प्रक्रिया वापरात असून, दोन्हींची एकस्वे घेतलेली आहेत. बायोफोर प्रक्रियेमध्ये माध्यम म्हणून विशिष्ट प्रक्रिया केलेली चिकणमाती २ ते ४ मीटर उंचीपर्यंत भरलेली असून तिचे विशिष्ट गुरुत्व १.० पेक्षा जास्त असते. प्राथमिक शुद्धीकरण केलेले सांडपाणी विशिष्ट आकाराच्या नलिकाग्रांमधून माध्यमाच्या तळाशी सोडण्यात येते. माध्यम साफ करण्यासाठी संपीडित हवा आणि शुद्ध केलेले सांडपाणी दिवसातून एकदा वापरण्यात येते. बायोफोर प्रक्रियेमध्ये माध्यम म्हणून पॉलिस्टायरीनचे थर (२ ते ४ मिमी आकार आणि विशिष्ट गुरुत्व १.० पेक्षा कमी) १.५ ते ३ मीटर उंचीपर्यंत भरलेले असतात. माध्यमाचे थर सांडपाण्याबरोबर वहात जाऊ नयेत म्हणून बहिर्गममार्गावर जाळी बसवलेली असते. माध्यम साफ करण्यासाठी शुद्ध केलेले सांडपाणी खूप वेगाने माध्यमांत वरून खाली सोडण्यात येते. (आकृती क्र. १६.२ व १६.३).

वरील सर्व पद्धती जैराप्रामा (जैवरासायनिक प्राणवायू मागणी) अधिक कमी करण्यासाठी किंवा जैराप्रामा व नायट्रोजन काढण्यासाठी किंवा प्रगत तिसर्‍या टप्प्यांतील नायट्रोजन कमी करण्यासाठी वापरल्या जातात.

संदर्भ :

  • Arceivala, S. J.; Asolekar, S. R.; Wastewater Treatment  for Pollution Control and Reuse, New Delhi, 2007.
  • Tehobanoglous, G.; Burton, F. L.; David, H. Wastewater Engineering –Treatment and Reuse, 4th ed., New Delhi, 2003.