घरगुती सांडपाण्याच्या शुद्धीकरण व व्यवस्थापन यंत्रणेचा आराखडा तयार करत असताना अनेक मुद्द्यांचा विचार करावा लागतो. जसे, (१) सध्याची आणि भविष्यातील लोकसंख्या आणि तिला पुरविलेल्या पाण्याची मात्रा. (२) त्यातून होणार्‍या सांडपाण्याची मात्रा आणि तिची गुणवैशिष्ट्ये; कारण ह्या यंत्रणेकडे वाहत येणार्‍या सांडपाण्याबरोबरच औद्योगिक सांडपाणी, पावसाचे पाणी, भूगर्भातील पाणीसुद्धा जोडले जाऊ शकते, त्यामुळे शुद्धीकरण यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. (३) शुद्ध केलेल्या सांडपाण्याची आणि गाळाची विल्हेवाट लावण्याची पद्धत. (४) सांडपाण्याचा पुनर्वापर, पुनर्चक्रीकरण इ. (५) यंत्रणा उभारण्यासाठी लागणारी जागा व ती चालविण्यासाठी लागणारे मनुष्यबळ. (६) त्यासाठी होणारा खर्च आणि ही सेवा पुरवलेल्या जनतेवर लावण्याचा कर इत्यादी. वरीलपैकी कोणत्याही मुद्द्यांचा विचार यंत्रणा चालविणार्‍या व्यवस्थापकाला करावयाचा नसतो, तसेच त्यांच्या यंत्रणेकडे येणार्‍या सांडपाण्याची मात्रा व प्रत ह्यांवर त्याचा ताबा नसतो. परंतु ठरवून दिलेल्या गुणवैशिष्ट्यांवर हुकूम सांडपाण्याचे शुद्धीकरण करण्याची जबाबदारी त्याच्यावर असते, त्यामुळे त्याची कार्यकक्षा शुद्धीकरण यंत्रणेपुरतीच मर्यादित राहते.

ह्या व्यवस्थापनाचे पुढील भाग करता येतात – १) प्रशासकीय (Administrative) , २) तांत्रिक (Technical), ३) आर्थिक (Financial), ४) कायदेविषयक (Legal), ५) शुद्धीकरण केंद्राची व केंद्रातील चालक (Operators)  व कर्मचारी ह्यांची सुरक्षितता, ६) शुद्ध केलेल्या सांडपाण्याची मात्रा आणि गाळाची गुणवत्ता. हे भाग कामाच्या सोयीसाठी केलेले असले तरी त्यांचे परस्परसंबंध अत्यंत जवळचे आहेत.

  • प्रशासकीय : संपूर्ण यंत्रणेच्या कामाचे दैनिक, मासिक, वार्षिक इ. अहवाल तयार करणे.
  • तांत्रिक : सर्व यंत्रणा उच्चतम क्षमतेने चालत आहे हे पाहणे, यंत्रसामुग्रीचा पुरवठा केलेल्या संस्थेने घालून दिलेले सर्व नियम काटेकोरपणे पाळणे, यंत्रणेची प्रतिबंधक (preventive) देखभाल करणे, त्यासाठी लागणारे सुटे भाग कायम  उपलब्ध करून देणे, शुद्धीकरणासाठी लागणारी सर्व रसायने उपलब्ध करणे, शुद्धीकरण टाक्या, नाले,  नलिका, त्यांवरील झडप इ. चालू स्थितीत ठेवणे, त्यांची दुरुस्ती ताबडतोब करून घेणे.
  • आर्थिक : यंत्रणा चालविण्यासाठी येणार्‍या खर्चावर नियंत्रण ठेवणे, शुद्ध केलेले सांडपाणी, पचवलेला गाळ, उत्पन्न झालेला इंधन वायू इ. विकून मिळालेले उत्पन्न ह्यांचा तपशील ठेवणे. वार्षिक खर्चाचे अंदाजपत्रक तयार करणे. इत्यादी.
  • कायदेविषयक : प्रदूषण नियंत्रण नियंत्रणमंडळाबरोबर संपर्क ठेवणे, मंडळाकडून आणि/ अथवा नगरपालिका, जिल्हा परिषद अशासारख्या यंत्रणेच्या मालकीच्या संस्थाकडून येणार्‍या सूचनांची कार्यवाही करून घेणे.
  • सुरक्षितता : शुद्धीकरण यंत्रणा एखाद्या कारखान्यासारखीच असल्यामुळे कारखान्याला लागू होणारे सर्व नियम ह्या यंत्रणेला सुद्धा लागू होतात. ह्याशिवाय येथे हाताळले जाणारे सांडपाणी अनेक रोगजंतूबरोबर घेऊन येत असल्यामुळे येथील सर्व कर्मचारी वर्गाला त्यांपासून सावध राहणे अत्यावश्यक असते. यंत्रणेच्या व्यवस्थापकाने कर्मचार्‍यांची वैद्यकीय तपासणी वेळोवेळी करून घेणे.
  • शुद्ध केलेल्या सांडपाण्याची मात्रा आणि गाळाची गुणवत्ता : शुद्ध केलेल्या सांडपाण्याची व त्यातील गाळाची प्रत दिलेल्या मानकांनुसार आहे आणि ह्या दोन्हींची विल्हेवाट पर्यावरणपूरक आहे, ह्याची खात्री करून घेतली जाते. ह्या कामासाठी रसायन प्रयोगशाळा हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. आत येणारे, बाहेर जाणारे सांडपाणी, उत्पन्न झालेल्या गाळाचे पृथःकरण वेळोवेळी करून त्यांची लेखी नोंद ठेवणे. तसेच सांडपाण्याची मात्रा व तिचे मोजमाप सतत करणे.

वरील सर्व नोंदींचा आणि कृतीचा उपयोग विश्वासार्ह अहवाल तयार करण्यासाठी होतो.

संदर्भ :

  • म्हसकर, अ. के.; मिराशे, पुं. की. पर्यावरण संरक्षण (चालक मित्रांस मार्गदर्शन), औरंगाबाद.