बहिष्कृत हितकारिणी सभा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली पहिली सार्वजनिक संघटना. २० जुलै, १९२४ रोजी या सभेची स्थापना केली गेली.  ‘शिकवा, चेतवा आणि संघटित करा’ हे या संघटनेचे प्रसिद्ध  ब्रीदवाक्य होते. या सभेच्या सदस्यांमध्ये सर चिमणलाल सेटलवाड, मेयर निस्सीम, रुस्तुमजी जीनवाला, जी. के. नरीमन, डॉ. र. पु. परांजपे, बी. जी. खेर, नानाजी मारवाडी, झीनाभाई राठोड, केशव वाघेला यांच्यासह  चांभार, मातंग व महार जातीतील सदस्यांचा समावेश होता. अस्पृश्यांच्या प्रश्नांच्या संदर्भात अस्पृश्यांनी भूमिका घेणे जसे गरजेचे होते,तसेच  स्पृश्य समाजानेसुद्धा या बाबतीत भूमिका घेणे गरजचे आहे हा दूरदर्शी विचार या संघटनेच्या स्थापनेमागे होता. बहिष्कृत हितकारिणी सभा या नावाने भारताच्या इतर भागातही सभा स्थापन झाल्या. इंदूर येथे श्रीमंत सवाई यशवंतराव महाराज होळकर यांच्या २१व्या जन्मदिनाप्रीत्यर्थ त्यांचे अभिष्टचिंतन करण्यासाठी बहिष्कृतांची जाहीर सभा भरली. त्या सभेत बहिष्कृत हितकारिणी सभा इंदूर येथे स्थापन करण्याचा निर्णय झाला. मुंबईतील बहिष्कृत हितकारिणी सभेत महिलांचा सहभाग असे, तसाच राधाबाई पंडित आणि अंबुबाई इनामदार यांचा विशेष सहभाग इंदूर येथील सभेच्या कामात असे

बहिष्कृत हितकारिणी सभेचे उद्देश

बहिष्कृत हितकारिणी सभेचे उद्देश व नियम विचारपूर्वक तयार केले गेले होते. बहिष्कृत वर्गाच्या चालू परिस्थितीची माहिती गोळा  करून व ती लोकनिदर्शनास आणून त्यावर लोकमत तयार करणे, त्याचप्रमाणे सरकारकडून त्यांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे व त्यांच्या उन्नतीस जरूर त्या सवलती मिळाव्यात म्हणून प्रयत्न करणे,बहिष्कृत वर्गात जागृती करणे व त्या प्रीत्यर्थ प्रचारक नेमणे, बहिष्कृत वर्गात त्यांच्या हक्कांची जाणीव उत्पन्न करून, ते त्यांना प्राप्त करून देण्याचा प्रयत्न करणे, शिक्षणप्रसार करणे,वाचनालये स्थापने , विद्यार्थी वसतिगृहे काढणे, लायक विद्यार्थ्यास शिष्यवृत्त्या देणे व देवविणे, समाज जागृतीसाठी कीर्तने किंवा मॅजिक  लॅटर्नच्याद्वारे व्याख्याने वगैरेंची व्यवस्था करणे, आर्थिक उन्नतीच्या जरूर त्या योजना व सूचना तयार करून,योग्य अधिकाऱ्यास सादर करणे. इ. या सर्व उद्देशांना अनुसरून बहिष्कृत हितकारिणीसभेची वाटचाल नंतरच्या काळात झाली.

बहिष्कृत हितकारिणी सभेचे कार्य

बहिष्कृत हितकारिणीसभेतर्फे प्रत्येक जिल्ह्यातून लोकजागृतीसाठी सभा आयोजित करण्याचा कार्यक्रम राबवला होता. बेळगाव जिल्ह्यातील निपाणी या ठिकाणी तिसरे मुंबई इलाका प्रांतिक बहिष्कृत परिषद अधिवेशन घेण्यात आले. या प्रभावातून बेळगावला वसतिगृह सुरू करण्यात आले (१९२७). या वसतिगृहाची जबाबदारी बळवंत हनुमंत वराळे यांनी स्वीकारली नंतर ते वसतिगृह १९२९ ला धारवाडला स्थलांतरित झाले. जळगाव, पनवेल(ठाणे येथे स्थलांतरित) व अहमदाबाद या ठिकाणी विद्यार्थी वसतिगृहे स्थापन करण्यात आली. बहिष्कृत हितकारिणी सभेतर्फे सायमन कमिशनला दोन खलिते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिली त्यामध्ये अस्पृश्यांमध्ये शिक्षण प्रसार करणे, शिष्यवृत्या विद्यार्थी वसतिगृहे चालू करणे या  मागण्या केल्या होत्या.अस्पृश्यांना नोकरीत जागा मिळाव्यात, यासाठी सभेने प्रयत्न केले. कु. काशीबाई जाधव या ढोर समाजाच्या मुलीला जे. जे. हॉस्पिटलमध्ये प्रवेश,दरमहा १५ रु. स्कॉलरशिप व नर्सेसच्या बोर्डिंगमध्ये  राहण्याची व्यवस्था केली. सभेच्या नेतृत्त्वाखाली श्री गुरुदत्त प्रासादिक भजन मंडळी, कामाठीपुरा १ली गल्ली, औचितपाडा येथे रात्रीची इंग्रजी व मराठी  शाळा सुरू केली.

हस्तलिखित व बहिष्कृत भारत 

बहिष्कृत भारतच्या कार्यालयामध्ये बहिष्कृत विद्यार्थ्यांच्या रविवारी वादविवाद मंडळाच्या बैठका होत. याबैठकीत ‘रणशिंग’ नावाचे एक हस्तलिखित मासिक सुरू करण्याचे ठरले होते. ते सुरू झाले की नाही याची माहिती उपलब्ध नाही. परंतु बहिष्कृत भारत वृत्तपत्र सुरू केले गेले. त्यात बहिष्कृत समाजाच्या अनेक प्रश्नांना समाजासमोर मांडण्यात आले व अस्पृश्यांमध्ये जागृती करण्यात आली. बहिष्कृत हितकारिणी सभेचे वाचनालय मुंबईतील क्लार्क रोडवर होते. या वाचनालयासाठी  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वत: देणगी दिली होती. कोल्हटकर  आपला संदेश आणि दे.वि. नाईक यांचे ब्राम्हण ब्राम्हणेतर हे वृत्तपत्र मोफत पाठवत होते. स्टुडंट ब्रदरहूड मुंबईचे सेक्रेटरी यांनी क्लार्क रोडवरील लायब्ररीस दोन बाकांची लाकडे व ५ रु.देणगी दिली. वाचन संस्कृती निर्माण व्हावी यासाठी बहिष्कृत हितकारिणीसभेने केलेले हे प्राथमिक  प्रयत्न होते.

आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मॅजिक लॅटर्नच्या सहाय्याने व्याख्याने आयोजित करण्याचा कार्यक्रम आखला होता. हा कार्यक्रम इंदूर येथील बहिष्कृत हितकारिणी सभेने देखील राबवला. शंभर वर्षांपूर्वी जनजागृती करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग डॉ. आंबेडकरांनी केल्याचे दिसून येते.

बहिष्कृत हितकारिणी सभेला ब्रिटिशांचे  सहकार्य

१९२४-१९२७ या कालखंडात बहिष्कृत हितकारिणी सभेने अनेक सामाजिक उपक्रम राबविले. ब्रिटिश सरकारकडे अस्पृश्यांच्या नोकरीच्या निमित्ताने सतत पाठपुरावा केला. त्यामुळे इंग्रज सरकारला ब. हि.सभेची दखल घेणे भाग पडले. मुंबईचे गव्हर्नर सर लेस्ली विल्सन यांनी सभेला २५० रु. देणगी दिली.  बेळगाव येथील अनाथ विद्यार्थी आश्रमास श्रीमंत धर्मवीर राजे लक्षमणराव भोसले यांनी देणगी दिली. महाडच्या सत्याग्रहास ही लोकांनी विशेष देणग्या दिल्या. सभेला मदत  म्हणून सोलापूर वतनदार महार परिषदेसाठी येणाऱ्या  महार लोकांनी ४४५ रु. देणगी दिली. भारतातीलच नव्हे, तर ब्रिटनमधील काही व्यक्तींना सुद्धा अस्पृश्याविषयी सहानुभूती होती. ब्रिटिश पार्लमेंटचे मजूर पक्षाचे मि. मार्डी जोन्स हे जेव्हा भारताच्या दौऱ्यावर आले, तेव्हा डॉ. आंबेडकरांनी भारतातील अस्पृश्यांचा प्रश्न ब्रिटनमध्ये चर्चिला जावायासाठी मि. मार्डी जोन्स व सभेच्या सर्व सदस्यांसोबत एक भेट घडवून आणली.

बहिष्कृत हितकारिणी सभा आणि महाड सत्याग्रह

बहिष्कृत हितकारिणी सभेने महाडचा चवदार तळे सत्याग्रह व मनुस्मृतीदहन हे दोन उपक्रम राबवले. माणूस म्हणून हक्क बजावण्यासाठी हे  सत्याग्रह  झाले. डॉ. आंबेडकरांनी  स्त्रियांचीही सभा घेतली, त्यासभेत बाबासाहेबांनी स्त्रियाना उद्देशून केलेल्या भाषणाने  महिलांमधील स्वाभिमानाला व त्यांच्याअस्मितेला कायमचे जागृत करून त्यांना अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी प्रेरित केले. अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी भविष्यातील पिढी घडविण्याचे कामही स्त्रियांनी करावे, हा बाबासाहेबांचा विचार होता.  या सत्याग्रहाच्या वेळी ‘आंबेडकर पथका’ ची निर्मिती सभेचे व्यवस्थापन  करण्यासाठी केली होती. पुढे कालांतराने याचे विस्तृत पातळीवर समता सैनिक दलात रुपांतर झाले.

जून १९२८ पासून भारतीय बहिष्कृत समाज शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना झाली. याचे जनरल सेक्रेटरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. बहिष्कृत हितकारिणी सभेने जे वसतिगृह काढले होते, त्याची सर्व जबाबदारी नंतर या मंडळातर्फे पार पाडली गेली. जून १९२८ नंतर बहिष्कृत हितकारिणी सभेचे संदर्भ मिळत नाहीत. काही तत्कालिक कारणे आणि काही प्रशासकीय कारणांमुळे या मंडळाची स्थापना झाली. बहिष्कृत हितकारिणी सभेने  आखलेले कार्यक्रम, तिची ध्येय-धोरणे यांनी अस्पृश्यांच्या सामाजिक चळवळीच्या वाटचालीमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावली. खऱ्या अर्थानेबहिष्कृत हितकारिणीसभेमध्ये सामाजिक, शैक्षणिक चळवळीच्या उत्थानाची बिजे आहेत.

संदर्भ :

  • बहिष्कृत भारत
  • खैरमोडे, चांगदेव,  डॉ. भीमराव रामजी आंबेडकर, खंड २, सुगावा प्रकाशन, पुणे (२०१३).

Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.