घरातील हवेत होणारे बदल जीविताला धोकादायक ठरत असल्यास त्याला घरातील वायू प्रदूषण म्हणतात.घरातील हवा खेळती नसल्यास ती अशुद्ध व प्रदूषित होते. अशा प्रदूषित हवेचा आरोग्यावर दुष्परिणाम होण्याची शक्यता असते.

arrowhead plant (syngonium podophyllum)

घरातील प्रदूषकांचे स्रोत म्हणजे वेगवेगळी कीटकनाशके, स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या लाकूड, कोळसा, रॉकेल इ. इंधनांचा धूर, फिनिल, डांबर गोळ्या, लाकूड, व्हार्निश, सिमेंट, रंग वगैरेंमुळे ॲलर्जी, डोकेदुखी, त्वचा विकार, श्वसन विकार, मेंदूशी निगडित आजार वगैरे होण्याची भीती असते. मंदिराच्या बंदिस्त गाभाऱ्यामध्ये आणि प्रार्थना स्थळांमध्ये जळणाऱ्या धूप, उदबत्त्या आणि उग्र दर्पाची अत्तरे ही सुद्धा प्रदूषकेच ठरतात.बंद घरात लावल्या जाणाऱ्या डासविरोधी उदबत्तीमधून येणारा धूर हा मानवी आरोग्यास अत्यंत धोकादायक आहे. ही उदबत्ती सु. आठ तास जळते. एका उदबत्तीच्या धुरामधून येणारे प्रदूषण जवळ-जवळ ७५ ते १३७ सिगारेटच्या धुरामधून येणाऱ्या प्रदुषकाएवढे असते. त्यामुळे श्वसनाचे आजार उद्भवतात,  तसेच मेंदू  व मज्जासंस्थेवरही त्याचा परिणाम होऊ शकतो.

प्रदूषण कमी करण्याचा सगळ्यात चांगला उपाय म्हणजे घरातील हवा खेळती ठेवणे. ते शक्य नसेल तर प्रदूषण कमी करण्यासाठी वनस्पतींचा उपयोग होऊ शकतो. त्यासाठी कमी प्रकाशात वाढणाऱ्या वनस्पती वापरता येतात.त्यांची देखभाल करणे सोपे असते, त्यांना पाणीही कमी लागते. या वनस्पतींवर सहसा कीड पडत नाही. त्यांच्या पानांमध्ये प्रदूषके शोषली जातात. वनस्पतींच्या चयापचय क्रियेत त्यांचे विघटन होते. ज्या मातीत या वनस्पती वाढवितात त्या मातीतील  आणि मुळांच्या सान्निध्यातील सूक्ष्मजीव प्रदूषकांचे विघटन करण्यास  मदत करतात. यासाठी प्रदूषके कोठे व कोणती आहेत, वनस्पतीचा प्रकार, वय, आकारमान, कुंडीचा आकार, माती-मिश्रण या सर्वांची माहिती असणे जरूरीचे आहे.

फिलिपाईन सदाहरित (aglaonema commutatum)

प्रयोगासाठी बांधलेल्या विशेष गृहात निरनिराळ्या वनस्पती वाढवून आणि घरेलू प्रदूषके त्यांच्या सान्निध्यात आणून अनेक प्रयोग केले गेले. सुमारे १५ वर्षांच्या प्रयोगांतून मिळालेल्या माहितीप्रमाणे ५० प्रकारांच्या वनस्पतींचा प्रदूषण कमी करण्यासाठी उपयोग होऊ शकतो. त्यांपैकी अतिप्रभावी वनस्पतींची नावे पुढीलप्रमाणे : बांबू पाम (Chamaedorea saefritzii), चायनीज एव्हरग्रीन (Aglaonema  modestum), इंग्लिश आयव्ही  Hedera helix ,  (Dracaena marginate), मासकेन (D.massangeana), Sanseviera laurentil, पॉट मम (Chrysanthemum morifolium), पीस लीली (Spathiphyllum), वार्नेकी (Dracaena Warneckii). हे सर्व प्रकार घरातील वातावरणात वाढू शकतात, इतकेच नव्हे तर असेही दिसून आले की, २०-२५ सेंमी. उंचीच्या  २-३ वनस्पती, १५-२० सेंमी. परिघाच्या  कुंड्यांत वाढवून त्या वनस्पती ९ चौ.मीटर क्षेत्राच्या खोलीतील प्रदूषके शोषून तेथील हवा शुद्ध करू शकतात.

डासांना पळवून लावणाऱ्या उदबत्तीच्या विषारी धुराचा परिणाम वनस्पतींवर कसा होतो या संशोधनामध्ये घरात वाढणाऱ्या अनेक प्रकारच्या वनस्पती अभ्यासल्या गेल्यात, ज्यामध्ये अग्लोनेमा, क्लोरोफायटम, मिंग अरेलिया, पोथॉस या वनस्पती अत्यंत प्रभावीपणे हे प्रदूषक शोषताना दिसून आले आहे. हे विषारी प्रदूषक शोषूनही या वनस्पती निरोगी राहतात. प्रदुषकांचे  परिणाम या वनस्पतींवर दिसत नाहीत. GCMS (Gas Chromatography Mass Spectrometry) तंत्रज्ञानाद्वारे या वनस्पतींनी शोषलेले प्रदुषकाचे प्रमाण तपासले असता असे आढळून आले की, या उदबत्तीच्या धुरातून येणारे अलेथ्रीन हे विषारी रसायन झाडे शोषून घेतात. (तक्ता).

वनस्पतींनी शोषलेले अलेथ्रीनचे प्रमाण : 

झाडाचे नाव   

शोषलेले अलेथ्रीनचे प्रमाण ug / kg

Aglonema commutatum

         २३ – ३३  

Syngonium podophyllum

          २२ – ४८

Chlorophytum comosum

          ८२० – १०७५

Ming Aralia

            ३३९ – १३५७

 Epipremnum aurium  (Pothos)

          १०९ – २१०

अमेरिकेतील अनेक प्रयोगशाळांमध्ये या विषयात संशोधन सुरू असून आता भारतातही संशोधन सुरू झाले आहे. काही निवडक संदर्भ येथे दिले आहेत.

संदर्भ :

  • Ghate  Seemaa. 2016. Assessment of Phytoremediating potential of Aglaonema commutatum Schott for Indoor pollutants. International Journal of Plant and Environment (IJPE), Vol. 2, No 1-2, 87-92.
  • Ghate Seemaa 2015. Syngonium podophyllum ‘Maza Red’ as Indoor Phytoremediator. Environews., Vol. 21 No 3 : 6-7.
  • Tarran J., Torpy F. and Burchett M. 2007. Use of living pot-plants to cleanse indoor air – research review. Proceedings of Sixth International Conference on Indoor Air Quality, Ventilation & Energy Conservation in Buildings – Sustainable Built Environment, Oct 28-31, 2007,Sendai, Japan, Volume III : 249-256.
  • Wolverton B.C. and Wolverton J.D. 1993. Plants and soil microorganisms: removal of formaldehyde, xylene, and ammonia from the indoor environment. Journal of the Mississippi Acad. Sci. Vol. 38 (2) : 11-15.
  • Yang, Dong Sik, Pennisi, Svoboda V., Son, Ki-Cheol, Kays, Stanley J. Screening Indoor Plants for Volatile Organic Pollutant Removal Efficiency. HortScience, Published online 1 August 2009; in print 44: 1377-1381 (2009).

समीक्षक बाळ फोंडके

प्रतिक्रिया व्यक्त करा