नायर, नारायण बाळकृष्णन : (६ जुलै १९२७ –२१ एप्रिल २०१०). भारतीय सागरी जीवशास्त्रज्ञ, पर्यावरणशास्त्रज्ञ आणि केरळ सायन्स काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष. संक्षिप्त नाव एन बाळकृष्णन नायर. यांचे पूर्ण नाव नारायण बाळकृष्ण नायर असे असले तरी ते बाळकृष्ण नायर या नावाने परिचित आहेत.
नायर यांचा जन्म केरळ राज्यातील एर्नाकुलम जिल्ह्याच्या पेरूम्बवूर या गावात झाला. मद्रास विद्यापीठातून पी.एचडी. मिळविल्यावर (१९५५) केरळ विद्यापीठात त्यांनी डी.एससी.साठी विज्ञान विभागात काम केले (१९६५). १२ वर्षे ते जलीय जीवशास्त्र आणि मत्स्यविज्ञान (अॅक्वेटिक बायॉलॉजी आणि फिशरीज) विभागाचे प्रमुख आणि विज्ञान विभागाचे अधिष्ठाता होते. नंतर ते सायन्स टेक्नॉलॉजी अँड इन्व्हायरन्मेंटल समितीमध्ये काम करू लागले. केरळ स्टेट कोस्टल झोन मॅनेजमेंट अॅथॉरिटी विभाग चालू होईपर्यंत ते गुणश्री प्राध्यापक या पदावर कार्यरत होते. मोसमी पावसाळ्यात ट्रोलिंग मासेमारी बंदीच्या पुढाकारासाठी ते प्रसिद्ध होते. ही त्यांची भूमिका नंतर केरळ सरकारने स्वीकारली आणि अंमलबजावणी केली. त्यामुळे, केरळच्या कोळंबीची संख्या वाचवण्यासाठी मदत झाली.
नायर यांनी समुद्री पर्यावरणाला हानी पोहचविणाऱ्या टेरेडो या मृदुकाय सजीवावर आपले संशोधन केले आणि लाकूड पोखरणाऱ्या या जीवांच्या अभ्यासामुळे त्यांची कार्यपद्धती समजून घेण्यात मदत झाली. त्यांनी समुद्रकिनारी पर्यावरणाचा अभ्यास केला आणि जलीय जीवनाच्या संवर्धनासाठी आणि त्यांच्या व्यवस्थापनासाठी उपाययोजना प्रस्तावित केल्या. लाकूड नष्ट करणाऱ्या जीवांचा विशेष संदर्भ असलेल्या भारताच्या आसपासच्या समुद्रातील जैव अवनती (इकाेलॉजी) विषयावरील त्यांचा प्रकल्प जवाहरलाल नेहरू अधिछात्र शिष्यवृत्तीसाठी निवडला गेला होता. ते ॲक्वाटिक बायोलॉजी जर्नलचे मुख्य संपादक म्हणून काम करीत असताना त्यांच्या संपादकीय मंडळाचे सदस्य म्हणून आठ विज्ञान जर्नलमध्ये सामील झाले. भारतीय मरीन बायोलॉजिकल असोसिएशनचे आजीवन सदस्य म्हणून त्यांनी अनेक परिषदांमध्ये बीज भाषण केले. त्यांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार, विद्यापीठ अनुदान आयोगाचे राष्ट्रीय प्राध्यापक, अखिल भारतीय प्राणी विज्ञान कॉंंग्रेसचे सुवर्ण पदक, आणि पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आले आहे. भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीने त्यांची फेलो म्हणून निवड करून त्यांना चंद्रकला व्होरा मेमोरियल पदक प्रदान केले गेले. ते भारतीय विज्ञान अकादमी, भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमी, द वर्ल्ड ॲकॅडमी ऑफ सायन्सेस, झूलॉजिकल सोसायटी ऑफ लंडन, झूलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया, मरीन बायोलॉजिकल असोसिएशन ऑफ इंडिया आणि फाउंडेशन, नॅशनल ॲकॅडमी ऑफ ॲग्रीकल्चरल सायन्सेसचे फेलो होते. नानसेन इन्व्हायरन्मेंटल रिसर्च सेंटरने (इंडिया) उत्कृष्टतेबद्दलचा प्रा. एन. बाळकृष्णन नायर वार्षिक पुरस्कार सुरू केला आहे.
नायर यांचे केरळ येथे निधन झाले.
कळीचे शब्द : #ट्रोलिंग #मासेमारी
संदर्भ :
- https://en.m.wikipedia.org/wiki/N._Balakrishnan_Nair
- https://www.newindianexpress.com/states/kerala/2010/apr/22/n-balakrishnan-nair-dead-149145.html
समीक्षक : मोहन मद्वाण्णा