ॲरिस्टॉटल : (इ.स. पूर्व ३८४ ते ३२२). ग्रीक तत्त्वज्ञ. ॲरिस्टॉटल यांनी प्लेटो या प्रसिद्ध तत्त्वज्ञाकडे शिक्षण घेतले. त्यांनी लेखियम या संस्थेची स्थापना करून ॲरिस्टॉटलीयन परंपरा सुरू केली. त्यांनी भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, प्राणिशास्त्र, गणित, तर्कशास्त्र, मूल्यशिक्षण, सौंदर्यशास्त्र, काव्य, रंगमंच, संगीत, मानसशास्त्र, भाषाशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, हवामानशास्त्र आणि भूशास्त्र अशा अनेक विषयावर लिखाण केले. त्यांनी त्याकाळी प्रचलित विविध तत्त्वज्ञानाचे विश्लेषण करून त्यांच्या रचनेवर भाष्य केले. त्यांच्या योगदानातूनच पाश्चिमात्य समाजाने तत्त्वज्ञान विषयक प्रश्न आणि त्यांची सोडवणूक करण्याच्या पद्धतीचा स्वीकार केला. त्यामुळे पाश्चिमात्य समाजातील प्रत्येक ज्ञानशाखेवर त्याचा परिणाम झाला.

ॲरिस्‍टॉटल यांच्या जीवनाविषयी फार थोडी माहिती उपलब्ध आहे. त्यांचा जन्म उत्तर ग्रीक प्रांतात स्टाजिरा येथे झाला. वयाच्या सतराव्या वर्षी त्यांनी प्लेटो यांच्या शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेतला. त्यांनी वयाच्या सदतीसाव्या वर्षी ही संस्था सोडली. मेसेडॉन येथील फिलीप-२ यांच्या सूचनेवरून त्यांनी अलेक्झांडर (सिकंदर) यांना शिकवले. त्यांनी स्थापन केलेल्या लायसियम या संस्थेद्वारा अनेक पुस्तकाची निर्मिती केली. ही पुस्तके पपायरस झाडापासून बनलेल्या कागदासारख्या गुंडाळीवर लिहिली होती. ॲरिस्टॉटल यांच्या कार्याचा प्रभाव अनेक शतके टिकून राहिला.यूरोपमधे नवयुग सुरू होईपर्यंत हा प्रभाव टिकून होता. त्यांनी भौतिकशास्त्र आणि खगोलशास्त्रात केलेल्या संशोधनाला सोळाव्या शतकापर्यंत मान्यता होती. त्यांच्या प्रतिपादनाला चर्चची मान्यता होती. मुस्लिम परंपरेत त्यांना पहिला शिक्षकअशी मान्यता होती. त्यामुळे त्यांना तर्कशास्त्र, जीवशास्त्र, राज्यशास्त्र यांसारख्या विषयाचे जनक मानले जाते. त्याकाळी या विषयांना नैसर्गिक विज्ञान असे संबोधन होते. त्यांनी ‘विज्ञान’ हा शब्द व्यापक अर्थाने वापरला. त्यात साहित्य, समाज अध्ययन आणि राजकीय विश्लेषण यांचाही समावेश होता. एकविसाव्या शतकात विज्ञान ही संज्ञा शास्त्र स्वरूपात पुन्हा व्यापक स्वरूपात वापरली जाऊ लागली आहे.

ॲरिस्टॉटल यांच्या तत्त्वज्ञानानुसार द्रव्याची निर्मिती पाच घटकांपासून झाली.इथर, पृथ्वी, अनि, पाणी आणि हवा हे ते पाच घटक होत. इथर हा तारे, ग्रह आणि यांच्याशी संबंधित दैवी पदार्थ होता. त्याला त्यांनी उष्ण, थंड, कोरडेपणा आणि ओलसरपणाची जोड दिली. गतीविषयक नियमाचे त्यांनी प्रतिपादन केले. त्यांनी स्थिरता ही पदार्थाची नैसर्गिक स्थिती असून गती मिळण्यामागे काही कारण असते. हे कारण नष्ट झाले की, पदार्थ मूळ स्थितीत येतो. त्यांनी गतीचे नैसर्गिक आणि अनैसर्गिक असे वर्णन केले, जड वस्तूला गती देण्यासाठी अधिक बल लागते हे त्यांच्या प्रतिपादनामुळे बलाचे सूत्र वस्तुमान गुणिले गती असे होते. हे सूत्र प्रचलित मान्यतेनुसार योग्य ठरत नाही. त्यांनी प्रतिपादन केलेले गतीचे सूत्र निर्वात पोकळीमधे पदार्थाची गती अनंत होईल हे दर्शविले. अशी पोकळी निर्माण करणे शक्य नाही असे त्यांचे मत होते. त्यांनी वर्णन केलेली चार कारणेही ग्राह्य ठरत नाहीत : द्रव्यतत्त्व, आकारतत्त्व, कार्यक्षमतत्त्व, उद्देशतत्त्व ही चार कारणे आहेत. त्यांनी लहान छिद्राचा वापर करून सूर्याची प्रतिमा मिळवली होती. छिद्राच्या आकारावर प्रतिमेचा आकार अवलंबून नसतो हे त्यांनी दाखवून दिले. खगोलशास्त्रातही त्यांनी आपली निरीक्षणे नोंदवली, डिमॉक्रिटस यांनी आकाशगंगेतील ताऱ्यांवर पृथ्वीची सावली पडते असे निरीक्षण नोंदवले होते. ॲरिस्टॉटल यांनी ते अमान्य केले. ताऱ्यांचे अंतर पृथ्वीपासून खूप दूर असेल आणि सूर्याचा आकार पृथ्वीपेक्षा खूप मोठा असेल तर असे घडणार नाही हे त्यांचे स्पष्टीकरण निर्विवाद होते. जीवशास्त्रात त्यांनी अनेक निरीक्षणे नोंदवली, ऑक्टोपसमधील पुनरुत्पादन करणाऱ्या पायाचे वर्णन त्यांनी केले. त्यांनी रक्ताचा आकार प्राण्याच्या शरीरानुसार बदलतो असे सांगितले. लहान आकाराच्या प्राण्यात तो कमी आणि मोठ्या आकाराच्या प्राण्यात तो अधिक असतो. त्याचप्रमाणे गर्भधारणेचा काळ लहान आकाराच्या प्राण्यात कमी आणि मोठ्या आकाराच्या प्राण्यात अधिक असतो. उंदीर आणि हत्तीची तुलना केल्यास याची खात्री पटते. मानव, प्राणी आणि वनस्पती हे अभ्यासाचे विषय होऊ शकतात हे त्यांनी दाखवून दिले. त्यांनी केलेल्या संशोधनामुळे निसर्गविज्ञानाचा पाया घातला गेला.

ॲरिस्टॉटल यांचे वयाच्या बास्‍ष्टव्या वर्षी यूबीआ बेटावरील कॅल्स‍िस येथे निधन झाले.

कळीचे शब्द :  #ग्रीक तत्त्वज्ञ #भौतिकी #खगोल #जीवशास्त्र

संदर्भ :

समीक्षक : मोहन मद्वाण्णा