फागगीते : फाग हा लोकगीत प्रकार असून तो होळीच्या खेळनाट्यात सादर केला जातो. फागगीते फाल्गुन महिन्यात, विशेषतः होळीच्या काळात गायली जाणारी लोकगीते आहेत, ज्यात प्रेम, विरह, आनंद,आध्यात्म  आणि सामाजिक अनुभवाचे प्रतिबिंब दिसते. या गाण्यांमध्ये साधे, पण हृदयाला भिडणारे बोल असतात, ज्यामुळे त्या काळातील ग्रामीण जीवनाचे चित्रण होते. फागगीते महिलांनी गायली जातात, आणि त्या गाण्यांमध्ये ग्रामीण जीवनातील विविध पैलूंचे सुंदर वर्णन केले जाते. महाराष्ट्राच्या तळ कोकणात शिमगा / शिग्मा/ शिगमोत्सव अर्थात होळी उत्सवात फाग सादर करण्याची प्रथा आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग भागातील ‘फाग गीत’ होळी उत्सव प्रसिद्ध आहे. या परिसरात शिमगा उत्सवाच्या निमित्ताने प्रत्येक गावात होळी पूजन होते. शिमग्याच्या खेळाची किंवा उत्सवाची सुरुवात देवाला गाऱ्हाणे गाऊन केली जाते.यानंतर फाग  गायनाची प्रथा आहे.

फाग रचना व गायन हे  शिमगा  खेळ नाट्यातील महत्त्वाचा भाग असते.  फाग हा विशिष्ट गीत रचना प्रकार आहे.  त्याची रचना ओवी सदृश्य असते. स्वाभाविकता व साधेपणा ह्या गीतांचा विशेष आहे. फाग हे सोप्या चालीचे असून त्याचा रचना या मात्राबद्ध गीत प्रकार आहेत.  यात १८, २२, २६  मात्रांची रचना येते.  काहीवेळा  फाग हा दोन नाट्यप्रसंग जोडण्यासाठी ही गायला जातो. याचे घुमट हे मुख्य वाद्य आहे.

माझे नमन वेद पुरुषाला,

लक्ष्मी वरा यमुनेशा

मजला मती द्यावी

अवधारा शिग्मा खेळाया..

माझे नमन वेद पुरुषाला..

 

या फागगीतात लक्ष्मीचा पती यमुनेष अर्थात श्रीकृष्णाला शिग्मा खेळण्याची, मला बुद्धी दे; अशी विनवणी केली आहे. फाग गीतात इंद्रादी देवताही शिग्मा खेळतात.देव यमुनेशा असणारा  श्रीकृष्णहीआपल्या सवंगड्यासह यमुनातीरी फाल्गुन मासातील पौर्णिमेला होळी तयार करून  शिमग्याचा खेळ खेळत आहे, अशी कल्पना केलेली आहे.

शिग्मा खेळत हो, शिग्मा खेळत गा,

खेळत असे इंद्र रे शिग्मा खेळत गा

फाल्गुन मास हो फाल्गुन मास गा

फाल्गुन मासपौर्णिमेचा खांबा घातला होळीचा..

 

रंगमंचावर शिमग्याच्या निमित्ताने फाग गाऊन विविध प्रकारची सोंगे आणली जातात. होळीचे पूजन, धुळीवंदन झाले की शिमगा खेळाच्या रंगमंचावर तरुण युवकाला स्त्रिवेष परिधान करून उभे करतात. या स्त्रीवेशधारी पुरुषाला कोळीण वा राधा म्हंटले जाते.घुमट वाद्याच्या संगीत साथीने ही कोळीण/ राधा फाग गायन; नाचून सादर करते. गावातील आराध्य देवतांना कोळीन वा राधा यांची भेट घडवून नंतर रंगमंचावर शिग्माखेळ उभा करायचा अशी प्रथा कोकणात सर्वसाधारण सगळीकडे दिसते. गणपती, सरस्वती, शिवपार्वती यांची मुखवटाधारी सोंगे नाचत असताना त्यांची स्तुतीपर फाग गायन केले जाते. हा शिमगा खेळाचा विधीनंतरचा पूर्वरंगाचा भाग असतो.

शिग्मा खेळाचा मुख्य भाग गीतगायनाचा असतो. फाग गीत गायन संपताच सोंगे सादर होतात म्हणून प्रथम वेगवेगळ्या रंगमंचावर गायली जाणारी फाग गीते त्यांच्या आकृतिबंधानुसार सादर करतात. तसेच जी सोंगे खेळली जाणार आहेत ती सोंगे नमुना म्हणून सादर करतात. फाग गीते ही गणपतीचा, रामेश्वराचा, शंकर-पार्वतीचा, वाडेगवी मातेचा, रवळनाथाचा, दशावतारीचा, चौंडेश्वरी देवीचा अशी आढळतात. यासोबत रामायणी फाग प्रसिद्ध आहे.  यात रामायणात येणारी पात्रे जसे अहिल्या, सीता, कैकयी, मृग सुवर्ण, सीता शोध, लंका दहन, हनुमंत, द्रोणागिरी उचलीला अशी फागगीते सादर होतात तर श्रीकृष्णलीला वर्णनपर फागात श्रीकृष्ण जन्म, नवलक्ष गोवर्धन, कंसवध  आदी प्रासंगिक फाग गायले जातात.  यासोबत श्रावण बाळ, चिलीबाळ असेही फाग  गाण्याची प्रथा आहे.

विजयदुर्ग येथील शिमगा खेळाची सुरुवात करताना पहिल्या दिवशी पाच फाग गातात. यात ‘विजयदुर्ग नगरी हो..’  या पहिल्या फाग गायनाने शिमगा खेळाची सुरुवात होते.  विजयदुर्ग हा  फाग  मराठ्यांच्या आरमारी परंपरेची शौर्यगाथा आहे. विजयदुर्गाचे मानकरी शिमगा खेळ रंगमंचावर उभा राहिल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी धुळप, सरकार वाडा, किल्ल्यातील मुख्य देवस्थाने आदी  ठिकाणी फागगायन करून राधा नाचवितात.

फागगीते केवळ मनोरंजनाचे साधन नाहीत, तर ती एक सांस्कृतिक परंपराही आहे. या गीतांमधून समाजाच्या बदलत्या परिस्थितीचे आणि स्त्रीच्या जीवनातील विविध पैलूंचे दर्शन घडते. फागगीतांचा लयबद्ध ताल, साधी पण हृदयाला भिडणारी शब्दरचना, आणि त्यामधून व्यक्त होणारे भाव विश्व यामुळे ते आजही महाराष्ट्रातील ग्रामीण भागात आवडीने गायले जातात.

संदर्भ : क्षेत्र संशोधन