पुरामानवशास्त्राच्या इतिहासात ‘ल्युसीʼ(ए.एल. २८८-१) ही सर्वांत प्रसिद्ध अशी जीवाश्मस्वरूपातील होमिनिड मादी आहे. पुरामानवशास्त्रज्ञ डोनाल्ड जोहानसन व मॉरीस तायेब यांना १९७४ मध्ये ल्युसी या जीवाश्मांचा शोध लागला. इथिओपियात अफार भागात शोध करत असताना हडार (Hadar) येथे एका होमिनिड मादीच्या हाडांचे जवळजवळ ४० टक्के जीवाश्म (४७ हाडे) मिळाले. जोहानसन यांच्या शोधपथकाने या मादीला ‘ल्युसीʼ हे टोपणनाव दिले. इथिओपियातील स्थानिक आम्हारिक भाषेत तिचे नाव डिंकनेश म्हणजे ‘सुंदरीʼ असे आहे. ल्युसी ऑस्ट्रॅलोपिथेकस अफारेन्सिस (Australopithecus afarensis) या प्रजातीची होती. ल्युसीच्या जीवाश्मांचे भूवैज्ञानिक वय ३१.८ लक्ष वर्षे आहे. ते अर्गान-अर्गान कालमापन पद्धतीने ठरवण्यात आले आहे.

ल्युसीच्या मागच्या पायांच्या हाडांच्या व कमरेच्या हाडांच्या अभ्यासांतून ती दोन पायांवर चालत असावी असे दिसते. तसेच पायाचा अंगठासुद्धा कपींप्रमाणे इतर बोटांच्या विरुद्ध बाजूने नव्हता. तथापि पुढच्या पायांची रचना ही चिंपँझींप्रमाणे झाडांमध्ये वावरण्यासाठी अनुकूल होती. तसेच तिचे पुढचे पाय (हात) मागच्या पायांच्या तुलनेत मानवांप्रमाणे नसून ते चिंपँझींप्रमाणे लांब होते. इतर ऑस्ट्रॅलोपिथेकस अफारेन्सिस प्राण्यांप्रमाणे ल्युसीचा मेंदू छोटा (४१० घ.सेंमी.) होता. ल्युसीचे वजन २८ किग्रॅ. व उंची सु. १०७ सेंमी. असावी. मृत्यूच्या वेळी ल्युसी २५ वर्षे वयाची होती. ती कोणत्या कारणामुळे मेली यासंबंधी काही अंदाज करण्यात आले असले, तरी एखाद्या भक्षकाने तिला ठार मारल्याचे कोणतेही पुरावे उपलब्ध नाहीत.

टेक्सास विद्यापीठातील जॉन काप्पेलमन व त्यांच्या सहकाऱ्यांनी ल्युसीच्या सर्व हाडांचा क्ष-किरण संगणकीय तंत्र (कम्प्युटेड टोमोग्राफी) वापरून अभ्यास केला. त्यांना ल्युसीच्या जवळजवळ सर्व हाडांमध्ये ल्युसी जिवंत असताना हाडे मोडल्याच्या (Perimortem fractures)  खुणा आढळल्या. विशेष म्हणजे उजव्या हाताचे ह्यूमरस (Humerus) हे हाड ज्या प्रकारे मोडले होते, ते पाहून ल्युसी किमान १२-१३ मीटर उंच झाडावरून खाली पडली असावी, असे दिसून आले. पडताना हात पुढे असल्याने उजव्या हाताचे हाड मोडले होते. तसेच डावा खांदा व शरीरातील इतर हाडांवर ती अशा प्रकारे खाली आदळून मोडल्याच्या सुसंगत खुणा दिसून आल्या.

ल्युसीची हाडे इथिओपियाची राजधानी अदिस अबाबा येथे नॅशनल म्यूझीअममध्ये सुरक्षित ठेवली आहेत.

इथिओपियात हडारपासून जवळ डिकिका (Dikika) येथे २००६ मध्ये ३३ लक्ष वर्षांपूर्वीच्या एका बालकाचे जीवाश्म (डीआयके-१) सापडले. या जीवाश्माला ‘डिकिका बालकʼ किंवा ‘ल्युसीचे बाळʼ म्हणतात. परंतु ते ल्युसीचे बाळ नव्हते, कारण दोन्हींमध्ये किमान एक लाख वीस हजार वर्षांचे अंतर आहे.

संदर्भ :

  • Alemseged, Z.; Spoor, F.; Kimbel, W. H.; Bobe, R.; Geraads, D.; Reed, D. & Wynn, J. G. ‘A juvenile early hominin skeleton from Dikikaʼ, Nature, 443 : 296-300, Ethiopia, 2006.
  • Johanson, D. C. & Taieb, M. ‘Plio-Pleistocene hominid discoveries in Hadar, Ethiopiaʼ, Nature,  260: 293-297, 1976.
  • Johanson, D. C. & Edey, M. E. Lucy : The beginnings of humankind, St. Albans, Granada, 1981.
  • Larsen, C. S. Our Origins, New York, 2011.

समीक्षक शौनक कुलकर्णी