हिंदुस्थानची फाळणी या विषयावर आधारलेल्या काही मोजक्या चित्रपटांपैकी अत्यंत मार्मिक असा हिंदी चित्रपट. हा चित्रपट १९७३ मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन एम. एस. सथ्यू (मैसूर श्रीनिवास सथ्यू) या भारतातील एक प्रमुख कला दिग्दर्शक व नेपथ्यकारांनी केलेले आहे. दिग्दर्शक मृणाल सेन यांच्या भुवन शोम  (१९६९) या चित्रपटाने भारतातील समांतर चित्रपटयुगाचा आरंभ झाला, असे मानले जाते. समांतर चित्रपटांच्या चळवळीसाठी एक महत्त्वाचा चित्रपट म्हणून गर्म हवा याचे स्थान अबाधित आहे. वास्तवदर्शी असलेला हा चित्रपट देशाच्या विभाजनानंतर बदललेल्या सामाजिक, राजकीय, व्यावसायिक आणि मानवी मूल्यांना प्रकाशझोतात आणतो.

हा चित्रपट प्रख्यात लेखिका इस्मत चुगताई यांच्या एका अप्रकाशित कथेवर आधारित आहे. या चित्रपटाची पटकथा कैफी आझमी आणि शमा झैदी यांनी लिहिली आहे. देशाच्या फाळणीनंतर विशेषत: गांधीहत्येनंतर बदललेले समाजजीवन व राजकीय अपरिहार्यता यांचे दर्शन या चित्रपटात होते. फाळणीनंतर बदललेल्या परिस्थितीमुळे आग्रा येथील एका सरळमार्गी मुस्लिम व्यापाऱ्याची आणि त्याच्या कुटुंबाची झालेली कोंडी, अशा कथानकाच्या माध्यमातून त्याकाळच्या परिस्थितीवर हा चित्रपट भाष्य करतो.

या चित्रपटात बलराज साहनी यांनी सलीम मिर्झा ही मध्यवर्ती मुस्लिम व्यक्तिरेखेची भूमिका साकारली आहे. दिनानाथ झुत्सी, जमाल हाश्मी, शौकत आझमी, अबू सिवनी, फारूक शेख, गीता सिद्धार्थ आणि बदर बेगम या इतर कलाकारांनीही या चित्रपटात आपल्या भूमिका अत्यंत प्रभावीपणे साकारल्या आहेत.

चित्रपटाची कथा साधारण पुढीलप्रमाणे आहे. फाळणीची झळ भारतातील ज्या मुस्लिम बांधवाना बसली, त्यांचे प्रतिनिधित्व करणारी सलीम मिर्झा ही गर्म हवाच्या केंद्रस्थानी असलेली प्रमुख व्यक्तिरेखा. फाळणीनंतर आग्र्यामध्ये राहणाऱ्या सलीम मिर्झा यांच्यापुढे नातेवाईकांबरोबर पाकिस्तानमध्ये जाण्याचा पर्याय खुला असतो; मात्र सगळी हयात आग्र्यामध्ये चपलांचा व्यवसाय करण्यात घालवलेल्या सलीम मिर्झांना आणि त्यांच्या वयोवृद्ध आईला हा पर्याय अमान्य असतो. आपण ज्या ठिकाणी जन्माला आलो, तिथेच आयुष्याची इतिश्री व्हावी ही या दोघांची इच्छा असते; पण त्यांच्या या वैयक्तिक इच्छेला त्यांच्या समाजाची मान्यता नसते. ऑल इंडिया मुस्लीम लीगचा नेता असलेला सलीम मिर्झांचा मोठा भाऊ हलीम हा आपल्या कुटुंबासहित पाकिस्तानला रवाना होतो. सलीम मिर्झांचा व्यवसाय ते मुस्लिम असल्याने बंद पडतो. ठरलेले लग्न मोडल्यामुळे मिर्झांची तरुण मुलगी अमिना आत्महत्या करते. या सगळ्या पार्श्वभूमीवर विपरीत परिस्थितीत मिर्झांचा भारत सोडून न जाण्याचा निर्धार मात्र कायम राहतो. त्यांचा मुलगा सिकंदर (फारूक शेख) बेरोजगारी आणि हिंदु-मुस्लिम भेदभाव करणाऱ्यांचा विरोध करणाऱ्या मोर्च्यामध्ये सामील होतो आणि मिर्झांच्या निर्णयाला पुष्टी मिळते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतभूमीशी एकनिष्ठ असणाऱ्या मुस्लिम बांधवांची हतबलता या चित्रपटामधून समोर येते. एका विशिष्ट धर्मात जन्माला आल्यामुळे स्थलांतरित व्हावे लागणे, आपली पाळेमुळे ज्या भूमीत खोलवर रुजली आहेत, तिथून ती उपटून अनिच्छेने दुसऱ्या जागेत रुजवण्याचा प्रयत्न करावा लागणे, हे दु:ख सलीम मिर्झांच्या वाट्याला येते. या व्यक्तिरेखेतून ही भारतीय मुस्लिम समाजाची वेदना प्रातिनिधिक रूपातून गर्म हवामधून मांडलेली आहे.

“यूँ दूर से करते है तूफ़ान का नजारा, उनके लिए तूफ़ान वहाँ भी है यहाँ भी,

धारे में जो मिल जाओगे, बन जाओगे धारा, ये वक्त का ऐलान वहाँ भी है यहाँ भी”

या कैफी आझमी यांच्या शेराने चित्रपटाची सांगता होते.

या चित्रपटात नवनिर्माण करू पाहणाऱ्या भारतावरची आस्था आणि सकारात्मक दृष्टीकोन असणाऱ्या सिकंदरची व्यक्तिरेखा वाखाणण्याजोगी होती. ही साकारलेल्या फारूक शेख या गुणी अभिनेत्याच्या कारकीर्दीतील हा पहिलाच चित्रपट. बलराज साहनी यांच्या उत्कट अभिनय कौशल्याची प्रचिती या चित्रपटातून येते. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले. त्यांच्या कारकीर्दीतील हा शेवटचा चित्रपट ठरला. या चित्रपटातील परिणामकारक संवाद प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडतात. कैफी आझमी यांनी लिहिलेल्या गाण्यांना उस्ताद बहादूर खान यांनी पार्श्वसंगीत दिले आहे. याशिवाय वारसी बंधूनी संगीतबद्ध केलेली कव्वाली चित्रपटातल्या एका दृश्यात गहिरे रंग भरते. चित्रपटाचे बहुतांश चित्रीकरण आग्रा येथे झाले आहे. यातील काही दृश्य फतेहपूर सिक्री येथे चित्रित करण्यात आली आहेत.

हा चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या चार दशकानंतर २०१४ मध्ये ४०व्या वर्धापन दिनानिमित्त हा चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित करण्यात आला. इंडिया टाईम्स या वृत्तपत्राने २००५ साली प्रस्तुत केलेल्या २५ सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपटांच्या यादीत या चित्रपटाचा समावेश आहे. १९७४ साली ऑस्कर पारितोषिकासाठी या चित्रपटाचे भारतातर्फे अधिकृत रीत्या नामांकन करण्यात आले होते. कान्स चित्रपट महोत्सवातदेखील या चित्रपटाला नामांकन मिळाले होते. नर्गिस दत्त राष्ट्रीय एकता पुरस्कारासह फिल्मफेअरचे ‘उत्कृष्ट कथा’, ‘उत्कृष्ट पटकथा’ आणि ‘उत्कृष्ट संवाद’ असे तीन पुरस्कार देखील या चित्रपटाने मिळवले.

समीक्षक : संतोष पाठारे