पणिक्कर, नेदुमंगत्तू केसवा : (१७ मे १९१३ — २४ जून १९७७). भारतीय एक जीववैज्ञानिक. केंद्रिय सागरी मत्स्य संशोधन संस्थेचे ते माजी संचालक तसेच भारत सरकार मत्स्यपालन विकासाचे माजी सल्लागार आणि कोचीन विज्ञान व तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू होते. त्यांना भारतीय पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे (१९७३).
पणिक्कर यांचा जन्म केरळमधील कोट्टायम येथे झाला. त्यांचे संपूर्ण शिक्षण कोट्टायम येथेच झाले. बावीस सागरी मोहिमेमधून गोळा केलेल्या प्लवंग आणि त्यांनी तयार केलेल्या सागरी नकाशामुळे (अॅट्लास) त्यांना मद्रास विद्यापीठाची डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी प्रदान करण्यात आली.
पणिक्कर यांचा राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थान (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनॅग्राफी), केंद्रिय सागरी मत्स्य संशोधन संस्था (सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ मरीन फिशरीज), केंद्रिय अंर्तस्थलीय मात्सिकी अनुसंधान संस्था (सेंट्रल इंलँड फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट), केंद्रीय मात्सिकी प्रौद्योगिक अनुसंधान (सेन्ट्रल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी फिशरीज), केंद्रीय मत्स्यविज्ञान शिक्षण संस्था (सेन्ट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन) आणि केंद्रीय मत्स्य नौचालन एवं इंजीनियरी प्रशिक्षण संस्थान (सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज नॉटिकल अँड इंजिनीअरींग ट्रेनिंग (पूर्वीचे नाव – सेन्ट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज ऑपरेटिव्हज) या संस्था स्थापन करण्यात महत्त्वाचा सहभाग होता. राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थान ते संस्थापक सदस्य असून ते या संस्थेचे सात वर्षे संचालक होते. त्यापूर्वी ते आंतरराष्ट्रीय हिंद महासागर शोध मोहिमेच्या प्रकल्पाचा भाग होते. त्यांनी संधिपाद कवचधारी (क्रस्टेशिया- Crustacea) विज्ञानातील तज्ञ म्हणून काम केले.
पणिक्कर तिरुवअनंतपुरम विद्यापीठ महाविद्यालयात प्राणिशास्त्र विभागाचे प्रमुख, मद्रास विद्यापीठातील प्राणिशास्त्र प्रयोगशाळेचे संचालक, भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाचे विशेष सेवा अधिकारी, भारताच्या आंतरराष्ट्रीय महासागर मोहीमांचे संचालक आणि राष्ट्रीय कृषी आयोगाचे सदस्य अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे सांभाळल्या. त्यांनी इंडियन नॅशनल सायन्स ॲकॅडमी आणि केरळ राज्य नियोजन मंडळाचे सदस्य म्हणूनही काम केले. जर्नल ऑफ द झुऑलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया, इंडियन जर्नल ऑफ़ एक्सपरीमेंटल बायोलॉजी, इंडियन जर्नल ऑफ मरीन सायन्स आणि मरीन बायोलॉजी या जर्नल्सच्या संपादकीय मंडळांवर ते कार्यरत होते. इंडियन ओशन बायोलोजिकल सेंटरची सीएसआयआर आणि युनेस्कोच्या सहकार्याने कोचीनमध्ये सुरुवात करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता.
पणिक्कर हे भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमी, रॉयल सोसायटी ऑफ आर्ट्स (लंडन), नॅशनल ॲकॅडमी ऑफ सायन्सेस, इंडिया आणि इंडियन जिऑफिजिकल युनियनचे फेलो होते. त्यांना डेन्मार्क सरकारतर्फे गॅलॅथिया मानचिन्ह (१९५३), झुऑलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाकडून सर दोराबजी टाटा पदक आणि राष्ट्रीय विज्ञान अकादमीकडून चंद्रकला होरा पदकही मिळाले होते.
पणिक्कर यांचे तिरूवअनंतपुरम येथे त्यांचे निधन झाले.
कळीचे शब्द : #प्लवंग #सागरीनकाशा
संदर्भ :
- https://en.m.wikipedia.org/wiki/N._Kesava_Panikkar
- https://amp.en.google-info.in/46909586/1/n-kesava-panikkar.html
समीक्षक : मोहन मद्वाण्णा