अर्धमागधी कोश (१९२३-३८): अर्धमागधी शब्दाला  संस्कृत, गुजराती, हिंदी आणि इंग्रजी इत्यादी भाषेतील अर्थ पर्याय देणारा कोश . जैन मुनि रत्नचंद्रजी यांनी याची रचना केली असून श्वेतांबर स्थानकवासी, इंदौर यांनी पाच भागांमध्ये तो प्रकाशित केला आहे. पहिल्या चार भागांमध्ये अर्धमागधी भाषेत तयार केलेले ११ अंग, १२ उपांग, ६ छेदसूत्र, ४ मूलसूत्र आणि ७ प्रकर्णक असे आगमग्रंथ तसेच कर्मग्रंथ, कर्मप्रकृति, प्रवचनसारोधार इत्यादी प्रकरणग्रंथ मिळून जवळपास पन्नास ग्रंथांचे पन्नास हजार अर्धमागधी शब्द एकत्रित केले गेले आहेत. प्रत्येक शब्दाचे संस्कृत, गुजराती, हिंदी आणि इंग्रजी अर्थ दिले आहेत.

कर्त्याच्या काळात मुख्यतः तीन आवृत्त्या प्रकाशित झाल्या: (१) धनपतिसिंह यांनी मुरशिदाबादहून प्रकाशित केलेला आगम (इ. स. १८७५-१८८६), (2) जैन आगमोदय समिती, मुंबई यांनी प्रकाशित केलेला आगम (इ. स. १९१०-१९२०) आणि (३) अमोलक ऋषी संपादित हैदराबाद ग्रंथमालेतील आगम (इ. स. १९१९-१९२०). या तीन आवृत्त्या प्राचीन पद्धतीने संपादित झाल्या आहेत. मुख्यतः या तीन आवृत्त्यांवर आधारित प्रस्तुत कोशाची रचना केली गेली. या तीन आवृत्त्यांव्यतिरिक्त विदेशी विद्वानांनी संपादित केलेल्या काही फुटकळ आगमांचाही यात वापर करण्यात आला आहे. शेवटच्या पाचव्या भागात परिशिष्ट म्हणून महाराष्ट्री प्राकृत आणि देशी भाषेतील शब्द तसेच पूर्वी सुटलेले अर्धमागधी शब्दांचा समावेश केला आहे.

पहिला भाग १९२३ मध्ये, दुसरा भाग १९२७ मध्ये, तिसरा भाग १९३० मध्ये आणि चौथा भाग १९३२ मध्ये प्रकाशित झाला. १९३९ मध्ये त्याचा अंतिम पाचवा भाग प्रकाशित झाला. पहिल्या चार भागांमध्ये मूळ अर्धमागधी शब्द दिले आहेत, त्यानंतर मुनी रत्नचंद्रजी यांनी स्वतः गुजराती आणि हिंदीमध्ये त्याचे अर्थ दिले आहेत, परंतु त्यानंतर इंग्रजीमध्ये अर्थ त्या भाषेच्या विद्वान अध्यापकांनी दिले आहेत. ज्या अर्थात आगमांमध्ये शब्द वापरलेले आहेत तेच अर्थ संपूर्ण कोशात दिले आहेत. पाचव्या भागात पहिल्या विभागाच्या परिशिष्ट खंडात मागील चार भागांमध्ये आगमांचे राहिलेले आणि नंतर गोळा केलेले शब्द वरील भाषांमध्ये दिले आहेत. परंतु दुसऱ्या विभागात महाराष्ट्री प्राकृत भाषेतील शब्दांमध्ये मूळ महाराष्ट्री प्राकृतमध्ये शब्द देऊन त्याचा संस्कृतमधील वापर दर्शविला आहे आणि हिंदी आणि इंग्रजीमध्ये त्याचे अर्थ दिले आहेत. गुजरातीमध्ये अर्थ दिलेले नाहीत. त्याच्या तिसऱ्या आणि अंतिम विभागात देशी शब्दांमध्ये फक्त देशी शब्दच दिला आहे. पाचव्या विभागात शब्दाचा इंग्रजी अर्थ दिला आहे. या कोशाचे पुनर्मुद्रण अमर पब्लिकेशन्स, वाराणसी आणि १९८८मध्ये मोतीलाल बनारसीदास, दिल्ली यांनी केले आहे.

संदर्भ : https://jainebooks.org/books/10147/ardhamagadhi-kosha-part-1