गास, साउल : (२८ फेब्रुवारी, १९२६ ते १७ मार्च, २०१३) साउल गास यांचा जन्म अमेरिकेत मॅसेच्युसेटस येथील चेल्सी येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण बोस्टन येथे झाले. ते तीन वर्षे लष्करात कार्यरत होते. त्यांनी बोस्टन विद्यापीठातून गणितात पदवी मिळवली आणि ते अमेरिकेन वायुसेनेच्या एबरडीन  बॉम्बिंग मोहिमेत गणितज्ञ म्हणून पहिल्यांदा रुजू झाले. नंतर प्रवर्तन संशोधन तज्ज्ञ म्हणून वायुसेनेच्या मुख्यालयात ते काम करून लागले. तेथे रेषीय प्रायोजन या प्रवर्तन संशोधनाच्या एका मूळ भागाचा उगम झाला होता. १९६५ साली त्यांनी अभियांत्रिकी विज्ञान / प्रवर्तन संशोधन या विषयात पीएच्.डी. पदवी बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातून प्राप्त केली. त्यांच्या प्रबंधाचे शीर्षक होते, ‘The Dualplex Method of Large-Scale Linear Programs’ आणि मार्गदर्शक होते जॉर्ज दान्त्झिग (George Dantzig) – रेषीय प्रायोजनाचे जनक.

प्रचाली रेषीय प्रायोजन (parametric linear programming) याचा विकास गास यांनी केला. यामुळे रेषीय प्रायोजन प्रश्नाचे इष्टतम उत्तर किती प्रमाणात स्थिर राहील हे मोजता येते. ते उपयोजनासाठी महत्त्वाचे ठरते. रेषीय प्रायोजनाशिवाय गास यांनी महाकाय प्रणालींचे व्यवस्थापन, द्यूत सिद्धांत, गणिती प्रारूपे यांचे मूल्यमापन आणि बहुउद्दिष्ट निर्णय विश्लेषण (multi-objective decision analysis) या क्षेत्रांत सैद्धांतिक आणि उपयोजन अशा दोन्ही प्रकारे भर घातली.

त्यांनी अमेरिकन प्रशासनासाठी सल्लागार म्हणून काम केले. तसेच अमेरिकन अध्यक्षीय आयोगाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागासाठी त्यांनी आपली सेवा दिली होती. त्याशिवाय गास यांनी अनेक खाजगी आणि व्यावसायिक संस्थांसाठी प्रवर्तन संशोधन तज्ञ किंवा प्रणाली विशेषज्ञ या पदांवर काम केले. उदा., आयबीएम कंपनीच्या विविध प्रकल्पांवर उपयोजित वैज्ञानिक, सी.इ.आय.आर. साठी प्रवर्तन संशोधन विभागाचे संचालक, वर्ल्ड सिस्टिम्स लॅबोरेटऱ्यांचे वरिष्ट उपाध्यक्ष आणि मॅथेमॅटिकाचे (Mathematica) या प्रवर्तन संशोधन आणि अर्थशास्त्र सल्लागार कंपनीचे उपाध्यक्ष.

गास यांनी Robert H Smith School of Business, Maryland University येथे १९७५-२००१ या काळात अध्यापन आणि संशोधन केले. त्यांनी अमेरिका, जपान, तैवान, स्पेन आणि न्यूझीलंड या देशांतही अध्यापन केले. पोलीस बीटची संरचना, वाहतूक सुरक्षा, मानव संसाधन व्यवस्थापन अशा विविध प्रश्नांसाठी त्यांनी गणिती प्रारूपे तयार करून, वापरता येतील अशी उत्तरे शोधली. तरी अध्यापन, संशोधन आणि प्रत्यक्ष उपयोजन करून त्यांनी प्रवर्तन संशोधन विषयाला पुढे नेण्यात अग्रेसर भूमिका बजावली.

गास यांचे १०० हून अधिक शोधलेख प्रसिद्ध झाले. त्यांची ग्रंथसंपदाही विपुल आहे. त्यातील मुख्य पाठ्यपुस्तके अशी आहेत: लिनियर प्रोग्रामिंग: डिसिजन मेकिंग; मॉडेल्स अँड अल्गोरिथम्स आणि ॲन इलस्ट्रेटेड गाइड टू लिनिअर प्रोग्रामिंग. त्यांनी २००५ साली ए. ए. अस्साद यांच्याबरोबर लिहिलेला प्रवर्तन संशोधन या विषयाचा इतिहास म्हणजेच, ॲनॲनोटेटेड टाईमलाइन ऑफ ऑपरेशन्स रिसर्च: ॲन इन्फॉर्मल हिस्ट्री  हे पुस्तक अतिशय वाखाणले गेले आहे. तसेच २०११ साली गास यांनी सहलेखन  केलेली किंवा संपादित केलेली प्रोफाईल्स इन ऑपरेशन्स रिसर्च: पायोनिअर्स अँड इनोव्हेटर्स ही पुस्तक-मालिकादेखील गाजली आहे. त्यांचे एक आणखी महत्त्वपूर्ण कार्य म्हणजे १९९६ मध्ये प्रवर्तन संशोधन आणि व्यवस्थापनविज्ञान या विषयाचा विश्वकोश सहसंपादित करणे हे होय. त्यांचे ए गाईड टू मॉडेल्स इन गव्हर्मेंटल प्लानिंग अँ ऑपरेशन्स हे पुस्तकही उपयुक्त मानले जाते.

गास १९७६ साली हे ऑपरेशन्स रिसर्च सोसायटी ऑफ अमेरिका या संस्थेचे अध्यक्ष निवडले गेले. प्रवर्तन संशोधनाचा वापर प्रभावीपणे समाजासाठी करण्याबद्दल त्यांना या सोसायटीचे अतिशय मानाचे किंबल पदक दिले गेले. ते इन्स्टिट्यूट फॉर ऑपरेशन्स रिसर्च अँड द मॅनेजमेंट सायन्सेसचे फेलो म्हणूनही निवडले गेले आणि या संस्थेने प्रवर्तन संशोधनाबाबत अप्रतिम लेखन करण्याबद्दल त्यांना विशेष पारितोषिक दिले. द मिलिटरी ऑपरेशन्स रिसर्च सोसायटी या संस्थेने लष्करी प्रवर्तन संशोधनात लक्षणीय योगदान केल्याबद्दल गास यांना जासिंटो स्टेनहार्डट पुरस्कार प्रदान केला.

प्रवर्तन संशोधनात मूलभूत भर घालण्यासोबत त्याचा लष्करी आणि मुलकी व्यवहारात लक्षणीय वापर करुन या विषयाचे महत्त्व सर्व स्तरांवर पटवून देण्याचे महत्त्वपूर्ण काम गास यांनी केले.

संदर्भ : 

समीक्षक : विवेक पाटकर