(स्थापना : १७ फेब्रुवारी १९५१). सेंट्रल ड्रग रिसर्च इन्स्टिट्यूट (संक्षिप्त – सीडीआरआय) ही संस्था भारत सरकारच्या विज्ञान आणि प्रौद्योगिकी मंत्रालयाच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक अनुसंधान परिषद (कौन्सिल फॉर सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च) या संस्थेच्या आधिपत्याखाली येते.
सीडीआरआयचे संकुल उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे आहे. १७ फेब्रुवारी १९५१ मध्ये भारताचे पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते सीडीआरआयची स्थापना करण्यात आली. आपल्या देशांत औषधशास्त्रामध्ये सर्वोच्च दर्जाचे संशोधन व्हावे, अद्ययावत तंत्रज्ञानाच्या मदतीने उत्तम गुणवत्ता असलेल्या औषधांची निर्मिती मोठ्या प्रमाणात व्हावी. किफायतशीर औषधे भारतीय जनतेला मिळावी असा संस्था निर्माण करण्यामागील हेतू होता.
सीडीआरआयमध्ये एकाच छताखाली नव्या औषधी रेणूंवरील संशोधन, संश्लेषण आणि औषधाच्या रासायनिक चाचण्या होतात. चाचण्यानंतर प्रायोगिक प्राण्यांवर औषधाच्या चाचण्या घेतल्या जातात. अन्न आणि औषध प्रशासन विभागाने शिफारस केलेल्या सर्व आवश्यक अशा वैद्यकीय चाचण्या, परीक्षणे समाधानकारक रीत्या पूर्ण झाल्यावरच ती औषधे रुग्णांसाठी वितरित केली जातात. औषधे इस्पितळांत वापरायची असतील तर ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया यांच्याकडून आवश्यक परवानग्या मिळवाव्या लागतात. विविध पातळ्यांवरील ही सर्व कामे परदेशी चलन खर्च न करता, पूर्ण गोपनीयता राखून, भारतातच सीडीआरआय या संस्थेत होऊ शकतात. औषधांशी संबंधित संशोधन आणि आता औषधांची निर्मिती या क्षेत्रात सीडीआरआय भारतातच नाही तर जागतिक स्तरावरही एक अग्रगण्य संस्था गणली जाते.
सीडीआरआयने बारा पूर्णत: नव्या औषधी रेणूंचे संश्लेषण केले आहे. त्यांपैकी काही औषधे, भारतीय आणि अन्य अनेक देशांतील ग्राहकांनाही बाजारात उपलब्ध आहेत. सीडीआरआयमध्ये एक हजारावर विद्यार्थ्यांना पीएच.डी. मिळाली आहे. सीडीआरआय संस्थेमधील संशोधकांनी प्रतिष्ठित नियतकालिकांत दहा हजारावर शोधनिबंध प्रकाशित केले आहेत. तसेच १३० प्रकारचे नवतंत्रज्ञान भारतीय औषध उद्योगांना देऊन त्यांचा कायापालट करून त्यांना समृद्ध बनवणे सीडीआरआयला शक्य झाले आहे. उदा., कोरोना विरोधी औषध – उमिफेनोवीर, गोव्यातील एका कंपनीला कोविड-१९ वर मात करण्याचे तंत्रज्ञान औषध उत्पादन करण्यासाठी दिले गेले आहे. याशिवाय औषधांसंबंधी ३५० भारतीय एकस्वे (पेटंट) आणि ९० आंतरराष्ट्रीय एकस्वे सीडीआरआयला प्राप्त झाली आहेत.
सीडीआरआय संस्थेमधून शिक्षण घेतलेले अनेक माजी विद्यार्थी आज भारतात आणि जगभरातील प्रख्यात विद्यापीठांत, जैवतंत्रज्ञान आणि औषधनिर्मिती उद्योगक्षेत्रात, नियोजन मंडळात आणि अन्य धोरणात्मक निर्णय घेणाऱ्या संस्था, समित्यांवर उच्च पदांवर कार्यरत असून संशोधन क्षेत्रात आपले योगदान देत आहेत.
सीडीआरआयकडे स्वतःची एक विशेष प्रयोगशाळा आहे. त्यात सर्व अटी पाळून उंदीर, माकडे अशा प्राण्यांवर आवश्यक ते प्रयोग केले जातात आणि शेवटी माणसांच्या दृष्टीने नवी औषधे सुरक्षित आहेत याची पडताळणी केली जाते.
रियुनियन : सीडीआरआयमधील संशोधकांनी शिसवीच्या पानांपासून अर्क मिळवून रियुनियन नावाचे औषध बाजारात आणले. तडे गेलेली, भंगलेली हाडे जुळण्यास हातभार लावणाऱ्या या औषधाला दिलेले ‘रियुनियन’ हे नाव अर्थपूर्ण आणि समर्पक आहे.
भारतात शिसवीचा भंगलेली हाडे जुळवण्यासाठीचा उपयोग पारंपरिक माहितीचा भाग असला, तरी प्रमाणिकृत मात्रेत, सर्वदूर सहज मिळेल अशा औषधाची निर्मितीचे कार्य सीडीआरआयने केले. त्याचा उपयोग हाडे मोडल्यावर, त्यांना तडा गेल्यावर होणाऱ्या अंतर्गत जखमा लवकर भरून येण्यासाठी होतो. प्रौढ महिलांमध्ये मासिक पाळी थांबल्यानंतर अस्थिभंगाचे प्रमाण वाढते. वृद्ध पुरुष, किशोरवयीन मैदानी खेळात धडपडणारी मुले यांच्यातही अस्थिभंगाची शक्यता जास्त असते. अशा व्यक्तींना भंगलेल्या अस्थी जुळायला मदत करून अंथरुणात जास्त काळ सक्तीची विश्रांती घ्यायचा कालावधी रियुनियन या औषधाने कमी केला आहे.
ई-माल : हे प्रमस्तिष्क हिवताप (सेरेब्रल मलेरिया) या आजारावरील जीवरक्षक औषध सीडीआरआय संस्थेने तयार केले आहे. ते मेंदूवर अनिष्ट परिणाम करणारा गंभीर आणि जीवघेणा हिवताप बरा करू शकते. दवणा या वनस्पतीपासून मिळवलेली रसायने वापरून या औषधाची निर्मिती करण्यात आली आहे. ते माणसांवर वापरणे सुरक्षित आहे, याची खात्री करून घेण्यात आली आहे. ई-माल या औषधाचा वापर करून सेरेब्रल मलेरियाकारक प्लाझ्मोडियम फॉल्सिपॅरम हा सूक्ष्मजीव मारला जाऊन बाधित व्यक्तीवर त्या औषधाचे विषारी परिणाम होता कामा नयेत. अशा प्रकारची काळजी घेऊन आणि अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या संमतीनेच सीडीआरआयने ई-माल हे औषध विक्रीसाठी रुग्णांना उपलब्ध करुन दिले आहे. ते स्नायूंमध्ये अंत:क्षेपित करण्याचे औषध असल्यामुळे लवकर परिणाम दाखवते. विशेषत: क्विनीन ज्या बाधित व्यक्तीला लागू पडत नाही वा त्याचे सहपरिणाम ज्यांना सहन होत नाहीत अशा रुग्णांना ई-माल लाभदायक ठरते. तसेच ज्या रुग्णांत क्लोरोक्वीन या औषधाचा अपेक्षित परिणाम दिसत नाही, त्यांना ई-माल देऊन वैद्यकीय तज्ञ रक्तातील लाल पेशींमधील सेरेब्रल मलेरियाकारक सूक्ष्मजीव नष्ट करतात .
कीन माइंड मेमरी प्लस : हे सीडीआरआयने निर्मिती केलेले आणखी एक औषध आहे. त्याची ऑस्ट्रेलियातील एका खासगी कंपनीमार्फत वितरण आणि विक्रीची व्यवस्था केली आहे. ब्राह्मी या वनस्पतीपासून बनवलेल्या या औषधाचा स्मृतिक्षमता वाढवण्यासाठी आणि एकाग्रता वाढवण्यासाठी उपयोग होतो. विचार करण्याच्या प्रक्रियेत स्पष्टता यावी म्हणून कीन माइंड हे ब्राह्मीच्या अर्काचे रसायन मिश्रण म्हणून वापरतात. ब्राह्मीचा औषधी उपयोग गेली किमान ३००० वर्षे भारतीयांना आयुर्वेदातून परिचित असला तरी एकस्व अधिकार घेऊन सीडीआरआयने औषध बनवणे मोलाचे ठरले आहे.
सहेली औषध परीक्षण : माणसांत उपयोग करण्याआधी उंदीर, कुत्रे, माकडे अशा प्राण्यांवर ‘सहेली’ नावाचे संततिरोधक औषध सुरक्षित आहे हे पडताळून पाहिले आहे. हे स्त्रियांनी तोंडावाटे घेण्याचे हे संततिरोधक औषध आहे. त्यात स्टेरॉइड रसायने नसल्याने मळमळणे, डोके दुखणे, वजन वाढणे, उलट्या होणे, रक्तातील रक्तबिंबिकांची (प्लेटलेट्सची) संख्या घटणे यासारखे दुष्परिणाम जाणवत नाहीत. शिवाय सीडीआरआयच्या ‘सहेली’चा स्तनांचा कर्करोग होऊ नये, स्त्रियांमध्ये हाडे ठिसूळ होऊ नयेत, हृदय विकार होऊ नये यासाठीही उपयोग होतो. सीडीआरआयतर्फे तयार झालेले हे उत्पादन १९८० मध्ये गिऱ्हाईकांच्या हातात पोहोचले. शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्रांवर ते विनामूल्य मिळत असे. आता त्यापेक्षाही प्रभावी औषधे मिळू लागली आहेत. त्यामुळे २०१६-१७ पासून ते अनुपलब्ध झाले आहे.
भारतापुढील आरोग्य विषयक नव्या आव्हानांना समर्थपणे तोंड देण्यासाठी सीडीआरआयकडून आता नव्या अपेक्षा केल्या जात आहेत. देशाला भेडसावणाऱ्या, आरोग्याला हानी पोहोचवणाऱ्या ठरावीक रोगांवर लक्ष केंद्रित करणे, त्यांचे कारक शोधणे, त्यासाठीच्या चाचण्या सिद्ध करणे, त्यांवरील औषधांच्या निर्मितीला प्राधान्य देणे सीडीआरआयकडून व्हावे असे अपेक्षित आहे.
विविध रोगांवर उपचार करण्याच्या दृष्टीने भारतीय वनस्पती आणि प्राणी यांतील उपयुक्त रसायनांचा शोध घेणे, वनस्पतिज व प्राणिज रसायने शुद्ध स्वरूपात मिळवून त्यांपासून प्रभावी औषधी तयार करणे, औषधनिर्मिती उद्योगामधील केंद्रीय मंच म्हणून विविध घटकांत समन्वय साधणे ही काही मूलभूत उद्दिष्टे साधण्यासाठी संस्था कार्यरत आहे. ही उद्दिष्टे साधण्यासाठी लागणारी साधनसामग्री जुळवून तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ मनुष्यबळ – विषाणुशास्त्रज्ञ, विषशास्त्रज्ञ, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, औषधिरसायन तज्ज्ञ, माणसांचे आणि पशूंचे वैद्यकीय तज्ज्ञ, सार्वजनिक आरोग्य-साथींचे विकार तज्ज्ञ –यांना एकत्र आणणे आणि विकसित करणे आवश्यक ठरते.
भारत सरकारने सीडीआरआयला देशाच्या गरजा लक्षात घेऊन ठरावीक रोगांना प्राथमिकता देण्यास सुचविले आहे. भारताने ज्यांवर लक्ष एकवटले पाहिजे असे मुख्य रोग आहेत–मलेरिया, लेश्मानियासीस, हत्तीरोग, क्षयरोग, अस्थिविकार, आरामदायी-शारीरिक कष्टविहीन जीवनशैलीतून उद्भवणारे विकार, वृद्धत्वातून होणारे, वाढणारे विकार, रोग, दुर्बलता आणि अधिकाधिक लोकसंख्येला ग्रासणारा कर्करोग.
पारंपरिक वनस्पतींमधील औषधी द्रव्ये आणि त्यांचा मानवी शरीरावर होणारा परिणाम अभ्यासून प्रभावी औषधे उपलब्ध करून देण्याचे सीडीआरआय संस्थेला शासनाने सांगितले आहे. त्यासाठी या रोगांचा व विकारांचा सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे. त्यातून विकसित होणारी औषध उपाययोजना भारतीय जनसामान्यांना परवडेल अशी असावी, याबाबतही संस्थेने जागरूक राहणे अपेक्षित आहे.
भारतात लेइश्मानियासीस हा विशेष माहीत नसणारा रोग वाळूमाश्यांमुळे (सँडफ्लाय) पसरतो. लेइश्मानिया प्रजातीच्या एकपेशीय सूक्ष्मजीवांमुळे लेश्मानियासीस होतो. त्यातील एका प्रकारात कातडीवर काळे फोड येतात म्हणून या रोगाला ‘काळा आजार’ असे नावही आहे. ‘डमडम (कोलकात्यातील भाग) फिवर’ असेही नाव या रोगाला आहे. बिहार, झारखंड, बंगाल, उत्तर प्रदेश या राज्यांत याचे रोगी मोठ्या प्रमाणात आणि गुजरात, आसाम, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, केरळ, तामिळनाडू या राज्यांत तुरळक प्रमाणात आढळतात.
मलेरिया, लेश्मानियासीस, हत्तीरोग या रोगांचे कारक–अनुक्रमे एकपेशीय, एकपेशीय आणि बहुपेशीय गोलकृमी-परजीवींना मारक ठरतील अशी रसायने चाचण्या घेऊन भविष्यात प्रभावी औषध म्हणून वापरता येतील का हे सीडीआरआय तपासत आहे. सीएसआयआर या मातृसंस्थेच्या मदतीने सीडीआरआयने डेंग्यू, मेंदूज्वर, चिकुणगुन्या, झिका, सार्स-कोव्ह-२ अशा विषाणूंविरोधी मोहिम उघडली. विषाणूंची रासायनिक रचना, पृष्ठभाग रचना, त्यांच्याविरुद्ध प्रतिक्षमता कशी निर्मिता येईल, लस निर्मिती कशी करता येईल याचा अभ्यास सीडीआरआयमध्ये होत आहे. हल्लीच सीडीआरआयमध्ये एक लाख कोरोना संक्रमित संशयितांच्या आरटी-पीसीआर चाचण्या घेतल्या गेल्या. यावरून सीडीआरआय किती मोठ्या संख्येतील नमुने तपासू शकते हे दिसते. या खेरीज फारशी साधनसामग्री नसणाऱ्या अन्य प्रयोगशाळांकडून सीडीआरआयकडे तपासण्यासाठी वनस्पती अर्क येत असतात. अशा नमुन्यांत असणारी औषधी द्रव्ये सीडीआरआय वेगळी करते. काही प्रक्रिया करून प्रभावी औषध म्हणून ती विक्रीसाठी फायदेशीरपणे बाजारात आणता येतील का हे कामही सीडीआरआय स्वतःकडील आधुनिक यंत्रणा वापरून करून देते.
मोठ्या आतड्याचा उपांत्य भाग, कोलॉन वाढत्या वृद्ध लोकसंख्येबरोबर कर्करोग ग्रस्त होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यावर योग्य औषध सीडीआरआय शोधत आहे. सीडीआरआय भारत देशाला ‘जागतिक औषधालय’ म्हणून मान्यता मिळवून देण्यात मोलाची मदत करेल, अशी आशा आहे.
कळीचे शब्द : #औषधिशास्त्र #औषधनिर्मितीसंस्था
संदर्भ :
- https://cdri.res.in/
- https://cdri.res.in/BoneHealth_CDRI.aspx
- https://cdri.res.in/CVS_CNS_CDRI.aspx
- https://cdri.res.in/Neuroscience-AgeingBiology_CDRI.aspx
- https://cdri.res.in/CancerBiology_new.aspx
समीक्षक : मोहन मद्वाण्णा