(स्थापना : १९९९). (एनईआरसीआय). नान्सेन इन्व्हायरन्मेंट रिसर्च सेंटर अर्थात नर्सी असे या संस्थेचे नाव नोबेल पारितोषिक विजेते नॉर्वेजियन समन्वेषक, प्राणिवैज्ञानिक, मुत्सद्दी संशोधक फ्रित्यॉफ नान्सेन (Fridtjof Nansen) यांच्या नावाने नॉर्वे देशात ठेवण्यात आले आहे. नर्सी ही संस्था नॉर्वे-भारत संयुक्त सहकार्याने कोची–केरळ येथे साकारली. नर्सी ही संस्था समूह संघ संस्था आहे. यातील प्रमुख संस्था नान्सेन इन्व्हायरन्मेंटल रिसर्च सेंटर तसेच नान्सेन सायंटिफिक सोसायटी ही नैऋत्य नॉर्वेमधील बर्जेन शहरात आहे. त्याचबरोबर नान्सेन इन्व्हायरन्मेंटल अँड रिमोट सेन्सिंग सेंटर (NERSC) संस्था सुद्धा नॉर्वेमधील बर्जेन शहरात आहे.
भारतातील हैदराबाद येथील इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फर्मेशन सर्व्हिसेस अर्थात भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (इंकॉइस; INCOIS- Indian National Centre for Ocean Information Services) आणि नान्सेन रिसर्च सेंटर आणि संघ यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. इंकॉइस हे भारत सरकारच्या पृथ्वी मंत्रालयाशी जोडलेली स्वायत्त संस्था आहे.
कोचीन युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलोजी (कुसॅट; CUSAT), सेन्ट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट (CMFRI), केरळ युनिव्हर्सिटी ऑफ फिशरीज अँड ओशन स्टडीज (KUFOS) या अन्य काही संस्थाही नर्सीशी कामाच्या दृष्टीने निकट संबंध असलेल्या आहेत.
नर्सी या संस्थेत उपग्रहांच्या मदतीने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याने दूरस्थ संवेदनेने विदा (डेटा) मिळविणे हे काम केले जाते. दूरस्थ संवेदन हे अचूक आणि प्रभावी तंत्रज्ञान आहे. त्याद्वारे मिळविलेल्या माहितीचे संकलन, तसेच सांख्यिकी विश्लेषण करून माहितीची पुनर्रचना करून, तिची विश्वसनीयता वाढवून, विविध सुट्या घटकांचा एकत्रित विचार करून नर्सीतील तज्ज्ञ तिचा अर्थ लावतात. हवामानाच्या अंदाजाची, सागर प्रवाहाची काही प्रारुपे मांडता येतात का याचा विचार होतो या संस्थेत होतो.
नर्सी संस्थेच्या प्रकल्पांमुळे नॉर्वे आणि भारत यांच्या खेरीज नेदर्लंड्स, फ्रान्स, ब्रिटन, इटली, स्वीडन, बेल्जियम या देशांतील केंद्रीय, राज्य सरकारी आस्थापने यांच्यातील सहकार्य वाढले आहे. नॉर्वेतील नान्सेन इन्व्हायरन्मेंट अँड रिमोट सेन्सिग सेंटर (NERSC), भारतातील इंकॉइस, फ्रान्समधील फ्रेंच नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ओशन सायन्स अँड टेक्नॉलॉजी (इफ्रेमेर; IFREMER), ब्रिटनमधील प्लायमाउथ मरीन लॅबोरेटरी, इटालीतील – यूरोमेडीटेरॅरियन सेंटर ऑन क्लायमेट चेंज (CMCC) आणि नेदर्लंड्स मधील अल्टेरा (ALTÉRRA) या आंतरराष्ट्रीय संस्था नान्सेन संशोधन संस्था संघाच्या सहकारी आहेत.
इफ्रेमेरच्या तीन महासागरांत विस्तार असलेल्या पाच केंद्रातून जगभरच्या सव्वीस सागरी संपत्ती संशोधन क्षेत्रांच्या कामात सुसूत्रता आणली जाते. इफ्रेमेरच्या पटावर दीड हजारावर कर्मचारी आहेत – ज्यापैकी सहाशे उच्च शिक्षित तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ आहेत. तसेच एक पाणबुडी आणि अकरा नौका इफ्रेमेरच्या सेवेत आहेत. समुद्रतळाशी कोणते पर्वत आणि त्यांच्या रांगा आहेत. तेथे कोणते ज्वालामुखी आहेत, उद्रेक होऊ शकेल असे किती, उद्रेकामुळे काय उत्पात होऊ शकतील. सागरतळाशी भूकंपामुळे काय हालचाली होतात, अतिशय खोल सागरात कोणते जीव राहतात. त्यांचे पोषण कसे होते इ. विषय अभ्यासले जातात. अवकाशशास्त्रज्ञ आणि संगणक विदातज्ज्ञ यांचा चमू कार्यरत आहे असा ‘संपूर्ण जगासाठी एकच समुद्र’हा प्रकल्प इफ्रेमेरने २०२१ मध्ये कार्यान्वित केला आहे. भारताला लागून असणारे बांगलादेश आणि श्रीलंका हे दोन देश तसेच जवळचा आफ्रिका खंड यांच्याबरोबर नर्सीची सतत माहिती आणि विद्यार्थी यांची देवाण घेवाण चालू असते.
पर्यावरणाच्या विविध पैलूंवर होणारे काम लोकांपुढे आणणे, महासागरांबद्दलचे पर्यावरणासंबंधित ज्ञान लोकांपर्यंत पोचवणे. कोळ्यांसारख्या सागराशी एकरूप झालेल्या मानवसमूहांकडील परंपरागत माहिती जमविणे असे उपक्रम ही संस्था करते. नर्सी आणि अन्य उपग्रह सुविधांमुळे बंगालच्या उपसागराचे तापमान प्रदूषणामुळे १९७९ पासून सतत थोडे थोडे वाढत आहे हे स्पष्ट झाले आहे. हिंदी महासागराची प्राथमिक उत्पादकता किती याचा उपग्रहातून केलेला अभ्यास, समुद्रसफरीत जमवलेले नमुने अशा घटकांचा विचार करून नर्सी पुढील मार्गक्रमण ठरवित आहेत.
समुद्राच्या पातळीत वाढ, समुद्राच्या पाण्याचे गुणधर्म बदलणे, समुद्रकिनाऱ्याची झीज, त्यातून होऊ शकणारी हानी जाणून घेणे, अशी हानी टाळणे, पूर्ण घालावता येत नसेल तर ती कमी करणे हे काम नर्सी जबाबदारीने करते. समुद्राच्या पातळीत होऊ घातलेली वाढ हा सागरतीरी असलेल्या केरळ राज्याला, केरळच्या अर्थकारणाला आणि केरळमध्ये वसलेल्या नर्सीला थेट फार मोठा धोका वाटणे साहजिक आहे. शैवालांची अतिरिक्त प्रचंड वाढ, मासे आणि कोळंबीच्या महासमूहांच्या समुद्रातील हालचाली, समुद्रपृष्ठालगत हरितद्रव्य-ए च्या प्रमाणावरून ऑक्सिजन आणि कर्बोदक निर्मितीचा अंदाज घेणे असे नर्सीचे कितीतरी प्रकल्प शेवटी सागरी सजीवांच्या उत्पादकतेशी निगडीत आहेत.
भारतीय विद्यार्थी आणि संशोधकांसाठी सागरी नर्सीला वैज्ञानिक सुविधा उपलब्ध करून देऊन यूरोप आणि भारतीय उपखंडातील सागरी आणि वातावरणीय संशोधनात एकसूत्रता आणली. सुरुवातीला केरळ या एका विस्तृत समुद्र किनारा लाभलेल्या राज्यात वातावरणीय बदलांचा मॉन्सूनवर कसा आणि कोणता परिणाम होतो याचा अभ्यास करण्यात आला. २०२० मध्ये सुरू केलेल्या नर्सीच्या ‘कम्फर्ट’ (COMFORT) या प्रकल्पात भारतासह एकूण वीस देशांतील बत्तीस संशोधक सदस्यांचा कार्बन, ऑक्सिजन आणि नायट्रोजनयुक्त पोषकद्रव्ये यांच्या आंतरक्रियांचा अभ्यास सुरू झाला. नर्सीच्या काही विद्यार्थांनी स्टडी ऑफ हार्मफुल आल्गल ब्लूम्स अँड अदर आस्पेक्टस् ऑफ सार्डीन हॅबिटॅट (शाबाशी; SHABASHI) नावाचा प्रकल्प केला. नर्सीच्या प्रकल्पांतून संपूर्ण मानव जातीसाठी भविष्यात समुद्र कसा सुरक्षित ठेवता येईल याचे मार्गदर्शन त्यातून होईल अशी अपेक्षा आहे.
भारतासाठी मोसमी पाउस (मॉन्सून) अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यासाठी लागणारे मनुष्यबळ प्रशिक्षित करणे, प्रयोगशाळा, यंत्रे, उपकरणे इ. पुरवणे. या प्रयत्नांतून मिळालेले ज्ञान शोधनिबंधरूपात प्रकाशित करणे, संशोधनासाठी आवश्यक सोयी-सुविधा निर्माण करणे, त्यांच्या वापरातून मिळालेले ज्ञान, मासेमारी करणाऱ्या, मच्छिमारीची जाळी बांधणाऱ्या, मासे साठवणाऱ्या लोकांपर्यंत प्रसारित करणे, माहिती प्रसारित झाल्यामुळे राज्याला काही आर्थिक, सामाजिक फायदे झाले का आणि किती प्रमाणात हे पाहणे, अशा प्रयत्नांचा लाभ मिळाला असेल तर अन्य राज्ये, देश यांच्यापर्यंत तो पोहचविण्यासाठी प्रकल्प आखणी करणे असे परस्पर सहकार्याचे जाळे तयार करण्याच्या उपक्रमांमध्ये नर्सी आणि नान्सेन इन्व्हायरन्मेंट रिसर्च सेंटर सहभागी आहेत.
सन २०२२ या वर्षअखेर एक आंतरराष्ट्रीय विद्वत् सभा कोचीमध्ये आयोजित केली होती. संपूर्ण दक्षिण आशियातील मोठ्या शहरांना अखंड वीज पुरविता यावी यासाठी पठडीबाहेरचा विचार कसा करता येईल आणि घरे, कार्यालये उद्योग-धंद्याच्या वाढत्या गरजा, पर्यावरणाची हानी न होऊ देता कशा पुरवाव्या याचा ऊहापोह त्यात झाला. नान्सेन इन्व्हायरन्मेंट रिसर्च सेंटर आणि संलग्न संस्थांच्या प्रकल्पांमुळे फार मोठ्या प्रमाणात एकत्र आलेल्या तज्ज्ञांच्या हुशारीचा, अनुभवांचा लाभ या देशांतील पर्यावरण, शिक्षण, सागरी विज्ञानाचा प्रसार, मासेमारी आणि समुद्री उत्पादनांची निर्यात अशा गोष्टीत होत आहे.
कळीचे शब्द : #भौगोलिक #पर्यावरण #हवामान #महासागर #परिसंस्था #उपग्रह
संदर्भ :
- http://www.nerci.in/strategy.html
- https://incois.gov.in/ITCOocean/iocslv.jsp
- https://cusat.ac.in/
- http://www.alterra.wur.nl
- http://www.pml.ac.uk/
- https://www.cmcc.it/
समीक्षक : मोहन मद्वाण्णा