मैथिली साहित्य (प्राचीन ) : मैथिली ही भारतीय-आर्य भाषासमूहाची आहे आणि ती सुमारे एक वर्षांपासून प्रचलित आहे. ती ब्राह्मणग्रंथांमध्ये निर्दिष्ट ‘प्राच्य’ भाषासमूहांपैकी एक आहे. मैथिलीला ‘अवहठ्ठ’, ‘मिथिला अपभ्रंश’ अशा विविध संज्ञांनी ओळखले जाते. जॉर्ज ग्रियर्सन यांनी ‘मैथिली’ हे नाव प्रचलित केले आहे. मैथिली दरभंगा, मधुबनी, समस्तीपूर, मुजफ्फरपूर, वैशाली, कटिहार, सहरसा, सीतामढी, पूर्णिया आणि खगरिया जिल्ह्यांमध्ये आणि मुंगेरच्या काही भागांमध्ये बोलली जाते. नेपाळमधील तराई प्रदेशातील काही भागांमध्येही ती बोलली जाते.
मागधी अपभ्रंशातून मैथिली विकास पावली असल्याने तिचा इतिहास प्राचीन भारतीय आर्य तसेच मध्ययुगीन भारतीय आर्य भाषांसोबत जोडलेला आहे असे दिसते. इ. स. १३०० पर्यंत मैथिलीने पूर्ण विकास प्राप्त केला असल्याचे ज्योतिरिश्वर ठाकुर (१२८० -१३४० ) यांच्या ‘वर्णरत्नाकर’ ग्रंथातून प्रतीत होते. एस. के. चॅटरजी आणि उमेश मिश्र यांसारख्या भाषाविदांनी मैथिलीचे आगळे महत्त्व मान्य केले आणि मागधी भाषांच्या विकासात तिचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे मान्य केले. मैथिलीला बंगाली आणि हिंदीची बोली म्हणून ओळखण्याचे प्रयत्न जरूर झाले आहेत; परंतु कोलब्रुक, विल्यम केरी, ग्रियर्सन आणि एस. के. चॅटरजी यांसारख्या भाषाविदांनी ती एक स्वतंत्र भाषा असल्याचे दाखवले आहे.
प्राचीन मैथिली साहित्य
प्राचीन मैथिली साहित्यात काव्य, गद्य, नाट्य, आणि धार्मिक साहित्य यांचा समावेश आहे. धार्मिक साहित्यामध्ये बौद्ध आणि तांत्रिक हस्तलिखितांचा मोठा भाग आहे. ज्योतिरीश्वर ठाकुर यांच्या ‘धूर्तसमागम’ या रचनांनी मैथिली नाट्यकलेला ‘कीर्तनिया’ प्रकारचे नवे स्वरूप दिले. मध्यभारतीय आर्य भाषेच्या अंतिम आणि नव्या भारतीय आर्य भाषेच्या प्रारंभिक टप्प्यांदरम्यान उपलब्ध ‘बौद्ध गान ओ दोहा’ ग्रंथ मैथिलीच्या स्वरूपाच्या अभ्यासासाठी मौल्यवान सामग्री आहे. राहुल सांस्कृत्यायन, काशीप्रसाद जयस्वाल, सुभद्र झा आणि इतर विद्वानांनी या गाण्यांना मैथिलीचे नमुने म्हणून ओळखले. या प्रकारे वरील ग्रंथ प्रादेशिक वैशिष्ट्ये असलेल्या प्राचीन मैथिली ग्रंथ म्हणून मान्यता पावला. उत्तर भारताच्या आधुनिक भारतीय आर्य भाषांमध्ये स्थान मिळवणारा ‘वर्णरत्नाकर’ ग्रंथ हा सर्वात जुना मैथिली गद्याचा नमुना आहे.
विद्यापती (१३६०-१४४८ ) यांसारख्या कवीच्या आगमनाने मैथिलीला नवीन जीवन मिळाले. विद्यापतींच्या पदांनी बंगाली आणि मैथिलीच्या मिश्रणरूप ‘ब्रह्मबुली’ नावाची एक विशेष काव्यभाषा निर्माण केली, ज्यात नंतर सुमारे चार शतकांपर्यंत वैष्णव-भक्तीची रचना होऊ लागली. मैथिलीला उत्तर भारतात तसेच नेपाळ आणि आसाममधील अनेक स्थानिक कवींच्या काव्यात्मक तसेच नाट्यात्मक रचनांमुळे पोषण व संवर्धन मिळाले.
मैथिली साहित्याची मुळे नवव्या किंवा दहाव्या शतकापर्यंत पोहोचतात. ‘सिद्ध’ नावाने ओळखले जाणारे बौद्ध भिक्षू आध्यात्मिक श्रृंगाराने भरलेली गीते गाऊन त्यांचा गूढ मार्ग सर्वांना शिकवायचे. त्या गीतांमध्ये तसेच कवी डाक (बारावे शतक) यांच्या रचनांमध्ये मैथिलीचे नमुने आढळतात. कर्णाट वंशाच्या (1097–1324) शासनकाळात मिथिला स्वतंत्र राज्य म्हणून अस्तित्वात आल्याने तिच्या साहित्याच्या विकासाला वेग आला. ज्योतिरिश्वर ठाकुरांचा ‘वर्णरत्नाकर’ ग्रंथ मैथिली साहित्याच्या विकासाचा मजबूत संकेत देतो. या ठाकुरांनी विद्यापती यांच्या कवी-प्रतिभेला फुलवण्यात मदत केल्याचे सांगितले जाते.
मैथिलीला एकेकाळी ‘तिरहूत’ नावाची तिची खास लिपी होती. तिबेट, नेपाळ आणि मिथिलामध्ये या तिरहूत लिपीत लिहिलेल्या अनेक बौद्ध आणि तांत्रिक हस्तलिखिते आहेत. तथापि, आता मैथिलीने देवनागरी लिपी स्वीकारली आहे. ग्रियर्सन यांच्या मते मैथिलीला तिच्या स्थानिक भेदांच्या आधारे सहा विभागात विभागले जाऊ शकते. तरीही, मान्य मैथिली भाषा उच्च वर्गात सर्वत्र बोलली जाते. या मैथिलीमध्ये असे माधुर्य, अशी चमक आणि नजाकत आहे की तिला ‘पूर्वेची इटालियन’ असेही संबोधले गेले आहे.
मैथिलीसारख्या जिवंत भाषेवर बाहेरील विविध भाषांचा प्रभाव पडणे स्वाभाविक आहे. द्रविड, संस्कृत, संथाल, तुर्की, अरबी-फारसी, पोर्तुगीज अशा भाषांचे शब्दही मैथिलीमध्ये आढळतात. भारतीय भाषांचा तसेच इंग्रजीचा प्रभाव मैथिलीवर मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. व्याकरणाच्या बाबतीत प्राचीन मैथिली संस्कृतचे अनुसरण करत होती; परंतु इंग्रजीच्या संपर्कात आल्यावर मैथिलीच्या वाक्यरचनेवर त्याचा परिणाम झाल्याचे दिसून येते.
संदर्भ : https://ijsrst.com/paper/7259.pdf