(स्थापना : नोव्हेंबर १९९३). चेन्नई येथे स्थापन झालेली राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्था ही भारत सरकारच्या महासागर विकास विभागाच्या अखत्यारीत होती. जुलै २००६ पासून ती भारत सरकारच्या नव्याने स्थापन झालेल्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीतील एक स्वायत्त संस्था झाली.

संस्थेची प्रमुख उद्दिष्टे : (१) महासागर अभियांत्रिकी व महासागर संसाधन यांच्या विविध शाखांमध्ये जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानाची निर्मिती करणे व विकास करणे. (२) भारताच्या विशेष आर्थिक क्षेत्रातील सागरी जैविक व अजैविक संसाधनांसंबंधीच्या अभियांत्रिकी समस्यांचे निराकरण करणे. (३) सागरी संसाधन आणि पर्यावरण व्यवस्थापनासाठी भारतात क्षमता निर्मितीसाठी पायाभूत सोयीसुविधा विकसित करणे. (४) सागर व महासागर विषयक कार्य करणाऱ्या संस्थांना स्पर्धात्मक व मूल्यवर्धित सेवा पुरविणे, समस्यांवर उपाययोजना सुचवणे इत्यादी.

संस्थेच्या कार्याची विभागणी पुढील तंत्रज्ञान गटांमध्ये केलेली आहे :

तटीय व पर्यावरणीय अभियांत्रिकी : महासागरांसंबंधी तटीय व पर्यावरणीय क्षेत्रात उपयुक्तताभिमुख तंत्रज्ञान विकसित करणे हे या गटाचे मुख्य ध्येय आहे. क्षेत्रीय निरीक्षणे, सांख्यिकी प्रारूपे व अभियांत्रिकीचा वापर करण्यातून तटीय व पर्यावरणीय अभियांत्रिकी कार्यक्रमांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाची निर्मिती व विकास केला जात आहे. हा गट संशोधन व औद्योगिक क्षेत्रातील प्रायोजित प्रकल्पांना ठरावीक काळासाठी फलनिष्पत्तीभिमुख तंत्रज्ञान पुरवतो.

उर्जा व गोडे पाणी :  अक्षय उर्जा व स्वच्छ गोडे पाणी यांच्या निर्मितीसाठी सागरी संसाधनांचा वापर करून पर्यायी तंत्रज्ञानाची निर्मिती व विकास करणे हे या गटाचे मुख्य ध्येय आहे. कमी तापमानातील औष्णिक अलवणीकरण किंवा विक्षारण (डिसॅलिनेशन) प्रक्रिया आणि सागरी औष्णिक तसेच सागरी लाटांपासून उर्जा निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या तंत्रज्ञानाची निर्मिती व विकास करणे यांवर हा गट सध्या काम करत आहे. याशिवाय या तंत्रज्ञानाचे हस्तांतरण औद्योगिक क्षेत्राबरोबरच्या भागीदारीद्वारे करण्याचेही काम केले जात आहे.

सागरी संवेदक प्रणाली : महासागरासंबंधित तंत्रज्ञानाची निर्मिती व विकास करणे आणि त्याचा प्रत्यक्षात वापर करणे या संस्थेच्या प्रमुख उद्दिष्टासाठी हा गट तयार करण्यात आला आहे. संस्थेच्या इतर गटांच्या तंत्रज्ञानासाठी लागणारी इलेक्ट्रॉनिक साधने पुरविणे, तसेच सागरी पाण्याखालील संवेदक प्रणालीच्या विविध प्रकारांची निर्मिती करणे हे कार्य हा गट करत असतो. पाण्याखालील संवेदक प्रणाली ही बहुतांशी ध्वनिशास्त्रावर आधारित आहे. पाण्याखालील विविध परिस्थितींमध्ये काम करणाऱ्या इलेक्ट्रॉनिक साधनांची निर्मिती हा गट करत आहे. औद्योगिक क्षेत्रात या प्रणालीचा उपयोग मोठ्या प्रमाणात होत आहे.

सागरी जैवतंत्रज्ञान : भारतातील बेटांवरील नैसर्गिक सागरी साधनसंपत्तीचा अभ्यास करणे, कृषी व पर्यटन क्षेत्रांत विकास करणे यासाठी १९८६ साली ‘बेट विकास प्राधिकरण’ याची निर्मिती झाली. बेटांवरील मानवी समूहाच्या सामाजिक व आर्थिक स्तरांवरील विकासाच्या कार्यांची अंमलबजावणी करण्यासाठी राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्थेची निवड करण्यात आली. प्राधिकरणाच्या सल्ल्यानुसार अंदमान, निकोबार, लक्षद्वीप बेटे आणि मन्नार आखातातील बेट समूह येथे सामाजिक व आर्थिक स्तरांवरील विकासासाठी महासागरासंबंधीत अनेक कामे केली जातात.

महासागर ध्वनिशास्त्र आणि प्रारूपे : पाण्याखालील कामे ही बहुतांश ध्वनिशास्त्रावर आधारित असतात. पाण्याखाली असलेल्या वातावरणातील आवाजाची मोजणी करणारी स्वयंचलित यंत्रणा या गटाने तयार केली आहे. या यंत्रणेचा उपयोग भारतातील महासागर व सागर यांच्या उथळ पाण्यातील ठरावीक काळानी घेतलेल्या आवाजाच्या मोजणींची मालिका तयार करण्यासाठी होत आहे.

महासागर इलेक्ट्रॉनिक्स : महासागर निरीक्षण प्रणालीची निर्मिती व विकास करणे हा या गटाचा मुख्य उद्देश आहे. या प्रणालीचा उपयोग महासागर व सागर यांच्या तळाच्या दाबाच्या नोंदी आणि पृष्ठभागावरील तरंगकांनी मिळवलेल्या निरीक्षणांचा नोंदक यांचा वापर त्सुनामीचा इशारा देण्यासाठी तसेच पाण्याखालील परिस्थितीच्या माहितीचा स्वयंचलित वाहक आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने निर्माण केलेल्या कृत्रिम उपग्रहांद्वारे मिळणाऱ्या माहिती संप्रेषणासाठीचे तंत्रज्ञान यांसाठी केला जातो.

किनाऱ्यावरील मार्गांची रचना : विक्षारण, खाणकाम, निरीक्षणांच्या नोंदी जमा करणारे तरंगक (डेटा बॉईज) यांसारख्या सागर किनाऱ्यापासून काही अंतरावरील अनेक कामांसाठी अत्यावश्यक असणाऱ्या यंत्रणांची निर्मिती करण्याची जबाबदारी हा गट पार पाडत आहे. यामध्ये खोल पाण्यातील लहान तरंगकांसाठी आणि मोठ्या जहाजांसाठी लागणारे नलिकामार्ग, जहाज नांगरण्याची जागा इत्यादींचा समावेश असतो.

तंत्रज्ञान प्रकल्प

खोल समुद्रातील खाणकाम : आर्थिक दृष्ट्या अतिशय मौल्यवान धातूंनी समृद्ध असणारे गोळे खोल समुद्रात असतात. या गोळ्यांमध्ये तांबे, कोबाल्ट, निकेल, मॅंगनिज हे धातू विपुल प्रमाणात असतात. सुमारे ३८० दशलक्ष टन वजनाचे गोळे भारतातील खोल समुद्रात उपलब्ध आहेत. अतिशय  प्रतिकूल वातावरणातील ४०००–५००० मीटर खोल असलेल्या समुद्राच्या तळातून हे गोळे बाहेर काढण्यासाठी विशिष्ट तंत्रज्ञान विकसित करण्याचे आव्हानात्मक काम राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्थेने केले आहे.

स्फटिक स्वरूपातील जल व वायू : उर्जा निर्मिती आणि किनाऱ्यावरील औद्योगिक क्षेत्रातील उपक्रम याबाबतची महासागराची प्रचंड प्रमाणात असणारी क्षमता लक्षात घेऊन त्यासाठीच्या विशेषतः स्फटिक स्वरूपातील जल व वायू यांच्या तंत्रज्ञानाचा शाश्वत विकास करणे हे या गटाचे प्रमुख कार्य आहे. हे स्फटिक म्हणजे नैसर्गिक वायू आणि पाणी यांचे एकत्रित झालेले मिश्रण असून ते बर्फासारखे दिसतात, पण ते ज्वालाग्रही असतात. यांच्यातील उर्जा ही सर्व प्रकारच्या खनिज इंधनाच्या दुप्पट क्षमतेची असते. ही स्फटिके हायड्रोकार्बनचा स्त्रोत असणारा मिथेन हा वायू मोठ्या प्रमाणात देतात.

खोल पाण्यात काम करणारी प्रणाली : सुदूरपणे कार्य करणाऱ्या खोल पाण्यातील बोटींची निर्मिती व विकास करण्याचे काम संस्था करते. हे काम भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या बहूधातूंच्या गोळ्यांचे व्यवस्थापन मंडळ आणि रशियातील मॉस्को महासागर अभियांत्रिकी प्रायोगिक आराखडा केंद्र यांच्या सहयोगाने केले जाते. खोल पाण्यात काम करणारी प्रणाली विविध कामे करणाऱ्या अवजारांनी व सुदूर यंत्रणांनी सज्ज असते. या प्रणालीचा उपयोग खोल समुद्रातील खाणकाम, समुद्राच्या तळाचे छायाचित्रण, जल व वायू यांचे स्फटिक मिळवणे, नलिकांचे मार्ग तयार करणे, पाण्याखाली तारांची जोडणी करणे, झऱ्यांचा शोध घेणे, इत्यादींसाठी होतो.

क्रियात्मक कार्यक्रम

महासागर निरीक्षण प्रणाली : महासागर निरीक्षण कार्यक्रम पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या ‘तरंगकांमार्फत मिळणाऱ्या निरीक्षणांचे जाळे’ या प्रणाली अंतर्गत राबवला जातो. या कार्यक्रमात समुद्र किनाऱ्यावरील तरंगकांच्या जाळ्याची निर्मिती करणे, ते कार्यरत करून त्याची देखभाल करणे व भारतीय समुद्रांवर दूरसंचारणाची सोय करणे ही प्रमुख कामे केली जातात. या कामात उपग्रहांचाही समावेश केला जातो.

जहाजांचे व्यवस्थान : जहाजांचे व्यवस्थापन कक्ष हा राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्थेचा एक क्रियात्मक विभाग आहे. ‘सागर निधी’, ‘सागर मंजुषा’, ‘सागर पूर्वी’, ‘सागर पश्चिमी’ आणि ‘सागर शक्ती’ ही महासागर संशोधनासाठीची जहाजे पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीतील महासागर विज्ञानासंबंधीचे कार्य करणाऱ्या संस्थाच्या संशोधनासाठी वापरली जातात. राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्थेचा जहाजांचे व्यवस्थापन कक्ष या जहाजांची देखभाल करून त्यांना कार्यरत ठेवत असतो. सागर किनाऱ्यांवरील प्रदूषणांचे सर्वेक्षण करणे, त्यांची निरीक्षणे घेणे व प्रदूषण नियंत्रणासाठी सर्वसमावेशक अभ्यास करणे या कार्यासाठीही या जहाजांचा उपयोग केला जातो. सागर शक्ती हे जहाज १ मेगावॅट महासागर औष्णिक ऊर्जा रूपांतरणाच्या यंत्रणेसाठी २००१ साली वापरले गेले. हा यशस्वी प्रयत्न जगात प्रथमच केला गेला.

डेटा पोर्टल : राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्था, भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती प्रणाली केंद्र आणि अमेरिकेतील राष्ट्रीय महासागर व वातावरण प्रशासनाची प्रशांत सागरीय पर्यावरण प्रयोगशाळा यांनी संयुक्तपणे एक डेटा पोर्टल सुरू केले आहे. या तीनही संस्थेच्या हिंदी महासागरातील तरंगकांमार्फत मिळणाऱ्या निरीक्षणांची माहिती या पोर्टलवर उपलब्ध असते.

समुद्रयान मिशन : संस्थेने ‘समुद्रयान मिशन’ या कार्यक्रमाअंतर्गत ‘मत्स्य’ ही देशी बनावटीची मानवासह ६००० मीटर खोल जाऊ शकणारी समुद्रातील पाणबुडी तयार केली आहे. मत्स्य पाणबुडीचे अनावरण ३० ऑगस्ट २०२१ रोजी करण्यात आले. त्यामध्ये तीन माणसांना घेऊन जाण्याची व्यवस्था केलेली आहे. या पाणबुडीचा उपयोग खोल समुद्रातील जैविक अधिवासाचा अभ्यास करण्यासाठी होईल.

हरित स्वयंऊर्जित व स्वयंचलित अलवणीकरण यंत्रणा : संस्था लक्षद्वीप बेटांवर पिण्याच्या गोडे पाण्यासाठी हरित स्वयंऊर्जित व स्वयंचलित अलवणीकरण यंत्रणा लवकरच कार्यान्वित करणार आहे.

कृत्रिम प्रवाळ बेटे : संस्थेने तीन प्रकाराची कृत्रिम प्रवाळ बेटे तयार केली आहेत. ही प्रवाळ बेटे उत्तर तामिळनाडूच्या किनाऱ्यावरील समुद्रात १० मीटर खोलीवर यशस्वीपणे कार्यरत आहेत.

त्सुनामी संबंधीची यंत्रणा : त्सुनामीच्या वेळी खोल समुद्रात निर्माण होणाऱ्या दाबाची नोंद करणाऱ्या यंत्रणेची निर्मिती करून ती चेन्नई येथे ‘सागर भूमी’ या वैज्ञानिक जहाजावर यशस्वीपणे कार्यरत करण्यात आली आहे.

शैक्षणिक कार्यक्रम : संस्था सागरकिनारा व पर्यावरण अभियांत्रिकी, ऊर्जा व गोडे पाणी निर्मिती, सागरी सुदूर प्रणाली, सागरी जैवतंत्रज्ञान, महासागर ध्वनिशास्त्र व त्यांचे प्रारूप, महासागर इलेक्ट्रॉनिक्स आणि महासागराची रचना इत्यादी विषयांवरील तांत्रिक शिक्षण देते. याशिवाय संस्था जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना महासागर तंत्रज्ञान याविषयी शिक्षण देते.

आंतर्वासिता किंवा प्रशिक्षुत्व : अभियांत्रिकी व तंत्रज्ञान यामधील पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना महासागर तंत्रज्ञानातील सर्व शाखांमध्ये आंतर्वासिता किंवा प्रशिक्षुत्व या अंतर्गतच्या प्रकल्पांसाठी विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या प्रशिक्षण व संशोधनाची व्यवस्था राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्था करते.

संस्थेच्या पेटंट्स व प्रकाशनांसंबंधीची आणि इतर माहिती https://www.niot.res.inया संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

कळीचे शब्द : #महासागर #अभियांत्रिकी #संसाधन #सागरी #शाश्वत

संदर्भ :

  • NIOT develops remotely operated boat to study oceans – Times of Deep water manned submersible developed by NIOT will be ready by 2024, The Hindu Businessline, 22 February 2022
  • Indigenous submersible vehicle Matsya 6000 will be ready as planned for Samudrayaan: NIOT Director, The Economics Times, 22 February 2022
    India”. The Times of India. Retrieved 8 April 2019
  • National Institute of Ocean Technology to set up green, self-powered desalination plant in Lakshadweep, The Hindu, March 16, 2023
  • Year End Review: Ministry of Earth Sciences, PIB Delhi,  26 December 2022

समीक्षक : मोहन मद्वाण्णा