सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट

Central Marine Fisheries Research Institute

स्थापना : ३ फेब्रुवारी १९४७

केंद्रिय सागरी मत्स्य संशोधन संस्था ही संस्था विषुववृत्तीय सागरी मत्स्य संशोधन संस्था म्हणून जागतिक स्तरावर प्रसिद्ध झाली आहे. भारताच्या सागरी किनाऱ्यावर असणाऱ्या सर्व राज्यांतील जवळपास १,००० मत्स्य प्रजातीं, संधिपाद प्राणी, शेवंडे, कालवे, तिसऱ्या, कंटकचर्मी, समुद्र साप, कासवे व सागरी सस्तन प्राणी यांची माहिती सागरी मत्स्य संशोधन संस्थेने उपलब्ध करून दिली आहे.

ब्रिटिश राजवटीत केंद्रीय सागरी मत्स्य संशोधन संस्थेची स्थापना झाली (१९४७). स्वतंत्र भारतात मत्स्यसंशोधन संस्थेचे कामकाज, कृषि व शेती मंत्रालयाच्या अखत्यारीत सुरू झाले. भारतीय कृषि अनुसंधान परिषद (इंडियन कौन्सिल ऑफ अॅग्रिकल्चरल रिसर्च; ICAR) या संस्थेच्या व्यवस्थापनात मत्स्यसंशोधन संस्थेचा समावेश झाला (१९६७). गेल्या ६९ वर्षात ही संस्था विषुववृत्तीय सागरी मत्स्य संशोधन संस्था म्हणून जागतिक स्तरावर प्रसिद्ध झाली आहे. संस्थेचे प्रमुख कार्यालय केरळ राज्यातील कोचीन इथे असून भारताच्या समुद्रकिना-यावरील वेरावळ, मुंबई, मंगलोर, कोचीन, त्रिवेंद्रम, चेन्नई, मंडपम-रामेश्वरम, तुतिकोरिन, विशाखापट्टणम, पुरी, अंदमान, लक्षद्वीप या सर्व महत्वाच्या मासेमारी बंदरांच्या ठिकाणी संशोधन उपकेंद्रे आहेत.

सुरुवातीच्या पाच दशकात केंद्रीय सागरी मत्स्य संशोधनसंस्थेने मत्स्योत्पादनाचे प्रमाण, माशांचे आणि इतर खाद्य सागरी जीवांचे वर्गीकरण, माशांच्या प्रजातींचा जैवसंपत्तीच्या दृष्टीकोनातून अभ्यास, मासेमारीची साधने, अशा शास्त्रोक्त बाबींचा अभ्यास केला. नंतरच्या कालखंडात शाश्वत मासेमारी, मत्स्यशेती, माशापासून निरनिराळी उत्पादने बनवणे अशा विषयातील नवे संशोधन करण्यासाठी उत्कृष्ट व्यवस्था, प्रशिक्षित मनुष्यबळ अशा बाबींचा विशेष विचार करण्यात येऊ लागला. ८००० कि.मी. लांब समुद्रकिनारपट्टीवर आढळणाऱ्या मासेमारीचे सांख्यिकीशास्त्राच्या आधारे सागराच्या खोलीनुसार विभागनिहाय स्वैर नमुना चाचणी पद्धतीवरून विश्लेषण करण्याचे कठीण काम संस्थेने पूर्ण केले. भारताच्या सागरी किनाऱ्यावर असणाऱ्या सर्व राज्यांतील जवळपास १,००० मत्स्य प्रजातीं, संधिपाद प्राणी, शेवंडे, कालवे, तिसऱ्या, कंटकचर्मी, समुद्र साप, कासवे व सागरी सस्तन प्राणी यांची ९० लाख पृष्ठे भरतील एवढी माहिती सागरी मत्स्य संशोधन संस्थेने उपलब्ध करून दिली आहे.

पारंपारिक मासेमारी उत्पादनात वाढ करण्यासाठी मत्स्यशास्त्रज्ञांनी मत्स्यशेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मत्स्यव्यवसायाला दिली (१९७० च्या दशकात). सागरकिनारी करावयाची मत्स्यशेती आणि समुद्रात पिंजरे टाकून करण्यात येणारी मत्स्यशेती याचे तंत्रज्ञान सागरी मत्स्य संशोधन संस्थेने विकसित केले. कोळंबी, कालवे, तिसऱ्या, शिणाणे, समुद्र-वनस्पती (सी-विड्स) आणि मोती देणारी कालवे यांच्या उत्पादनावर भर देण्यात आला. यासाठी लागणारे मनुष्यबळ तयार करण्यासाठी मत्स्यशेतीतील स्नातकोत्तर पदवी अभ्यासक्रम आणि पीएच. डी. करण्याच्या सुविधा संस्थेत सुरू करण्यात आल्या.

माशांची पैदास करायच्या नव्या पद्धती, जैवतंत्रज्ञान आणि जैवविविधता, मत्स्यव्यवसायाचे नियमन, सागरी किनारा असणाऱ्या प्रत्येक राज्यासाठी निरनिराळे विकास आराखडे, सागरी अधिवासावर आणि मच्छिमारांच्या जीवनावर हवामान बदलामुळे होणारे परिणाम अशा अनेक विविध विषयांवर येथे सतत संशोधन सुरु असते. एक सामाजिक जाणिवेचा भाग म्हणून सागरी मत्स्यशेतीच्या तंत्रज्ञानाचा महिला सबलीकरणासाठी वापर करण्यात आला. आता ग्रामीण महिला यातून अर्थार्जन करून स्वयंपूर्ण झाल्या आहेत. प्रयोगशाळेतील माहिती व तंत्रज्ञान स्थानिक मच्छिमार समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष कार्यक्रम घेतले जातात. मोबाईल फोनचा वापर करून मत्स्य साठ्याची माहिती देण्याचे प्रयोग मच्छिमारांसाठी केले जातात .

या तंत्रज्ञानाला एम. कृषी असे नाव देण्यात आले आहे. सागरी मत्स्यविज्ञान संस्थेमुळे सागरी जैवतंत्रज्ञान या विषयातील नवीन तंत्रज्ञान शिकण्याच्या संधी शक्य झाल्या. सागरी मत्स्यविज्ञान संस्थेच्या बोधचिन्हामध्ये सागरी लाटामध्ये असलेला मासा व त्याखाली असलेला कडलमीन हा मल्याळी शब्द मुद्दाम घातलेला आहे. कडलमीन याचा अर्थ संमिश्र मत्स्यशेती. सागरी मत्स्यविकासातील सर्व अंगांचे संशोधन बोधचिन्हातून स्पष्ट होते.

संदर्भ :

समीक्षक – मोहन मद्वाण्णा

प्रतिक्रिया व्यक्त करा