(स्थापना : १९८९). समुद्री सजीव संसाधन आणि परिसंस्थाशास्त्र केंद्राचे मुख्य कार्यालय केरळमधील कोची येथे आहे. समुद्री सजीव संसाधन या विषयात निरीक्षणे, मुलभूत संशोधन आणि अभ्यास करणे हे या केंद्राचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

समुद्री सजीव संसाधन आणि परिसंस्थाशास्त्र केंद्राची इमारत

प्रारंभी कोची येथे १९८९ मध्ये वैज्ञानिक संशोधन जहाज व्यवस्थापन कक्ष स्थापन करून केंद्राच्या कामाची सुरुवात झाली. भारत सरकारच्या महासागर विकास विभागाच्या अखत्यारीत हा कक्ष स्थापन केला गेला. सागर संपदा या संशोधन जहाजाचे कार्य सुरळीत राखणे हे या कक्षाचे प्रमुख कार्य होते. सागर संपदा हे मत्स्यपालन सागरवैज्ञानिक संशोधन जहाज (Fishery Oceanographic Research Vessel – FORV) आहे. हे जहाज सागर विज्ञानाच्या विकासासाठीची राष्ट्रीय सुविधा आहे. १९९८ साली सागरसंपदा या वैज्ञानिक संशोधन जहाजाचा विकास करून त्याचे रूपांतर समुद्री सजीव संसाधन आणि परिसंस्थाशास्त्र केंद्र यामध्ये केले. देशात समुद्री सजीव संसाधन आणि परिसंस्थाशास्त्र यांचा विकास करणे या उद्देशाने हे केंद्र स्थापन झाले. यासाठी प्रथम समुद्री सजीव संसाधन कार्यक्रम सुरू केला. त्या अंतर्गत सागर संपदा या वैज्ञानिक संशोधन जहाजावर आवश्यक उपकरणांसह सुसज्ज प्रयोगशाळा तयार केली. समुद्री सजीव शास्त्रातील संशोधनासाठी आवश्यक असणारे भौतिकविज्ञान, रसायनविज्ञान, जीवविज्ञान, हवामानविज्ञान इत्यादींचे संशोधन आणि अभ्यासासाठी या जहाजावर सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध केल्या गेल्या. या केंद्रामध्ये पर्यावरण नियंत्रण आणि प्रारूप निर्मितीद्वारे समुद्री सजीव संसाधनाचे व्यवस्थापन याचे धोरण ठरविले जाते. सागर संपदा या वैज्ञानिक संशोधन जहाजाचा योग्य वापर करण्यासाठीचे कालबद्ध संशोधन व विकास कार्यक्रम या केंद्रामार्फत स्वतंत्रपणे तसेच इतर संस्थांबरोबर संयुक्तपणे राबविले जातात. काही इतर संस्थांची आवश्यक मदत घेतली जाते.

सागर संपदा : वैज्ञानिक संशोधन जहाजाचा विकास करून त्याचे रूपांतर समुद्री सजीव संसाधन आणि परिसंस्थाशास्त्र केंद्रात

समुद्री सजीव व इतर संसाधनांची निरीक्षणे, त्यांच्या नोंदी, व्यावसायिक दृष्टीने वापर करता येतील  अशा समुद्री संसाधनांची यादी तयार करण्याचे कार्य या केंद्रात सतत चालू असते. पर्यावरण व्यवस्थापनात जास्तीतजास्त उपयोग करून घेण्यासाठी योग्य प्रकल्पांची योजना केली जाते. यासाठी संकलित केलेली माहिती जतन करण्यासाठी समुद्री सजीव संसाधन माहिती व संदर्भ केंद्र या संस्थेत स्थापन केलेले आहे.

नवव्या पंचवार्षिक (१९९८–२००२) योजनेअंतर्गत या केंद्राने प्रथमच भारताच्या पश्चिम व पूर्व किनारपट्टीवरील समुद्री सजीवांचा पद्धतशीर अभ्यास केला. यामध्ये समुद्राच्या लाटांबरोबर वाहून येणारे प्राणी व वनस्पती प्लवक (zooplankton and phytoplankton), समुद्राच्या तळाशी असलेले  वनस्पती, प्राणी (benthos) व मत्य संसाधन इत्यादींचा पर्यावरणाच्या दृष्टीने अभ्यास केला. दहाव्या पंचवार्षिक योजना काळात (२००२–२००७) या अभ्यासाची व्याप्ती वाढवून त्यामध्ये अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, अंदमान-निकोबार आणि लक्षद्वीप येथील सागरातील प्राणी व वनस्पतींचा अभ्यास केला. भारतीय उपखंडाच्या सागर व महासागर यातील विषारी एकपेशीय वनस्पती (शेवाळे) आणि सस्तन प्राणी यांच्यावरील संशोधनावर विशेष भर दिला. भारताच्या विशेष आर्थिक क्षेत्रामध्ये (Exclusive Economic Zone; EEZ) सागर किनारे, तसेच प्रत्यक्ष सागरातील काही स्थानकांवर  पर्यावरणीय सागरीय तसेच इतर संसाधन निर्मितीच्या दृष्टीने अभ्यास करून त्यावर देखरेख ठेवणे सुरू केले. या भागातील मत्स्य संसाधनांवरही संशोधन केले.

डिसेंबर २००४ मध्ये झालेल्या विध्वंसक त्सुनामीचा सागर साधनसंपत्तीवर झालेल्या विपरीत परिणामांचा वैज्ञानिक अभ्यास केला. या अभ्यासासाठी गोव्याची राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्था, भारतातील विविध महाविद्यालयातील समुद्रविज्ञान विभाग आणि कोची येथील कोचीन विज्ञान व तंत्रज्ञान विद्यापीठ यांचा समावेश होता.

जुलै १९८१ पासून अस्तित्वात असलेल्या महासागर विकास विभागाचे रूपांतर जुलै २००६ साली पृथ्वी विज्ञान मंत्रालययामध्ये झाले. तेव्हापासून भारत सरकारच्या महासागर विकास विभागाच्या अखत्यारीतील सर्व संस्था व केंद्रे, तसेच विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या अखत्यारीतील हवामान या विषयक सर्व संस्था व केंद्रे पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीत आले. त्यानुसार समुद्री सजीव संसाधन आणि परिसंस्थाशास्त्र केंद्र हे पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीत आले.

अकराव्या पंचवार्षिक योजना काळात (२००७ – २०१२) इतर संस्थांबरोबरच्या संयुक्त कार्यक्रमांव्यतिरिक्त केंद्राने स्वतःचे संशोधन व विकास कार्यक्रम सुरू केले. यामध्ये महासागरी वातावरण, समुद्राच्या पृष्ठभागावरील तसेच तलस्थ मासे व इतर प्राणी (Benthos), अरबी समुदातील तारली  मासे (oil Sardines), स्वयंप्रकाशित तेजस्वी मासे (Myctophid), विषारी शैवाल (Algae) इत्यादींच्या प्रजननांवर व निरीक्षणांवर लक्ष केंद्रित केले. तसेच समुद्रातील प्राण्यांमधील भौतिक व रासायनिक घटक ओळखून त्यांचे अलगीकरण करण्याचे कामही काही प्रकल्पाअंतर्गत केले गेले.

सन २००९ मध्ये या केंद्राने हिंदी महासागर जैवभौगोलिक माहिती प्रणाली सुरू केली. त्यामुळे या केंद्राला आंतर सरकारी सागरशास्त्र आयोगाची (Intergovernmental Oceanographic Commission) हिंदी महासागराचे क्षेत्रीय जैवभौगोलिक माहिती केंद्र (Regional Biogeographic Information System of Indian Ocean) म्हणून मान्यता मिळाली.

या केंद्राने पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीतील गोवा येथील राष्ट्रीय ध्रुवीय व महासागर संशोधन केंद्र याच्याबरोबर आर्टिक फोर्ड्स येथे पर्यावरण व जैवविविधता या विषयांवर संशोधन व अभ्यास सुरू केला आहे. फोर्ड्स हा सामान्यत: हिमनदीच्या दरींच्या पाण्याखाली तयार होणारा समुद्राचा एक लांब, अरुंद, खोल अंतर्भाग असतो. हे केंद्र इतर संस्था व विद्यापीठ यांच्या सागरविषयक संशोधन कार्यासाठीचा समन्वयक व निधी पुरवठा प्रतिनिधी म्हणूनही कार्यरत राहिले आहे.

केंद्राच्या संशोधनातून प्रसिद्ध केलेल्या ग्रंथांची, शोधनिबंधांची व इतर साहित्याची यादी https://cmlre.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

कळीचे शब्द : #समुद्री #सजीव #संसाधन #संशोधन

संदर्भ : 

  • Gupta G.V.M., Saravanane N. And Sudhakar M., Proceedings of Indian National Science Academy, Centre for Marine Living Resources and Ecology, 82, 3, July (Special Issue) 2016, 1013-1020
  • https://cmlre.gov.in

समीक्षक : मोहन मद्वाण्णा