कर्वे, आनंद दिनकर : (७ ऑगस्ट  १९३६).

भारतीय वनस्पतिशास्त्रज्ञ. त्यांचा जन्म पुणे येथे झाला. त्यांनी जैवखाद्यापासून जैवइंधन आणि शेतीतील कचऱ्यापासून कांडी कोळसा तयार करण्याची पद्धत विकसित केली.

ग्रीन ऑस्कर समजला जाणारा ॲश्डेन पुरस्कार २००२ आणि २००६ असा दोनवेळा मिळविणाऱ्या पुण्यातील ॲप्रोप्रिएट रूरल टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट (आरती) या संस्थेचे आनंद कर्वे हे प्रवर्तक आहेत. चिरंतन ऊर्जा निर्मितीसाठी प्रयत्न करणाऱ्या जगातील नावीन्यपूर्ण व लोकोपयोगी प्रकल्पांना ब्रिटन हा पुरस्कार देतो. कर्वे यांचा जन्म पुण्यातील सुप्रसिध्द समाजसुधारक व शिक्षणमहर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या घराण्यात झाला. वडील दिनकर धोंडो कर्वे  पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य होते, तर आई डॉ. इरावती कर्वे या प्रसिद्ध मानववंशशास्त्रज्ञ होत्या. पुणे विद्यापीठातून वयाच्या विसाव्या वर्षी आनंद कर्वे यांनी बी.एस्सी. पदवी मिळविली. नंतर उच्च शिक्षणासाठी ते जर्मनीच्या ट्यूबिंगन विद्यापीठात गेले आणि १९६० मध्ये त्यांनी वनस्पतिशास्त्रातील पीएच्.डी. पदवी संपादन केली. त्यानंतर चार वर्षे ते भारतामध्ये पंजाब विद्यापीठात व्याख्याते होते. १९६४-६६ या काळात ते  शिवाजी विद्यापीठात वनस्पतिशास्त्र विभागाचे प्रमुख होते. त्यानंतर १९८२ सालापर्यंत ते फलटण येथील निंबकर सीड्स संशोधन संस्थेचे संचालक होते. म्यानमार येथे युनायटेड नेशन्स फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन या संघटनेच्या वतीने भुईमूगतज्ञ म्हणून त्यांनी काम पहिले होते. करडई तेलबियावरील आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ म्हणून ते ओळखले जातात.

कर्वे यांनी भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे चालविण्यात येणाऱ्या सेंटर फॉर अॅप्लिकेशन ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी फॉर रूरल डेव्हलपमेंट (केस्टफोर्ड) या प्रकल्पात १९८८ मध्ये सहभाग घेतला. १९९२ मध्ये ते त्या प्रकल्पाचे उपसंचालक व नंतर संचालक झाले. १९९३ मध्ये त्यांनी पुण्यातील इंद्रायणी बायोटेक लिमिटेड या कंपनीच्या संचालक पदाची  जबाबदारी स्वीकारली. पारंपरिक जैवइंधन वापरून घरी स्वयंपाक कसा करता येईल यावर त्यांनी संशोधन केले. त्यांनी विकसित केलेल्या संयंत्रामधून फक्त एक किलो जैवखाद्यापासून ५००  ग्रॅम इंधन वायू मिळविता येत होता. याउलट एवढा इंधन वायू मिळविण्यासाठी पारंपरिक बायोगॅस संयंत्रासाठी ४० किलो शेण लागते. इंग्लंडचे प्रिन्स चार्ल्स यांनी कर्वे यांना ब्रिटनच्या राजवाड्यात या संयंत्राची प्रस्थापना करण्यासाठी आमंत्रित केले होते. महाराष्ट्रात अशा १,००० पेक्षा अधिक संयंत्रांची उभारणी करण्यात आली आहे. या संयंत्रातून मिळणारा मिथेन वायू अन्न शिजविण्यासाठी आणि पेट्रोल व डीझेल इंजिने तसेच विद्युत् जनित्रे चालविण्यासाठी वापरता येतो.

कृषि-अपशिष्टापासून बंदिस्त जागेत उष्णता देऊन पर्यायी ऊर्जा स्रोत कर्वे यांनी शोधून काढला. स्टेनलेस स्टील पिंपाच्या बंद भट्टीत बागेतील, शेतातील व घरातील ज्वलनशील काडी-कचऱ्यापासून व पाल्या-पाचोळ्यापासून कांडी कोळसा बनविण्याची पद्धत त्यांनी विकसित केली.  या पद्धतीत जैवकचरा भट्टीत घालून त्यास बाहेरून उष्णता दिली जाते. भट्टीत मुक्त ऑक्सिजन नसल्याने कचऱ्याचे विघटन होते. विघटन होताना  ७० टक्के ज्वलनशील पदार्थ वायुरूपाने मुक्त होतात. जैववस्तुमानाचा वीस टक्के अवशेष कोळशाच्या स्वरूपात शिल्लक राहतो. कोळशाचा बारीक भुगा करून त्यात थोडे शेण किवा खळ मिसळल्यास साच्याच्या साहाय्याने कांडी कोळसा किवा इंधनविटा तयार करता येतात. तंदूर, बार्बेक्यू किंवा घरगुती कोळशाच्या शेगडीत आणि लोहारकामासाठी हा कोळसा वापरता येतो. हा कोळसा जळताना धूर येत नसल्याने वायुप्रदूषण होत नाही.

कर्वे यांनी आतापावेतो पन्नासपेक्षा अधिक संशोधन प्रकल्प राबविले. त्यांनी सुमारे १२५ संशोधनपर निबंध व १२५ शास्त्रीय शोधनिबंध प्रसिद्ध केले आहेत. महात्मा गांधींजींची स्वयंपूर्ण खेड्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्याचे सामर्थ्य असलेला हा बहुआयामी संशोधक अजूनही कार्यरत आहे.

कळीचे शब्द : अश्डेनपुरस्कार #कांडीकोळसा #बायोगॅस # बायोगॅस #Biogas #बायोमास #Biomass #सौरऊर्जा #SolarEnergy #बायोचर #Biochar

संदर्भ : 

  • तुस्कानो, जोसेफ विज्ञानवेध  पार्टनर पब्लिकेशन, विरार २०१०.
  • देशपांडे, अ. पां. विज्ञान आणि वैज्ञानिक मनोविकास प्रकाशन,पुणे
  • विज्ञानभारती  शिल्पकार  चरित्रकोश विज्ञान व तंत्रज्ञान खंड २०१०.

समीक्षक – मोहन मद्वाण्णा