याला कॅटेगॅट सामुद्रधुनी असेही संबोधले जाते. उत्तर-दक्षिण दिशेत पसरलेल्या या समुद्राच्या पश्चिमेस डेन्मार्कचे जटलंड द्वीपकल्प, दक्षिणेस डेन्मार्कचेच झीलंड बेट, पूर्वेस स्वीडन हा देश; तर उत्तरेस स्कॅगरॅक समुद्र (उत्तर समुद्राचा फाटा) आहे. स्कॅगरॅक समुद्राद्वारे कॅटेगॅट समुद्र उत्तर समुद्राशी जोडला गेलेला आहे; तर दक्षिणेकडील उरसुंद, ग्रेट बेल्ट व लिटल बेल्ट या सामुद्रधुनींमुळे कॅटेगॅट समुद्र बाल्टिक समुद्राशी जोडला गेलेला आहे.

कॅटेगॅट समुद्राचे क्षेत्रफळ २५,४८५ चौ. किमी. असून त्याची उत्तर-दक्षिण लांबी २२० किमी., पूर्व-पश्चिम रूंदी सुमारे ६० ते १४२ किमी. आणि सरासरी खोली २६ मी. (कमाल खोली १२२ मी.) आहे. याचा पश्चिम भागापेक्षा पूर्वेकडील भाग अधिक खोल आहे. बाल्टिक समुद्राकडून या समुद्राकडे वाहत येणाऱ्या गोड्या पाण्याच्या पृष्ठीय प्रवाहांमुळे या समुद्राच्या पाण्याची लवणता कमी होते. यातील पाण्याची लवणता दर हजारी ३० असते. लेसअ, आनहॉल्ट, साम्स ही प्रमुख डॅनिश बेटे या समुद्रात आहेत. स्वीडनची गॉथनबर्ग व हाल्मस्टाट, तर डेन्मार्कचे ऑर्हूस ही या समुद्र किनाऱ्यावरील प्रमुख बंदरे आहेत.

कॅटेगॅट हा व्यापारी जहाजवाहतुकीचा प्रमुख मार्ग असून किनाऱ्याजवळच्या उथळ सागरी भागामुळे मात्र वाहतूक जिकीरीची ठरते. बाल्टिक समुद्र व पश्चिमेकडील उत्तर समुद्र यांना जोडणारा आयडर (ईडर) कालवा जर्मनीच्या उत्तर भागातून इ. स. १७८४ मध्ये काढण्यात आला. इ. स. १८८० मध्ये त्याच्या काही भागांचा उपयोग करून विस्तारित कील कालव्याची निर्मिती झाली. त्यामुळे कॅटेगॅट समुद्रमार्गे उत्तर समुद्राकडे होणाऱ्या जलवाहतुकीची रहदारी थोडी कमी झाली आहे. कॅटेगॅट समुद्रातील बेटे व समुद्रपरिसराचे निसर्गसौंदर्य (सागरी पुळणी, फ्योर्ड, जंगलांनी व्यापलेला भाग इत्यादी), हे पर्यटकांचे उन्हाळी सुटीतील विशेष आकर्षण क्षेत्र आहे.

समीक्षक ꞉ मा. ल. चौंडे