आफ्रिकेतील काँगो नदीच्या (झाईरे नदी) मुखाकडील (नदीचा तिसरा टप्पा) प्रवाहमार्गातील ३२ द्रुतवाह व धबधब्यांची मालिका (प्रपातमाला). झाईरे (काँगो लोकसत्ताक गणतंत्र) या देशातील किन्शासा (लिओपोल्डव्हिल) ते माताडी या शहरांच्या दरम्यानच्या ३५४ किमी. लांबीच्या काँगो नदीपात्रात धबधब्यांची व द्रुतवाह मालिका असून तिचा काही भाग लगतच्या ब्रॅझाव्हिल (काँगो प्रजासत्ताक) या देशाच्या सरहद्दीवर आहे. या प्रपातमालिकेच्या दरम्यान नदी सुमारे २६० मी. ने खाली उतरते. प्रसिद्ध स्कॉटिश (ब्रिटिश) समन्वेषक व धर्मोपदेशक (मिशनरी) डेव्हिड लिव्हिंग्स्टन यांच्या नावावरून या धबधब्यांना लिव्हिंग्स्टन फॉल्स हे नाव देण्यात आले आहे. लिव्हिंग्स्टन यांनी आपला दीर्घकाळ आफ्रिका खंडातील समन्वेषणात घालविला होता. लिव्हिंग्स्टन यांनी काँगो नदीच्या वरच्या खोऱ्याचे समन्वेषण केले होते; परंतु या धबधब्यांच्या परिसरात प्रत्यक्षात प्रवास केला नव्हता. ब्रिटिश समन्वेषक सर हेन्री स्टॅन्ली यांनी इ. स. १८७७ मध्ये मध्य आफ्रिकेतून काँगो नदीमार्गाने तिच्या मुखापर्यंतचा प्रवास करून तिच्या प्रवाहमार्गाचा शोध लावला होता. त्यांनीच लिव्हिंग्स्टन यांच्या सन्मानार्थ या धबधब्यांना लिव्हिंग्स्टन धबधबे असे नाव दिले.
किनाऱ्यापासून अंतर्गत भागात १६० किमी. पासून जलप्रपातांना सुरुवात होते. त्यामुळे नदीच्या मुखापासून अंतर्गत भागात जलवाहतूक होऊ शकत नाही; परंतु या द्रुतवाह व धबधब्यांच्या रूपाने प्रचंड प्रमाणात जलविद्युत शक्तीची निर्मिती होऊ शकते. माताडीपासून वरच्या बाजूस ४० किमी. वर इंगा धबधबे आहेत. इंगा ही लिव्हिंग्स्टन प्रपातमालिकेतील प्रमुख प्रपातमालिका असून तिच्यात सात जलविद्युत निर्मिती प्रकल्प प्रस्तावित आहेत. त्यांपैकी माताडीपासून लगतच वरच्या बाजूस इंगा हा प्रचंड मोठा जलविद्युत निर्मिती प्रकल्प उभारण्यात आला आहे. ग्रँड इंगा हा दुसरा प्रकल्पही उभारला जात आहे. या खोऱ्यातील इतर धरणे प्रामुख्याने काँगो नदीच्या उपनद्यांवर बांधलेली आहेत.
समीक्षक ꞉ मा. ल. चौंडे